“मुस्लिमांनंतर ख्रिश्चन, पारशी, डेरा, देवस्थानच्या जमिनींवर डोळा; उद्या चैत्यभूमीवर जाऊन भाजपचे लोक…”, संजय राऊत यांचा हल्लाबोल
मुस्लिमांच्या जमिनी ताब्यात घेतल्यानंतर ख्रिश्चन, पारशी, डेरा, देवस्थानच्या जमिनींवर सरकारचा डोळा आहे. हे सरकार जोपर्यंत आहे तोपर्यंत देवस्थानाच्या आणि प्रत्येक धर्माच्या जमिनी हे ताब्यात घेऊन आपल्या लाडक्या उद्योगपतींना टॉवर्स उभे करण्याची संधी देतील, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला. सोमवारी सकाळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी वक्फ सुधारणा विधेयक आणि संघाशी संबंधित ‘ऑर्गनायझर’ पोर्टलमध्ये आलेल्या लेखावर विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते.
संजय राऊत म्हणाले की, वक्फ बोर्ड सुधारणा विधेयका संदर्भातला विषय शिवसेनेसाठी संपला असून इंडिया आघाडी म्हणण्यापेक्षा काही लोक कोर्टात गेले आहेत. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी राज्यसभेतील भाषणात सांगितले की, हे विधेयक घटनाबाह्य आणि संविधानाच्या अनेक कलमांची मोडतोड करून बनवले आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात हे विधेयक टीकणार नाही असे कायदेतज्ज्ञांचे मत आहे.
शिवसेनेची स्पष्ट भूमिका आहे की, आम्ही भाजपने आणलेल्या वक्फ सुधारणा विधेयकाविरोधात मतदान केले. या विधेयकाला याक्षणी कोणताही धार्मिक आधार नाही, हे विधेयक कोणत्याही पद्धतीने विचार केला तरी समान नागरी कायदा, हिंदुत्व या संदर्भाच्या आसपासही जात नाही. वक्फ सुधारणा विधेयकाचा हिंदुत्वाशी संबंध नाही. या विधेयकाचा संबंध जमिनी आणि संपत्तीशी आहे. सरकारमधील काही लोकांना आणि त्यांच्या लाडक्या उद्योगपतींना वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटींच्या जमिनी घशात घालायच्या असल्याने हे विधेयक आणले आणि आम्ही त्याचा विरोध केला, असे राऊत म्हणाले.
वक्फ बोर्ड सुधारणा विधेयकाविरोधात गैरसमज पसरवता म्हणणाऱ्या उदय सामंत यांच्यावरही राऊत यांनी हल्लाबोल केला. उदय सामंत मुस्लिम धर्माच्या गैरसमजाविषयी बोलतात, ते काय मौलवी, मुल्ला आहे आहेत का? कुणी कुणाविषयी गैरसमज पसरवत नाही. मुस्लिमांच्या संपत्तीचे व्यापारीकरण करण्यासाठी हे विधेयक आणले आहे हे त्यांनाही माहितीय. सरकारमधील प्रत्येकाचे लक्ष वक्फ बोर्डाच्या महत्त्वाच्या जमिनी आणि संपत्तीवर आहे. म्हणून या सगळ्यांनी त्याला पाठिंबा दिला. आम्ही जमिनी विकू हे अमित शहांच्या भाषणात वारंवार आले आहे. जमिनी विकू हे ते कुणासाठी म्हणत आहेत आणि या जमिनी कोण घेणार? असा सवालही राऊत यांनी केला.
मोदी, शहा यांचा वक्फ बोर्डाच्या 2 लाख कोटींच्या संपत्तीवर डोळा आहे. ही संपत्ती त्यांना लाडक्या उद्योगपतींना द्यायची आहे. आज मुस्लिमांच्या जमिनी ताब्यात घेत आहेत, उद्या ख्रिश्चनांच्या घेतील, हे लोक बोधगयावरही दावा ठोकतील. भाजपचे लोक चैत्यभूमीवर जाऊन तिथे समुद्राशेजारी असलेल्या जमिनीवरही दावा ठोकतील, असेही राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List