भेटीच्या वेळेतही अधिकाऱ्यांची लोकांना टांग; कामचुकार बाबूंना खुलासा करण्याचा आयुक्तांचा आदेश
पिंपरी-चिंचवड महापालिकेत अनेक नागरिक कामासाठी येत असतात. मात्र, त्यांना अधिकारी भेटत नाहीत. त्यामुळे आयुक्त शेखर सिंह यांनी नागरिकांना भेटीसाठी अधिकारी उपलब्ध व्हावेत, यासाठी वेळ ठरवून दिली. मात्र, आता या भेटीच्या वेळेतही अनेक अधिकारी कार्यालयात उपस्थित नसतात. या कामचुकार अधिकाऱ्यांना आयुक्तांनी दोन दिवसांत लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
याबाबत सामान्य प्रशासन विभागाने पाहणी केली असून त्यामध्ये तब्बल 34 अधिकारी भेटीच्या वेळी जागेवर नसल्याचे दिसून आले आहे. महापालिकेचे कार्यालयीन कामकाज सकाळी दहा ते सायंकाळी पावणेसहापर्यंत सुरू असते. या वेळेत विविध कामानिमित्त नागरिक महापालिकेच्या विविध कार्यालयांत, विविध अधिकाऱ्यांकडे येत असतात; परंतु अधिकारी कार्यालयात गैरहजर असल्याने त्यांना भेटण्यासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात.
याबाबत तक्रारी वाढल्याने आयुक्त सिंह यांनी नागरिकांना भेटण्यासाठी सोमवार, बुधवार आणि शुक्रवार हे तीन दिवस दुपारी तीन ते सहा ही वेळ निश्चित केली. त्यानुसार कार्यालयात नागरिकांसाठी उपलब्ध राहण्याचे निर्देश दिले. आयुक्तांच्या सूचनेनुसार सामान्य प्रशासन विभागाच्या तपासणी पथकाने सर्व कार्यालयांची पाहणी केली. त्यामध्ये 34 अधिकारी एकपेक्षा अधिक वेळा गैरहजर असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांना लेखी खुलासा सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच यापुढे नागरिकांना भेटण्याच्या वेळेत अधिकाऱ्यांनी कार्यालयात उपस्थित राहावे, अन्यथा कारवाई करणार असल्याचा इशारा आयुक्तांनी दिला आहे.
याबाबत सामान्य प्रशासन विभागाचे उपायुक्त विठ्ठल जोशी म्हणाले, ‘नागरिकांनी भेटण्यासाठी वेळ निश्चित करून दिली आहे. मात्र, अनेक अधिकारी त्याच वेळी गैरहजर असतात. त्याबाबत पाहणी केली असता तब्बल 34 अधिकारी अनुपस्थित होते. ते आपल्या कार्यालयात नव्हते. त्यांना आयुक्तांच्या आदेशानुसार नोटीस दिली असून, दोन दिवसांत लेखी खुलासा मागवला आहे. काही अधिकाऱ्यांनी खुलासा सादर केला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List