MI Vs GT – घरच्या मैदानावर गुजरातचाच डंका, खातं उघडलं; मुंबईचा केला 36 धावांनी पराभव
घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गुजरातने मुंबईचा 36 धावांनी पराभव करत आयपीएलमध्ये आपला पहिला विजय जल्लोषात साजरा केला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या गुजरातने 8 गड्यांच्या मोबदल्यात 196 धावा केल्या होत्या. गुजरातने दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईचे फलंदाज हजेरी लावून माघारी परतत होते. तिलक वर्मा (39 धावा) आणि सूर्यकुमार यादव (48 धावा) यांनी संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे मुंबईला 160 धावांपर्यंत मजल मारता आली. विशेष म्हणजे सलग चौथ्या वर्षी मुंबईने हंगामातील सुरुवातीचे दोन्ही सामने गमावले आहेत.
हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत यजमानांना फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. यजमानांनी याचा पुरेपूर फायदा घेतला. सलामीला आलेल्या साई सुदर्शन (41 चेंडू 63 धावा) आणि कर्णधार शुभमन गिल (38 धावा) यांनी संघाला दमदार सुरुवात करून दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 78 धावांची भागी केली. त्यानंतर बटलरनेही हात धुवून घेतला आणि 24 चेंडूंमध्ये 5 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने महत्त्वपूर्ण 39 धावा केल्या. त्यामुळे संघाला 196 धावांपर्यंत मजल मारण्यात यश आले. गुजरातने दिलेल्या 197 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या फलंदाजांनी अक्षरश: नांगी टाकली. सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला, परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्यामुळे संघाचा 36 धावांनी पराभव झाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List