शिवसेनाप्रमुखांचा आवाज घुमला!
कालिदास नाट्यगृहातील ‘निर्धार शिबिरा’त हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ज्वलंत विचारांची क्लिप दाखविण्यात आली. यातील बाळासाहेबांचा आवाज शिवसैनिकांच्या हृदयाला भिडला. बाळासाहेबांनी सुरुवातीलाच थेट गद्दारांवर घाव घातला. ‘सध्या काय चाललंय माझ्या महाराष्ट्रात? हे असले दळभद्री प्रकार मुर्दाडासारखे सहन करताय तुम्ही? अरे याचसाठी मी शिवसेना स्थापन केली का? असे सवाल करीत बाळासाहेबांनी गद्दारांचा समाचार घेतला व गद्दारांना गाडण्याचे आवाहन शिवसैनिकांना केले.
मराठी बाणा हे शिवसेनेचे बाळकडू असून हा बाणा जपतानाच आम्ही हिंदुत्वाची तलवार धर्म रक्षणासाठी उपसली, याची आठवण करून देत बाळासाहेबांच्या प्रखर विचारांनी शिवसैनिकांमध्ये अन्यायाविरोधात लढण्याचे स्फुल्लिंग चेतवले. आजचे ढोंगी हिंदुत्ववादी मीच लावलेल्या झाडांची फळे खाताहेत. इंग्रजांनी दीडशे वर्षांत जेवढा महाराष्ट्र लुटला नसेल त्यापेक्षा पाच वर्षात गुजरातच्या दोघांनी लुटला आहे, असा हल्ला बाळासाहेबांनी मोदी-शहा जोडगोळीवर चढवला. मराठी अस्मितेसाठी लढलेल्या शिवसैनिक आणि 106 हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण करून दिली.
गद्दारांनी जिवंतपणे पाठीवर वार केलेच आणि मृत्यूनंतरही घाव घालणे सुरू आहे. मात्र गद्दारांच्या फितुरीची निष्ठेच्या वणव्यात राखरांगोळी होईल. विधानसभा पैशांच्या जोरावर जिंकली. आता मुंबई महापालिका विकत घेण्याचे षड्यंत्र रचले आहे. माझा शिवसैनिक हे कदापि घडू देणार नाही, असा विश्वास व्यक्त करीत ‘मी तुमच्या पाठीशी उभा आहे’ असे भावनिक उद्गार बाळासाहेबांनी काढले. शिवसैनिकांनी उभे राहून टाळ्यांनी दाद दिली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List