शिर्डीतील दुहेरी हत्याकांडाचा 12 तासांत लावला छडा; दोघांना अटक
शिर्डी येथील काकडी (ता. राहाता) आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील शिवारात शुक्रवारी मध्यरात्री दिघे वस्ती येथे दरोडेखोरांच्या हल्ल्यात बापलेक ठार, तर एक महिला जखमी झाली होती. या गुन्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीस पथकाने १२ तासांत टेम्पोमधून पळून जाणाऱ्या दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
संदीप रामदास दहाबाड (वय – 18), जगन काशिनाथ किरकिरे (वय – 25, दोघे रा. तेलीम्बरपाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) अशी आरोपींची नावे आहेत.
दरोडेखोरांच्या हल्ल्यात कृष्णा भोसले (वय – 30), साहेबराव भोसले (वय – 60, दोघे रा. दिघे वस्ती, पिंप्री रोड, काकडी, ता. राहाता) अशी ठार झालेल्या बाप-लेकांची नावे आहेत.
काकडी (ता. कोपरगाव) शिवारातील दिघे वस्तीवर शुक्रवारी (दि. 4) रात्री दरोडेखोरांनी दरोड्याच्या उद्देशाने प्राणघातक हल्ला करीत कृष्णा भोसले, साहेबराव भोसले यांना ठार मारले. तर, साकरबाई भोसले (वय 55) या गंभीर जखमी झाल्या. त्यांच्यावर प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये दरोडेखोरांनी दुचाकी आणि मोबाईल चोरून नेला. या हल्ल्यात घरातील गजुबाई मारुती दिघे या आजी बचावल्या होत्या. याबाबत राहाता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
संशयित टेम्पोमधून सिन्नरमार्गे नाशिककडे जात असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली होती. त्यानुसार पथकाने पळशी टोलनाका, सिन्नर येथे सापळा रचून संशयितांना टेम्पोमधून ताब्यात घेतले. संदीप दहाबाड, जगन किरकिरे अशी त्यांनी नावे सांगितली. त्यांच्याकडे चौकशी केली असता शुक्रवारी मध्यरात्री काकडी विमानतळ परिसरातील एका घरातील तिघांवर लाकडी दांडके, फावड्याने मारहाण केल्याची कबुली त्यांनी दिली. वरील आरोपींना तपासकामी
राहाता पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. तपास पथकास संशयित आरोपींचा शोध घेण्याकामी सिन्नर ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी मदत केली.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर, सहायक निरीक्षक हेमंत थोरात, उपनिरीक्षक तुषार धाकराव, अनंत सालगुडे, दत्तात्रय हिंगडे, बापूसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, गणेश लोंढे, संदीप दरंदले, अमृत आढाव, प्रमोद जाधव, जालिंदर माने, बाळासाहेब खेडकर, रमीजराजा आत्तार, अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, प्रशांत राठोड, भगवान थोरात, सुनील मालणकर, बाळासाहेब गुंजाळ, अरुण मोरे, उमाकांत गावडे व चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने आरोपींना अटक केली.
दूध संकलकामुळे खुनाची घटना उघडकीस
साहेबराव भोसले व कृष्णा भोसले यांच्यापैकी कोणीच शनिवारी सकाळी दूध घालण्यासाठी दूध संकलन केंद्रावर आले नाही. त्यामुळे डेअरी चालकाने त्यांच्या शेजारच्या शेतकऱ्याला फोन करून विचारपूस करण्यास सांगितले. त्यानुसार तो शेतकरी भोसले यांच्या घरी गेल्यानंतर खुनाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List