मानलेल्या भावासह प्रियकराचा विवाहितेवर सामूहिक अत्याचार, बार्शीत नात्याला काळिमा फासणारी घटना
बार्शीत बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली असून, एका विवाहितेवर मानलेला भाऊ व प्रियकराने लॉजवर नेऊन सामूहिक अत्याचार केला आहे. याप्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार मानलेला भाऊ व प्रियकराला अटक करण्यात आली आहे. सुरेश परसू माळी व संतोष भास्कर भानवसे असे अटक केलेल्यांची नावे आहेत.
पीडित महिला आपल्या मुलीसोबत बार्शीमध्ये राहत असून, तिचा नवरा पुण्यात सेटिंगचे काम करतो. आरोपी सुरेश परसू माळी यांच्यासोबत पीडित महिलेचे सात वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. सुरेशचा मित्र आरोपी संतोष भास्कर भानवसे हा विवाहित पीडित महिलेला बहीण मानतो. विवाहित पीडित महिलेचे व तिच्या पतीचे व्यसनावरून वाद सुरू होते. काही महिन्यांपूर्वी सुरेश माळी व संतोष भानवसे हे दोघे पुण्यातून पीडित महिलेला बार्शीकडे न्यायला आले असता त्यास पीडितेने नकार देताच प्रियकर सुरेश माळी याने मारहाण केली होती.
दरम्यान, पीडित महिला बार्शीत आल्यावर संतोषने (मानलेला भाऊ) तू माझी बहीण आहेस, सुरेश तुझे ऐकतो त्यामुळे त्याच्या मुलीसोबत माझ्या मुलाचे लग्न जमवून दे, असे सांगितले, तेव्हा पीडित महिला मध्यस्थी करून प्रियकर सुरेशशी बोलून त्याच्या मुलीचे संतोषच्या मुलाशी लग्न जुळविले. 22 डिसेंबर 2024 रोजी पीडित महिला बार्शीत लग्नाला आली होती.
लग्नकार्य झाल्यानंतर पीडितेचा पती दारूच्या नशेत असल्याने त्याला सुरेश माळी व संतोष भानवसे यांनी वऱ्हाडाच्या गाडीत पाठवून दिले. त्यानंतर रात्री साडेअकराच्या सुमारास दोघांनी मिळून पीडित महिलेला घरी सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवून कुर्दुवाडी रोडवरील लॉजवर नेले. तिथे सुरेश माळी, संतोष भानवसे यांनी आळीपाळीने तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिला धमकी दिली.
या घटनेनंतर पीडितेने नातेवाईकांच्या मदतीने बार्शी पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, पोलिसांनी सुरेश माळी व संतोष भानवसे यांना अटक केली आहे. न्यायालयाने या दोघांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List