‘उमेदवारीसाठी सुषमा अंधारेंनी दोन कोटी घेतले’; शिवसेनेच्या नेत्याचा खळबळजनक आरोप
शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी दिल्लीमध्ये आयोजित मराठी साहित्य संमेलनामध्ये बोलताना शिवसेना ठाकरे गटावर गंभीर आरोप केले होते. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत एका पदासाठी दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या, असा खळबळजनक आरोप त्यांनी केला. गोऱ्हे यांच्या या वक्तव्यानंतर आता राजकारण चांगलंच तापलं असून, ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दुसरीकडे शिवसेनेकडून देखील शिवसेना ठाकरे गटावर जोरदार पलटवार करण्यात येत असल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी या प्रकरणावर बोलताना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे, त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे.
नेमकं काय म्हणाले गायकवाड?
निलम गोऱ्हे यांच्यावर टिका करण्याचा अधिकार ठाकरेंच्या शिवसेनेला नाही. त्या तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांच्याकडे ठोस माहिती असते, त्या अनुभवातून बोलतात. यापूर्वी देखील अनेक नेत्यांनी देवाण, घेवाणीचा आरोप केला आहे. पण बाळासाहेबांनी कधीच असं केलं नाही. सुषमा अंधारे यांनी आमच्या मतदार संघात काँग्रेसच्या उमेदवार जयश्री शेळके यांच्याकडून दोन कोटी रुपये घेऊन त्यांना उमेदवारी दिली, असा आरोप संजय गायकवाड यांनी केला आहे. संजय गायकवाड यांच्या या आरोपांमुळे आता वातावरण आणखी तापण्याची शक्यात आहे.
दरम्यान माझ्याकडे व्हिडीओ देखील होता, पण मी तो डिलीट केला. बाहेर पडणारे जे सांगतात ते खोटं नाही. ठाणे आणि सातारा पासिंगच्या दोन मर्सिडीज बेंझ ठाकरेंना मिळाल्या आहेत असा दावा गायकवाड यांनी केला आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, संजय राऊत आणि आंदोलक हा विषय फिरवत आहेत, हे बाकीच्यांसोबत घडलं आहे. संजय राऊत यांना घाणेरड्या गोष्टी बोलायची सवय आहे. संजय राऊत यांनी शहाणपणा शिकवू नये, ते स्वत:च्या घरात असणाऱ्यांना देखील मोठं करू शकत नाहीत. संजय राऊत हे शरद पवारांना शहाणपणा शिकवू लागले आहेत, गोऱ्हेंनी जे वक्तव्य केलं ते त्यांचं वयक्तिक वक्तव्य आहे. त्यामुळे पवारांना राऊतांनी शहाणपणा शिकवू नये, मीडिया हुशार आहे, असं गायकवाड यांनी म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List