‘साहित्य महामंडळानं माफी मागावी’, संजय राऊत यांची मागणी; उषा तांबेंचं एका वाक्यात उत्तर
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा आरोप शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केला आहे, त्या दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखील भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलत होत्या. यावरून आता राजकारण चांगलंच तापलं आहे. शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून, पुण्यात गोऱ्हे यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं. दुसरीकडे अखिल चित्रे आणि विनायक राऊत यांनी देखील गोऱ्हे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यानंतर आता संजय राऊत यांनी तर थेट अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा उषा तांबे यांना पत्र लिहून आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दिल्लीतील साहित्य संमेलनात चर्चेत आलेले अनेक चर्चासत्र आणि परिसंवाद हे साहित्यबाह्य होते. एखाद्या राजकीय विचारसरणीच्या दबावाखाली संमेलन व त्यातील कार्यक्रमांचे आयोजन झाले. हे साहित्य महामंडळाच्या परंपरेस शोभणारे नाही. काही टिनपाट निमंत्रकांनी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठाचा गैरवापर केला, आपल्या राजकीय विरोधकांवर आरोप केले. त्याची जबाबदारी साहित्य महामंडळ घेणार आहे का? असा सवाल संजय राऊत यांनी केला होता, तसेच साहित्य संमेलन हे अशा राजकीय चिखलफेकीसाठी निर्माण केले काय व सध्याच्या साहित्य महामंडळाची त्यास मान्यता आहे काय? नसेल तर साहित्य महामंडळाने त्वरीत माफी मागावी अशी मागणी संजय राऊत यांनी पत्राद्वारे केली होती, आता या पत्राला उषा तांबे यांनी उत्तर दिलं आहे.
नेमकं काय म्हणाल्या उषा तांबे?
उषा तांबे यांनी संजय राऊत यांच्या या आरोपांना उत्तर दिलं आहे. व्यासपीठावर मुलाखतकाराने कोणता प्रश्न विचारावा याची जबाबदारी साहित्य महामंडळाकडे नाही, या सगळ्या संदर्भात काहीतरी गैरसमज झाला असावा असं त्यांनी म्हटलं आहे. तसेच संजय राऊत यांचे पत्र माझ्यापर्यंत पोहोचले नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे.
ठाकरे गट आक्रमक
दरम्यान नीलम गोऱ्हे यांनी केलेल्या त्या वक्तव्यानंतर आता ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला आहे. नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List