खरे ‘तारक मेहता’ कोण होते माहितीये का? निधनानंतर कुटुंबीयांनी त्यांचं शरीर..
तारक जानूभाई मेहता हे एक प्रसिद्ध भारतीय स्तंभलेखक, विनोदी लेखक आणि नाटककार होते. ‘दुनिया ने उंधा चष्मा’ या प्रतिष्ठित स्तंभासाठी ते लोकप्रिय होते. गुजराती रंगभूमीवरील ते प्रसिद्ध कलाकार होते. त्यांनी साहित्य आणि कला सादरीकरण या दोन्ही क्षेत्रांवर विशेष छाप सोडली. तारक जानूभाई मेहता यांचं लोकप्रिय साप्ताहिक स्तंभ ‘दुनिया ने उंधा चष्मा’ हे मार्च 1971 पासून चित्रलेखामधून सुरू झालं. या स्तंभाद्वारे त्यांनी समकालीन मुद्द्यांवर नवीन आणि विनोदी दृष्टीकोन मांडला होता. त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत त्यांनी 80 पुस्तकं लिहिली आहेत. 2008 भारतातील लोकप्रिय मनोरंजन वाहिनी सब टीव्हीने (आता सोनी सब) तारक मेहतता यांच्या स्तंभापासून प्रेरित होऊन ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका सुरू केली.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. या मालिकेत 2022 पर्यंत अभिनेते शैलेश लोढा यांनी तारक मेहताची भूमिका साकारली होती. त्यांनी ही मालिका सोडल्यानंतर अभिनेता सचिन श्रॉफ ती भूमिका साकारू लागले. तारक मेहता हे गुजराती नगर ब्राह्मण समुदायाचे सदस्य होते. ते गुजरातमधील अहमदाबाद इथं त्यांची दुसरी पत्नी इंदू यांच्यासोबत राहत होते. त्यांची पहिली पत्नी इला, ज्यांनी नंतर मनोहर जोशी यांच्याशी लग्न केलं, त्यादेखील त्याच इमारतीत राहत होत्या. इला यांच्या दुसऱ्या पतीचं निधन 2006 मध्ये झालं होतं.
मेहता यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून एशानी ही मुलगी आहे. ती अमेरिकेत राहत असून तिला कुशान आणि शैली ही दोन मुलं आहेत. तारक मेहता यांचं वयाच्या 87 व्या वर्षी 1 मार्च 2017 रोजी दीर्घ आजाराने निधन झालं. त्यांच्या निधनानंततर त्यांच्या कुटुंबाने तारक मेहता यांचं शरीर वैद्यकीय संशोधनासाठी दान केलं.
2015 मध्ये तारक मेहता यांना पद्मश्री या चौथ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. याशिवाय 2011 मध्ये त्यांना गुजरात साहित्य अकादमीकडून साहित्य गौरव पुरस्कार मिळाला. विनोदातील योगदानासाठी 2017 मध्ये त्यांना मरणोत्तर रमणलाल नीलकंठ हास्य पारितोषिक प्रदान करण्यात आलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List