‘पहिल्यांदा योग्य काम केलं..’; मनोज कुमार यांच्या अंत्यसंस्कारातील अभिषेकच्या व्हिडीओवर कमेंट्स
बॉलिवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते मनोज कुमार यांचं शुक्रवारी (4 मार्च) निधन झालं. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. यावेळी अमिताभ बच्चन, सलीम खान, अभिषेक बच्चन हेसुद्धा त्याठिकाणी पोहोचले होते. सध्या सोशल मीडियावर अभिषेकचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिषेक पापाराझींवर भडकताना दिसून येत आहे. एका फोटोग्राफरच्या वागण्यावर तो चिडल्याचं स्पष्टपणे या व्हिडीओत पहायला मिळतंय. अमिताभ बच्चन आणि सलीम खान यांचा व्हिडीओ काढण्यासाठी पुढे सरसावलेल्या एका पापाराझीवर अभिषेक भडकला आणि त्यावेळी त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा धरणाऱ्या फोटोग्राफरचा कॅमेराही हाताने खाली केला.
या व्हिडीओत पहायला मिळतंय की अमिताभ बच्चन हे सलीम खान यांना भेटतात आणि त्यांचा हात हातात घेऊन काही बोलतात. अंत्यदर्शनाला पापाराझींचं वागणं पाहून अभिषेक त्यांच्यावर भडकला. तो एका पापाराझीला अडवतो आणि त्यानंतर दुसऱ्याला सुनावतो. अशातच तिसरा व्यक्ती अभिषेकला शांत हो म्हणत पुढे जाण्याचा सल्ला देतो. या व्हिडीओवर नेटकऱ्यांकडून विविध प्रतिक्रिया येत आहेत. ‘पहिल्यांदा एखाद्या अभिनेत्याने योग्य काम केलंय’, असं एकाने लिहिलं. तर ‘त्याने बरोबर केलंय. तो तिथे प्रमोशनसाठी गेला नव्हता. फोटोग्राफर्स त्याच्या चेहऱ्यावर कॅमेरा धरत होते’, असं दुसऱ्याने म्हटलंय.
मनोज कुमार यांचं वयाच्या 87 व्या वर्षी निधन झालं. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुलं असं कुटुंब आहे. मनोज कुमार यांच्या पार्थिवावर शनिवारी 5 एप्रिल रोजी विलेपार्ले इथल्या पवनहंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. मनोज कुमार यांनी त्यांच्या देशभक्तिपर चित्रपटांद्वारे स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांचे चाहते त्यांना ‘भारत कुमार’ म्हणून ओळखायचे. 1999 मध्ये प्रदर्शित झालेला ‘मैदान ए जंग’ हा त्यांची भूमिका असलेला अखेरचा चित्रपट ठरला. 1992 साली त्यांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यानंतर 2015 मध्ये त्यांना प्रतिष्ठित अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List