मी जिवंत असेपर्यंत कोणाचीही नोकरी जाणार नाही; ममता बॅनर्जी यांचे शिक्षकांना आश्वासन
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील शिक्षकांना महत्त्वाचे आश्वासन दिले आहे. मी जिवंत असेपर्यंत कोणाचीही नेकरी जाणार नाही, असे आश्वासन त्यांनी शिक्षकांना दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या पात्र शिक्षकांची नियुक्ती रद्द करण्यात आली होती, त्यांच्या नोकऱ्यांचे रक्षण करण्याचा निर्धार ममता बॅनर्जी यांनी केला. यावेळी त्यांनी अखिल भारतीय वैद्यकीय प्रवेश परीक्षेचे (NEEt) उदाहरणही दिले. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने त्या प्रकरणात संपूर्ण परीक्षा रद्द केली नाही, असे त्यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयाने हे स्पष्ट करावे की कोण पात्र आहे आणि कोण नाही,याबाबतची यादी आम्हाला द्या. तसेच शिक्षण व्यवस्था मोडण्याचा अधिकार कोणालाही नाही. भाजपशासित मध्य प्रदेशातील व्यापम प्रकरणात अनेक बळी गेले आहेत. त्यांना आजपर्यंत न्याय मिळालेला नाही. NEET मध्ये अनेक आरोप समोर आले. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ती परीक्षा रद्द केली नाही. असे असताना बंगालासाठी वेगळा नियम का, असा सवाल त्यांनी केला आहे. बंगालला लक्ष्य का केले जात आहे? आम्हाला जाणून घ्यायचे आहे. तुम्हाला बंगालच्या प्रतिभेची भीती वाटते, असेही त्या म्हणाल्या.
सर्वोच्च न्यायालयाने याबाबत स्पष्ट आदेश दिले तर आम्ही योग्य मार्ग शोधू. आम्ही शिक्षकांच्या पाठीशी उभे आहोत. दोन महिने सहन करा, तुम्हाला 20 वर्षे सहन करावे लागणार नाही. आपण त्या दोन महिन्यांची भरपाई देखील देऊ. तुम्हाला भीक मागावी लागणार नाही,असेही त्यांनी स्पष्ट केले.
भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यात 2016 मध्ये पश्चिम बंगाल शाळा सेवा आयोगाने भरती केलेल्या 25000 हून अधिक शिक्षक आणि शालेय कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या रद्द केल्या. या प्रकरणात संपूर्ण निवड प्रक्रिया दूषित आणि कलंकित झाली आहे. निवडीची विश्वासार्हता आणि वैधता नष्ट झाली आहे,असे स्पष्ट करत न्यायालयाने नियुक्त्या रद्द केल्या होत्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List