कानिफनाथांच्या जयघोषात मढीत होळी उत्सव
कानिफनाथांचा जयघोष करत मढी येथे गोपाळ समाजाची मानाची होळी पेटवण्यात आली. पूर्वीची पार्श्वभूमी लक्षात घेता, पोलिसांनी दरवर्षीप्रमाणे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. होळी पेटवण्यासाठी राज्यातून गोपाळ समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कानिफनाथांच्या मंदिर बांधकामासाठी गोपाळ समाजाने मोठे योगदान दिल्याने गोपाळ समाजाला या यात्रेत होळी पेटवण्याचा मान देण्यात आला आहे. गुरुवारी (दि.14) सायंकाळी गोपाळ बांधव वाजत-गाजत होळी पेटवण्यासाठी लागणाऱ्या मानाच्या गोवऱ्या आणण्यासाठी गडावर गेले. देवस्थान समितीने होळी पेटवणारे गोपाळ समाजाचे मानकरी माणिक लोणारे, रघुनाथ काळापहाड, नामदेव माळी, भगीनाथ नवघरे, हरिभाऊ हंबीरराव, ज्ञानदेव गिन्हे यांना मानाच्या गोवऱ्या दिल्या. या गोवऱ्या समाजाचे मानकरी ज्ञानदेव गिन्हे यांनी आपल्या डोक्यावर घेऊन त्या गोवऱ्या वाजत गाजत ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते, त्या ठिकाणी आणल्या. ज्या ठिकाणी होळी पेटवली जाते, तेथे पोलिसांनी बॅरिकेटिंग केलेले होते. या बॅरेकेटमध्ये पोलिसांनी कडक बंदोबस्तात मानकऱ्यांना नेले. मानकऱ्यांनी होळीची विधिवत पूजा केल्यानंतर होळी पेटवण्यात आली. यावेळी उपस्थित गोपाळ समाजबांधव व भाविकांनी कानिफनाथांचा जयघोष केला.याप्रसंगी तहसीलदार उद्धव नाईक, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहायक पोलीस निरीक्षक हरीश भोये, शिवाजी तांबे, महादेव गुट्टे, विलास जाधव, निवृत्ती आगरकर हे उपस्थित होते. झेंडू पवार यांनी आभार मानले.
शिर्डीत गुरुस्थान मंदिरात होळी पेटविली
शिर्डी : श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिडींच्या वतीने होळी सण उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी श्री गुरुस्थान मंदिरासमोर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक होळीची विधिवत पूजा केल्यानंतर होळी पेटविण्यात आली. याप्रसंगी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे-सिनारे, मंदिर विभागप्रमुख विष्णू थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त उपस्थित होते.
मोहटा देवी गडावर होळी साजरी
भाविकांच्या उपस्थितीत मोहटा देवी गडावर गुरुवारी होळीचा सण साजरा करण्यात आला. सायंकाळी देवस्थानच्या प्रांगणात होळी रचण्यात आली व विधिवत तिची पूजा करून होळी पेटवण्यात आली. पौर्णिमा असल्याने मोठ्या संख्यने भाविक देवीच्या दर्शनासाठी आले होते. त्यमध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय होती. होळीचे पूजन देवस्थानचे विश्वस्त विठ्ठल कुटे, स्वाती कुटे, डॉ. श्रीधर देशमुख, डॉ. ज्योती देशमुख, देवस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भाविक राहुल पानसरे, सचिन बानकर यांच्या हस्ते करण्यात येऊन होळी पेटवण्यात आली. यावेळी उपस्थित भाविकांनी ‘आई राजा उदो उदो’चा गजर केला, तर भाविकांना देवस्थानतर्फे पुरणपोळीचा प्रसाद देण्यात आला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List