मृत महिलेला जिवंत दाखवत 10 एकर जमीन हडपली; जयकुमार रावल यांच्यावर अनिल गोटे यांचा आरोप
राज्यात गडबड गोंधळामुळे सत्तेत आलेल्या महायुतीमधील मंत्र्यांचे भ्रष्टाचाराचे अनेक कारनामे उघड होत आहेत. या नावांमध्ये आता जयकुमार रावल यांच्या नावाचीही भर पडली आहे. याआधी जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप एका महिलेने केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. आता जयकुमार रावल यांच्यावर माजी आमदार अनिल गोटे यांनी खळबजनक आरोप केले आहेत. मृत महिलेला जिवंत दाखवत रावल यांनी 10 एकर जमीन लाटल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे.
गोटे यांनी आरोप केलेले प्रकरण धुळे जिल्ह्यातील आहे. धुळे जिल्ह्यात जमीन घोटाळ्याबाबत त्यांनी हा प्रकार उघडकीस आल्याचे म्हटले आहे. माजी आमदार अनिल गोटे यांनी राज्याचे पणन आणि राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांच्यावर जमीन लाटल्याबाबतचे गंभीर आरोप केले आहेत. रावल यांनी 1993 मध्ये निमगुळ गावात एका मृत महिलेच्या जागी दुसऱ्या महिलेला उभे केले मृत महिलेला जिवंत असल्याचे दाखवत तब्बल 10 एकर जमीन हडप केली आहे. शिंदखेडा न्यायालयाने या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले होते. मात्र, घटनेला 14 वर्षे उलटूनही अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही, असे गोटे यांनी म्हटले आहे.
माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेऊन या घोटाळ्याची माहिती दिली. निमगुळ येथील जयचंद्र अॅग्रो इंडिया कंपनीने 1993 मध्ये 10 एकर जमीन खरेदी केली होती. त्यावेळी, जमीनीची मालकी असलेल्या महिलेचा मृत्यू झाला होता. मात्र, जमीन खरेदीचा व्यवहार पूर्ण करण्यासाठी मृत महिलेच्या जागी दुसऱ्या महिलेला उभे करण्यात आले आणि बनावट कागदपत्रे तयार करून जमीन हडपण्यात आली, असा आरोप गोटे यांनी केला आहे.
मंत्री रावल यांनी त्यांच्या पदाचा आणि अधिकाराचा गैरवापर करत जमीन त्यांच्या नावावर करून घेतली आणि संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर करण्यासाठी अधिकाऱ्यांवर दबाव आणला. न्यायालयाने 14 वर्षांपूर्वी या प्रकरणात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते, परंतु अद्याप त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही, असेही गोटे यांनी स्पष्ट केले. मृत महिलेचा जिंवत दाखवत 10 एकर जमीन रावल यांनी हडप केली आहे. मंत्री रावल यांनी हे प्रकरण दाबण्यासाठी आपल्या राजकीय शक्तीचा वापर केल्याचा आरोप गोटे यांनी केला.
एका मंत्र्याने मृत महिलेच्या जागी दुसऱ्या महिलेची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली ही अतिशय गंभीर बाब आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही पोलिस प्रशासन कारवाई करण्यास टाळाटाळ करत आहे. यावरून राज्यात सत्तेचा कसा गैरवापर होत आहे हे दिसून येते, असे अनिल गोटे यांनी म्हटले आहे. रावल यांच्यावर भ्रष्टाचार, जमीन हडप आणि सत्तेचा गैरवापर असे अनेक गुन्हे दाखल आहेत. पण प्रत्येक वेळी ते आपल्या राजकीय अधिकाराचा गेरवापर करत खटले दाबतात, असेही गोटे म्हणाले. या प्रकरणाबाबत ते मुख्यमंत्री आणि राज्यपालांना भेटून निष्पक्ष चौकशीची मागणी करणार असल्याचे गोटे म्हणाले. या प्रकरणी लवकरच कारवाई न झाल्यास मोठे आंदोलन करण्याची तयारी करू, असा इशाराही त्यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List