मराठीबाबत कोणी उलटसुलट केलं तर… राज ठाकरेंच्या भेटीनंतर उदय सामंत काय म्हणाले ?
महाराष्ट्रात मराठी बोललंच पाहिजे, बँकामध्येदेखील मराठी बोललं जातं की नाही याची तपासणी करा असं म्हणत मराठीच्या आग्रही भूमिकेचा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी पुनरुच्चार केला. त्यानंतर मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून अनेक ठिकाणी खळ-खट्याक सुरू आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावरून इशारा दिला होता. मराठीच्या मुद्यावरून मनसे आक्रमक असतानाच आज महायुतीचे मंत्री, शिवसेना शिंदे गटातील नेते उदय सामंत यांनी आज पुन्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. मराठीच्या मुद्यावरून राज यांची भेट घेतली. मराठी भाषिकावर काही ठिकाणी अन्याय होतो यावर राज ठाकरेंसोबत चर्चा झाली. बाकीच्या भाषेचा सन्मान आम्ही करतो तसा आपल्या भाषेचा देखील व्हावा ही राज ठाकरेंची भूमिका आहे आणि आमची देखील तीच भूमिका असल्याचे उदय सामंत म्हणाले. मराठीबाबत कोणी उलटसुलट केलं तर काय करायचं हे बैठकीत ठरवू असे उदय सामंत यांनी नमूद केलं.
काय म्हणाले उदय सामंत ?
महाराष्ट्रात मराठीसंदर्भात ज्या घडामोडी सुरू आहे, त्याच संदर्भात बोलण्यासाठी, मराठी भाषेचा मंत्री म्हणून राज ठाकरे यांनी मला बोलावलं होतं. इथे येताना मी एकनाथ शिंदेंना सांगून, त्यांची परवानगी घेऊन आलो. महाराष्ट्रामध्ये ज्या बँका, संस्थांमध्ये मराठीबाबत जो निर्णय घेतला जातो, तिथे ज्या गोष्टी घडतात, त्याचा प्रतिबंध कसा करायचा यांसदर्भात राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत. मी स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंशी बोलेन, त्यात काय सुधारणा करण्यात येतील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू असे उदय सामंत म्हणाले.
बाकीच्या भाषांचा सन्मान आम्ही करतो, तसा आपल्या भाषेचा देखील व्हावा ही राज ठाकरेंची आणि आमची देखील भूमिका आहे. मराठी भाषा सर्वांनी शिकलीच पाहिजे. राज्यातील ज्या बँका त्यांचे व्यवहार मराठीत झाले पाहिजे यासाठी सर्व समित्याची बैठक घेईन आणि काय कारवाई करता येतील याबाबत निर्णय घेऊ, असे सामंत यांनी नमूद केलं.
बालिश म्हटलं म्हणून कोणी बालिश होत नाही
बालिश लोकांना मी उत्तर देत नाही, त्यांना आमच्यात महत्व नव्हतं, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी श्रीकांत शिंदेंवर टीका केली होती. मात्र त्यांच्या या विधानावर उदय सामंत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. लोकसभेतील श्रीकांत शिंदे यांचं भाषण यांनी (आदित्य) बघितलेलं नसावं, सात-आठ टर्मचा खासदार ज्या पद्धतीने सभागृहात भाषण करतो, असं भाषण डॉ. श्रीकांत शिंदेंनी केल्यामुळे काही लोकांना पोटशूळ उठला आहे, असा टोला सामंत यांनी हाणला. कशा पद्धतीने अभ्यासू भाषण, तरूण खासदार करू शकतात, हे श्रीकांत शिंदेंनी संपूर्ण देशाला दाखवलं आहे. जे स्वत:कडून झालं नाही, ते दुसरा कोणी करत असेल तर पोटशूळ उठतो. एखाद्याने बालिश उल्लेख केला म्हणून कोणी बालीश होत नाही, असंही सामंत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List