दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस यांचा मोठा निर्णय, थेट अधिकार…
Pune Deenanath Mangeshkar Hospital: पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर गंभीर आरोप झाले आहे. भाजपचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहायक असलेले सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा सुशांत भिसे यांचा मृत्यू झाला. त्या प्रकारावरुन मंगेशकर रुग्णालयाची चौकशी सुरु झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी पुन्हा यासंदर्भात महत्वाचे वक्तव्य केले.
मुख्यमंत्री काय म्हणाले?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील प्रकारानंतर यापुढे अशी प्रकरणे होऊ नये म्हणून उपाययोजना करण्यात येतील. या प्रकरणात दोषींवर कारवाई होणार आहे. आता राज्य सरकारने नेमलेली समिती सर्व पद्धतीने चौकशी करणार आहे. समिती सर्व त्रुटीमध्ये लक्ष घालणार आहे. भविष्यात अशी प्रकरणे होऊ नये म्हणून काय करावे, तेही समिती सांगणार आहे.
अहवाल आल्यावर गुन्हा दाखल करणार
अधिवेशनात कायद्यात बदल करण्यात आले आहे. काही अधिकार धर्मादाय आयुक्तांना दिले आहे. सर्व धर्मादाय व्यवस्था ऑनलाईन करणार आहोत. मुख्यमंत्री कार्यालयातील आरोग्य कक्षसुद्धा धर्मदाय आयुक्तांना जोडला जाणार आहे. दीनानाथ मंगेशकर रुग्णालय हे मंगेशकर कुटुंबियांनी खूप मेहनतीतून उभारले आहे. त्यात अनेक उपचार होतात. सर्व चूक रुग्णालयाची नाही. परंतु कालचा प्रकार असंवेदनशील होता. जोपर्यंत आम्ही नेमलेल्या समितीचा अहवाल येत नाही, तोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही. कालचे आंदोलन जनआक्रोश होता. आज ‘शोबाजी’ केली जात आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात शनिवारी आंदोलन करणाऱ्यांना लगावला.
समितीवर बच्चू कडू यांची टीका
या प्रकरणावर बच्चू कडू म्हणाले, सरकारच्या सवलतीवरती उभी असलेली काही रुग्णालये गरीब रुग्णांवर उपचार करत नाहीत. त्यामुळेच रुग्णालयांना नागरिकांच्या रोशाला सामोरे जावे लागते आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला पाहिजे. मंत्र्यासह सगळ्यांनासह आरोपी केले पाहिजे. कलेक्टर, मुख्यमंत्री, आमदार, खासदार यांच्या मुलांसाठी आरोग्याची वेगळी व्यवस्था आहे. सामान्यांना वेगळी व्यवस्था आहे. मुख्यमंत्र्यांनी चौकशी समिती नेमली. परंतु हे सगळे थोतांड आहे. हेच महाचोर आहेत हे कसे चौकशी करतील, असा प्रश्न बच्चू कडू यांनी विचारला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List