पाऊलखुणा- आठवणींचा सुवर्णकाळ मालगुडी म्युझियम

पाऊलखुणा- आठवणींचा सुवर्णकाळ मालगुडी म्युझियम

>> आशुतोष बापट

‘मालगुडी म्युझियम’ असे लिहिलेली कमान, हिरव्या-लाल रंगात नटलेले जुने रेल्वे स्टेशन आणि मालिकेतील अनेक आठवणी… हे सारे पाहायला मिळते शिमोग्याजवळील ‘अरासळू’ या गावात. ‘मालगुडी डेज’ या लोकप्रिय टीव्ही मालिकेची संकल्पना मांडणारे हे म्युझियम आपल्याला नॉस्टॅल्जिक अनुभव देणारे ठरते.

‘मालगुडी डेज’ ही अत्यंत लोकप्रिय टीव्ही मालिका. मालगुडी नावाच्या खेडेगावाचे कथानक मांडणाऱया या मालिकेचे चित्रीकरण   या शिमोग्याजवळील गावात झाले. अरासळू येथे उभे केलेले मालगुडीचे रेल्वे स्टेशन आता म्युझियममध्ये परावर्तित झाले आहे.

ही गोष्ट आहे एका प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या टीव्ही मालिकेची. जेव्हा मनोरंजनासाठी फक्त दूरदर्शन एवढे एकच माध्यम होते आणि इतर कुठल्याही खासगी वाहिन्या अस्तित्वात नव्हत्या त्या काळातली. तो जमाना होता दूरदर्शनचा. अनेकविध सुंदर मालिका त्या काळात दूरदर्शनचा पडदा गाजवून गेल्या. काही मालिका मुलांसाठी, तर काही तरुणांसाठी. काही घरातल्या वडीलधारी मंडळींसाठी, तर काही खास महिलांसाठी. घरातल्या प्रत्येक घटकासाठी एकेक मालिका त्या काळी दूरदर्शनवर दाखवली जात असे. मात्र एक मालिका अशी होती, ती सुरू झाली की, घरातली झाडून सगळी मंडळी टीव्हीसमोर येऊन ठाण मांडून बसत असत. ती मालिका म्हणजे ‘मालगुडी डेज’!  सुप्रसिद्ध लेखक आर. के. नारायण यांच्या लेखनावर आधारित ही मालिका आणि तिच्या जोडीला त्यांचे बंधू आर. के. लक्ष्मण यांची चित्रे यामुळे ही मालिका अफाट लोकप्रिय झाली. गिरीश कर्नाड, शंकर नाग अशा दिग्गज कलाकारांनी ही मालिका गाजवली. दक्षिण भारतातले एक छोटेसे खेडेगाव मालगुडी आणि त्या गावाशी निगडित असलेल्या विविध कथा असे या मालिकेचे कथानक. स्वामी हा लहान मुलगा आणि त्याचे कुटुंब ही त्या मालिकेतील मध्यवर्ती संकल्पना.  मालगुडी डेजचा काळ दाखवला होता तो स्वातंत्र्यापूर्वीचा काळ. त्यामुळे इंग्रजी राजवट, त्यांचे पोलीस, त्यांच्याकडे नोकरी करणारे लोक आणि त्यांच्या काळातल्या शाळा असा सगळा जुना मामला आर. के. नारायण यांनी फार समर्थपणे मांडला होता. छोटय़ाशा खेडय़ातले स्वामी हे मालिकेतील पात्र तर घराघरांत जाऊन पोहोचले आणि त्याचबरोबर ज्याच्या त्याच्यापर्यंत पोहोचले होते ते या मालिकेचे युनिक म्युझिक…! ‘मालगुडी डेज’ची ती टय़ून तर आजही अनेकांची मोबाइल रिंगटोन आहे.

‘मालगुडी डेज’ या मालिकेत अनेक प्रसंग, अनेक पात्रे, अनेक घटना आपल्याला भेटत जातात. त्या गावचे एक महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे मालगुडीचे रेल्वे स्टेशन. त्या स्टेशनला मध्यवर्ती ठेवून काही पात्रे येतात, काही कथानके तयार होतात आणि रेल्वे स्टेशनच्या पार्श्वभूमीवर खूप सुंदर कथानक साकार झालेले दिसते. ‘मालगुडी डेज’च्या रेल्वे स्टेशनचे शूटिंग कर्नाटकातील एका सुंदर ठिकाणी केले गेले होते. ‘अरासळू’ असे त्या गावाचे आणि स्टेशनचे नाव. शिमोग्याच्या जवळ असलेले हे ठिकाण. या अरासळू रेल्वे स्टेशनवर मालगुडी डेजच्या काही भागांचे चित्रीकरण झालेले आहे.

