Ratnagiri News – मुंबई-गोवा महामार्गावर भोस्ते घाटात भीषण अपघात, तीन वाहनांच्या धडकेत सात जण जखमी
रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील भोस्ते घाटात तीन वाहनांचा अपघात झाल्याची घटना रविवारी घडली. सिमेंटच्या बकलरने महामार्गालगत उभ्या असलेल्या ट्रक आणि एर्टिगा कारला धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक 200 फूट दरीत कोसळला. या अपघातात सात जण जखमी झाले. गेल्या चार दिवसातील अपघाताची ही चौथी घटना आहे.
मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्याच्या हद्दीतील भोस्ते घाटात गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या सिमेंटच्या बकलरने आधी पुढे चाललेल्या एर्टिगा कारला जोरदार धडक दिली. त्यानंतर घाटात नादुरुस्त झाल्याने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली. धडक दिल्यानंतर ट्रक जवळपास 200 फूट खोल दरीत कोसळला तर एर्टिगा गाडी बकलरच्या धडकेने डिव्हायडर तोडून दुसऱ्या लेनमध्ये गेली.
या अपघातात एर्टिगा गाडीतील पाच प्रवासी तर सिमेंट बकलरमधील चालक आणि वाहक असे सात जण जखमी झाले. दोन्ही वाहनांना धडक दिल्यानंतर सिमेंटचा बकलर देखील दरीत कोसळण्याच्या स्थितीत जाऊन अडकला. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून दोन्ही लेनवरील वाहतूक धिम्या गतीने सुरू आहे. सर्व जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List