ISI एजेंट ‘नेहा’ला देत होता देशाची गोपनीय माहिती, पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्याला अटक
उत्तर प्रदेश एटीएसने शुक्रवारी आग्रा येथून पाकिस्तानसाठी हेरगिरी करण्याच्या आरोपाखाली दोन जणांना अटक केली. हेरगिरी प्रकरणी फिरोजाबाद येथील ऑर्डनन्स फॅक्टरीत काम करणाऱ्या रवींद्र कुमारसह आणखी एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे, अशी माहिती मिळत आहे. हे दोघेही पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयला (ISI) देशाची संवेदनशील माहिती शेअर करत असल्याचा आरोप आहे.
एटीएसला काही दिवसांपासून माहिती मिळाली होती की, पाकिस्तानी हेर हे हिंदुस्थानी सरकारी कर्मचाऱ्यांकडून गुप्त माहिती मिळवत आहेत. यासाठी ते सोशल मीडियाद्वारे मित्र बनवतात आणि त्यांना पैसे किंवा प्रेमाचे आमिष दाखवून जाळ्यात अडकवतात. चौकशीदरम्यान असे आढळून आले की, रवींद्र कुमार देखील याच जाळ्यात अडकून देशविरोधी कृत्य करत होता.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र याची फेसबुकवर नेहा शर्मा नावाच्या महिलेशी मैत्री झाली, जी प्रत्यक्षात पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेची एजंट होती. दोघांमध्ये व्हॉट्सअॅप चॅट्स, ऑडिओ आणि व्हिडीओ कॉल्स होत होते. हळूहळू तिने रवींद्रला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले आणि ऑर्डनन्स फॅक्टरीची गोपनीय माहिती विचारू लागली. रवींद्रनेही तिला कारखान्याची गुप्त कागदपत्रे पाठवली, असा आरोप आहे.
याचप्रकारणी रवींद्र कुमार याला अटक केल्यानंतर त्याच्या फोनमध्ये अनेक गोपनीय कागदपत्रे असल्याचं पोलिसांना दिसलं. ज्यात फॅक्टरी उत्पादन अहवाल (ड्रोन आणि इतर संरक्षण उपकरणांशी संबंधित माहिती), गोपनीय बैठकीच्या फायली (ज्यामध्ये हिंदुस्थानी सैन्य आणि अधिकाऱ्यांमधील चर्चा रेकॉर्ड केल्या गेल्या), सरकारी कारखान्यांच्या स्टॉकच्या याद्या आणि संवेदनशील कागदपत्रांच्या अनधिकृत प्रतींचा समावेश होता. दरम्यान, उत्तर प्रदेश एटीएस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List