Maharashtra Budget: लाडक्या बहिणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार…
Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडला. अजित पवार यांनी कृषी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तरतूद असणारा अर्थसंकल्प सादर केला. कृषी क्षेत्रासाठी विविध योजना जाहीर केल्या. “सर्वांसाठी घरे” हे उद्दीष्ट येत्या पाच वर्षांत साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. अजित पवार यांनी अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक घोषणा केली.
एआयचे प्रशिक्षण देणार
लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केली आहे. लाडक्या बहिणींसाठी टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट सोबत राज्य सरकार करार करणार आहे. या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजे एआयचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली.
लाडक्या बहिणी अन् मुलींसाठी काय काय?
मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहे. मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
लाडक्या बहिणींना किती दिला निधी
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण” योजनेंतर्गत सुमारे 2 कोटी 53 लाख लाभार्थी महिलांना जुलै, 2024 पासून आर्थिक लाभ देण्यात येत आहे. त्यासाठी 33 हजार 232 कोटी रुपये खर्च झाला आहे. सन 2025-26 मध्ये या योजनेकरीता एकूण 36 हजार कोटी रुपये नियतव्यय प्रस्तावित आहे. या योजनेतून मिळणाऱ्या अनुदानाचा उपयोग काही महिला गटांनी आर्थिक उपक्रमासाठी बीज भांडवल म्हणून केला असून अशा गटांना आणखी प्रोत्साहन देण्यासाठी विशेष योजना हाती घेण्याचे विचाराधीन असल्याचे अजित पवार यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले. यावेळी 2100 रुपये कधी मिळणार? त्याची विचारणा काही सदस्यांनी केली. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्प होऊ द्या, असे उत्तर दिले.
दीनदयाल अंत्योदय योजना – राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानांतर्गत सुमारे 22 लाख महिलांना “लखपती दिदी” होण्याचा मान मिळाला असून सन 2025-26 मध्ये आणखी 24 लाख महिलांना लखपती करण्याचे उद्दीष्ट असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List