रेल्वे स्टेशनचे शूटिंग जिथे झाले त्या ठिकाणी आता एक सुंदर ‘मालगुडी म्युझियम’ उभारले आहे. मालिकेमध्ये दिसणारे ‘मालगुडी’ हे रेल्वे स्टेशन आता एका सुंदर म्युझियममधे परावर्तित झाले आहे. भारतीय रेल्वेने पुढाकार घेऊन हे स्टेशन आणि तिथले म्युझियम तयार केले आहे. शिमोग्यापासून फक्त 34 किलोमीटर अंतरावर दक्षिण-पश्चिम रेल्वेच्या तालीगुप्पा-शिमोगा मार्गावर ‘अरासळू’ हे स्टेशन आहे. अरासळूच्या जुन्या स्टेशनवर ‘मालगुडी डेज’चे शूटिंग झाले होते. इथेच शेजारी आता नवीन अरासळू स्टेशन उभारले आहे आणि जुन्या स्टेशनचे रूपांतर ‘मालगुडी म्युझियम’मध्ये केले आहे.

शिमोग्याकडे जाताना वाटेत उजवीकडे अरासळू स्टेशनपाशी ‘मालगुडी म्युझियम’ असे लिहिलेली कमान आपले स्वागत करते. कमानीतून आत गेल्यावर आपल्याला समोर दिसते ते हिरव्या-लाल रंगांत नटलेले बुटके जुने रेल्वे स्टेशन.  त्याच्या बाहेरच्या बाजूला नॅरो गेजवरील इंजिनाची प्रतिकृती आपले लक्ष वेधून घेते. परिसर अतिशय शांत आणि हिरवागार आहे. 1960 च्या दशकातले स्टेशन तसेच ठेवले आहे. तीच जुनी तिकीट खिडकी, तीच जुनी घडय़ाळे, जुनी समयसारिणी असा सगळा सुंदर सरंजाम तिथे आहे. स्टेशनच्या भिंतींवर ‘मालगुडी डेज’ या मालिकेतील वेगवेगळे प्रसंग चित्रित केलेत. एका टीव्हीवर सतत ‘मालगुडी डेज’ मालिका सुरू असते आणि सगळ्यात भारी म्हणजे या स्टेशनच्या  बाहेरच्या बाजूला स्वामी, त्याचे मित्र मणी आणि राजम यांचे पुतळे केलेले आहेत.

या मालगुडी स्टेशनच्या शेजारी रेल्वेच्या जुन्या डब्याचे रूपांतर करून ‘मालगुडी कॅफे’ तयार केला आहे. एखादी संकल्पना घेऊन त्याचं चीज कसं करायचं याचा परिपाठ म्हणजे हे ‘मालगुडी म्युझियम’ आहे. याचे प्रवेश शुल्क फक्त पाच रुपये आहे, पण इथे मिळणाऱया अनुभवाचे गाठोडे प्रचंड मोठे आहे. शिमोग्याला जाऊन मुद्दाम हे स्टेशन आणि म्युझियम बघायलाच हवे. तिथे असेपर्यंत मालगुडीची ‘ता ना ना नाना नाना ना…’ ही अफाट गाजलेली धून मनात सतत रुंजी घालत असते. काही गोष्टी शब्दांत नाही सांगता येत, तर त्या तिथे जाऊनच तो सुवर्णकाळ प्रत्यक्ष अनुभवायला हवा.

[email protected]

 

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबई इंडियन्सने रोखला दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ, 12 धावांनी जिंकला सामना मुंबई इंडियन्सने रोखला दिल्ली कॅपिटल्सचा विजयरथ, 12 धावांनी जिंकला सामना
मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सचा 12 धावांनी पराभव केला. दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने प्रथम फलंदाजी...
प्रँक करण्याच्या नादात नको ते करुन बसले, मित्रांमुळे तरुणाने प्राण गमावले
खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो… प्रेमी युगुलाची अश्लील कृत्य व्हिडिओत कैद
परदेशी नागरिकांना अमेरिकेचा अल्टिमेटम, 30 दिवसांपेक्षा जास्त काळ राहायचे असेल तर, नोंदणी करा, अन्यथा…
‘मनसे भाजपची बी टीम त्यांची….’; आदित्य ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल
राज्याला अवकाळी पावसानं झोडपलं, कुठे-कुठे पाऊस? वाचा एका क्लिकवर
कानफटातच लगावेन… Homosexuality बाबत विचारताच प्रसिद्ध अभिनेत्री भडकली; पारा पाहून सन्नाटा