मोदींचा स्वभाव पाहता ते फक्त सत्तेसाठीच एखाद्याशी जुळवून घेऊ शकतात, संजय राऊत यांची टीका
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सत्तेत आल्यानंतर पहिल्यांदाच नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयात आले आहेत. गुढिपाडव्यानिमित्त आयोजित संघाच्या मेळाव्यात मोदी सहभागी झाले आहेत. त्याबाबत बोलताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.
”पंतप्रधान असताना अटल बिहारी वाजपेयी यांनी संघ मुख्यालयाला भेट दिली होती. पण नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यानंतर तब्बल अकरा वर्षानंतर संघ मुख्यालयात आले आहेत. आता त्यांना तिथे जाण्याची गरज का भासली हा एक संशोधनाचा विषय आहे. भाजपच्या राज्यपद्धतीवर संघाचा पगडा वाढतोय हे सत्य आहे. वाजपेयी हे संघाचे स्वयंसेवक होते हे त्यांनी मान्य केले होते. त्यात दुमत नाही त्यांनी ते मान्य केल्यामुळेच जनता पक्षाची सत्ता कोसळली होती. पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दहा ते अकरा वर्षानंतर आले आहेत. त्यांना आताच का यावं वाटलं ते त्यांनी सांगावं? याबाबतीत त्यांनी आपलं मन मोकळं करावं. तसा मोदींचा स्वभाव पाहता हे फक्त सत्तेसाठीच एखाद्याशी जुळवून घेऊ शकतात. जेपी नड्डा यांच्या अध्यक्षपदाचा कालखंड संपलेला आहे. संघाला त्यांच्या पसंतीचा अध्यक्ष हवा आहे. त्यामुळे भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षाची निवड लांबली. ज्या अर्थी नड्डा यांचा कार्यकाळ संपूनही अजून भाजप अध्यक्ष नेमू शकले नाहीत त्याअर्थी संघाचा भाजपवर दबाव आहे. लोकसभेत पराभव जाला कारण संघ कार्यकर्ते प्रचारापासून दूर राहिले. विधानसभा निवडणूकीत महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात भाजपसाठी प्रचार केला. संघाचा त्यात मोठा सहभाग आहे. मतदार याद्यातून नावं काढण्यापासून नावं घुसवण्यापर्यंत संघ काम करत होते, असे संजय राऊत म्हणाले.
”मी संघ आणि भाजपला वेगळे मानत नाही, ते एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. संघ जरी म्हणत असला की आमचा राजकारणाशी संबंध नाही आणि भाजपवाले देखील आमचा संघाशी संबंधित नसल्याचे म्हणत असतील तरी ते दोघे हातात हात घालूनच काम करत असतात. कोणी कोणती भूमिका कधी घ्यावी हे त्यांचे ठरलेले असते. नरेंद्र मोदी यांनी संघाचे प्रचारक म्हणून सुरुवात केली. त्यांनी संघाच्या कार्यालयात झाडू मारण्यापासून सुरुवात केली आहे. त्यावेळचे संघाचे सरसंघचालक लक्ष्मणराव इनामदार यांना ते गुरू मानायचे. इनामदार हे त्यागमूर्ती होते. ते साधे होते त्यांची राहणी साधी होती. त्यांच्या गुरुचे किती गुण मोदींमध्ये आहेत ते आपण गेल्या दहा वर्षात पाहिले आहेत”, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List