साताऱ्यात उद्योगमंत्र्यांवर खोट्या नोटांचा पाऊस
साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक कार्यालय लोकार्पण सोहळ्यासाठी आलेल्या उद्योगमंत्र्यांचे स्वागत करण्याच्या नादात चक्क खोट्या नोटांचा पाऊस पाडण्यात आला. मात्र, या नोटा खोट्या असल्या तरी त्यावर महात्मा गांधी आणि बौद्ध स्तुपाचे चित्र असल्यामुळे त्यांचा अवमान झाल्याच्या तीव्र प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या.
साताऱ्यातील औद्योगिक वसाहतीत नव्याने स्थापन झालेल्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ प्रादेशिक अधिकारी कार्यालय नूतनीकरण व लोकार्पण सोहळ्यासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आज साताऱ्यात आले होते. त्या कार्यक्रमावेळीच ही आगळीक पाहायला मिळाली.
या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले व वरिष्ठ अधिकारी यांच्यासह साताऱ्यातील अनेक उद्योजक उपस्थित होते. या कार्यक्रमामुळे सातारच्या उद्योग जगतात उत्साहाचे वातावरण होते. कार्यक्रमासाठी उद्योगमंत्री उदय सामंत आले असता, त्यांचे स्वागत दणक्यात करण्याच्या आणि स्वागतात कोणतीही कमतरता राहू नये या नादात रंगीबेरंगी कागदाच्या तुकड्यांसह एका बाजूला सांची स्तुपाचे चित्र आणि दुसऱ्या बाजूला राष्ट्रपिता महात्मा गांधींची प्रतिमा असलेल्या दोनशे रुपयांच्या ‘चिल्ड्रन बँक ऑफ इंडिया’ असे छापलेल्या नोटा उधळण्यात आल्या.
उदय सामंत यांच्यावर उधळण्यात आलेल्या नोटा स्वागतानंतर जमिनीवर विखुरल्या होत्या. हे दृश्य पाहून अनेकांना धक्का बसला. या घटनेने राष्ट्रपुरुषांचा अवमान झाल्याच्या तीव्र प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या. एका बाजूला राष्ट्रपुरुषांकडे नतमस्तक होत असल्याचे दाखवायचे आणि दुसरीकडे भावनेच्या भरात त्यांचा अवमान होईल असे कृत्य करायचे हे सहन करण्यासारखे नाही, अशा प्रतिक्रिया या वेळी उमटल्या.
महात्मा गांधी आणि बौद्ध स्तुपाचे चित्र असलेल्या खोट्या नोटांचा वापर करून उद्योगमंत्र्यांचे स्वागत करणे हा अत्यंत निंदनीय प्रकार असून, त्यांच्या झालेल्या अवमानप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी गांधीवादी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List