राज बब्बरच्या मुलाने हटवलं वडिलांचं आडनाव; सावत्र भावाने मारला टोमणा “नाव बदलल्याने..”
अभिनेते राज बब्बर यांचं कुटुंब गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. राज बब्बर आणि स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बरने नुकतंच गर्लफ्रेंड प्रिया बॅनर्जीशी लग्न केलं. मात्र या लग्नाला त्याने त्याच्या वडिलांना किंवा सावत्र भावंडांनाच बोलावलं नव्हतं. इतकंच नव्हे तर प्रतीकने आता त्याच्या नावातून वडिलांचं आडनावसुद्धा काढून टाकलं आहे. प्रतीक स्मिता पाटील असं त्याने नाव ठेवलंय. त्यावर आता प्रतीकचा सावत्र भाऊ आर्य बब्बरने प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिंदुस्तान टाइम्स’शी बोलताना आर्य म्हणाला, “मला फक्त इतकंच म्हणायचं आहे की स्मिता माँ ही आमचीसुद्धा आई आहे. आणि त्याला कोणाचं नाव ठेवायचं आहे किंवा कोणाचं नाही ही त्याची निवड आहे.”
“उद्या उठून मी माझं नाव आर्य बब्बरवरून आर्य किंवा राजेश करून घेईन. तेव्हासुद्धा मी बब्बरच राहीन ना. तुम्ही तुमचं नाव बदलू शकता पण अस्तित्त्व नाही. मी बब्बरच राहणार कारण माझं अस्तित्त्वच ते आहे. तुम्ही ते कसं बदलू शकता?”, असा सवाल आर्यने केला. याआधी ‘टाइम्स ऑफ इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत प्रतीकने वडिलांचं आडनाव काढण्याबद्दल रोखठोक प्रतिक्रिया दिली होती. “मला परिणामांची काळजी नाही. मी ते नाव जेव्हा ऐकतो तेव्हा मला कसं वाटतं, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे. मला पूर्णपणे माझ्या आईशी, तिच्या नावाशी आणि तिच्या वारसाशी पूर्णपणे जोडून राहायचं आहे. मी माझ्या वडिलांसारखं नाही तर माझ्या आईसारखं बनण्याचा प्रयत्न करतोय”, असं तो म्हणाला होता.
राज बब्बर हे नादिरा यांच्याशी विवाहित असताना स्मिता पाटील यांच्या प्रेमात पडले होते. या दोघांनी लग्न केलं. स्मिता पाटील यांनी प्रतीकला जन्म दिला, परंतु डिलिव्हरीच्या वेळी निर्माण झालेल्या गुंतागुंतमुळे त्यांना आपलं प्राण गमवावं लागलं. त्यानंतर राज पुन्हा त्यांची पहिली पत्नी नादिराकडे परत गेले. राज आणि नादिरा यांना आर्य हा मुलगा आणि जुही ही मुलगी आहे. प्रतीक बब्बरचंही हे दुसरं लग्न आहे. प्रिया बॅनर्जीशी लग्न करण्यापूर्वी त्याने सान्या सागरशी लग्नगाठ बांधली होती. 2019 मध्ये हे दोघं लग्नबंधनात अडकले होते. परंतु लग्नाच्या चार वर्षांतच ते विभक्त झाले. 2023 मध्ये सान्याला घटस्फोट दिल्यानंतर यावर्षी 14 फेब्रुवारी रोजी प्रिया आणि प्रतीक यांनी लग्न केलं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List