भाडोत्रीचे पत्नीसोबत होते अनैतिक संबंध, पतीने त्याला जिवंत गाडला
आपल्याच घरात पेईंग गेस्ट म्हणून राहणाऱ्या व्यक्तीचे आपल्याच पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचे समजल्यानंतर पतीने त्याला जमिनीत जिवंत गाडल्याची धक्कादायक घटना हरयाणातील रोहतक येथे समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी हरदिप नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे.
बाबा मसनाथ युनिव्हर्सिटीत योगा शिक्षक असलेला जगदीप हा हरदीपच्या घरात भाड्याने राहायचा. काही दिवसांपासून जगदीपचे हरदीपच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. पत्नीच्या अनैतिक संबंधांविषयी समजताच हरदीपने जगदीपचा काटा काढायचे ठरवले. त्याने चारखी दाद्री गावात बोअरवेल खोदायची म्हणून काही लोकांना खड्डा खणण्याच्या कामाला लावले. त्यानंतर त्याने काहीतरी कारण सांगून काम थांबवले.
24 डिसेंबरला हरदीप व त्याच्या काही मित्रांनी जगदीपचे अपहरण केले. त्यानंतर त्याचे हात पाय बांधून त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याला चारखी दाद्री गावात नेऊन त्याला त्या खड्ड्यात जिवंत गाडले. जगदीप बेपत्ता झाल्यानंतर त्याच्या कुटुंबियांनी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांत दाखल केली. मात्र तीन महिने पोलिसांना जगदीपची कोणतीही माहिती मिळाली नाही. या दरम्यानच पोलिसांच्या हाती हरदीपचे फोन डिटेल्स लागले. त्यातील काही संशयास्पद गोष्टींमुळे पोलिसांनी हरदीपला ताब्यात घेतले. त्यानंतर चौकशीदरम्यान हरदीपने गुन्हा कबूल केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List