शपथ घ्या… बटेंगे नही, कटेंगे नही… फुटेंगे तर अजिबात नाही ! उद्धव ठाकरे यांचे जोशपूर्ण मार्गदर्शन… शिवसैनिक रिचार्ज!!
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यांना आजपासून ईशान्य मुंबईतून शुभारंभ झाला. आज पहिल्याच मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जोशपूर्ण मार्गदर्शनाने शिवसैनिक पुन्हा रिचार्ज झाले. भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा असे आवाहन करतानाच, ‘बटेंगे नही, कटेंगे नही… फुटेंगे तर अजिबात नाही,’ अशी शपथ घेऊन महानगरपालिका निवडणुकीसाठी कामाला लागा, असे आदेशच उद्धव ठाकरे यांनी दिले. निवडणूक कधीही लागो, पक्ष देईल तो उमेदवार निवडून आणण्याचा निर्धार करा, असे उद्धव ठाकरे म्हणताच मुलुंडचे कालिदास नाटय़गृह शिवसेनेच्या जयघोषाने दुमदुमवून शिवसैनिकांनी प्रतिसाद दिला.
शिवसेना ईशान्य मुंबईच्या वतीने आणि आमदार सुनील राऊत यांच्या पुढाकाराने हे निर्धार शिबीर आयोजित करण्यात आले होते. हिंदुस्थान-न्यूझीलंड क्रिकेटचा अंतिम सामना असतानाही या शिबिरासाठी सुरुवातीपासून खचाखच गर्दी होती. उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनाने शिवसैनिकांमध्ये चैतन्य निर्माण झाले.
ही लढाई पक्षाची किंवा राजकीय लढाई नाही, ही लढाई मातृभाषेच्या आणि महाराष्ट्राच्या अस्मितेची, महाराष्ट्र धर्माच्या अस्तित्वाची लढाई आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांमध्ये अंगार फुलवला. रामदास स्वामी म्हणाले होते, मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेही 1966 साली तेच म्हणाले होते. मराठा-मराठेतर, शहाण्णव कुळी-ब्याण्णव कुळी, ब्राह्मण-ब्राह्मणेतर, स्पृश्य-अस्पृश्य, घाटी-कोकणी हे सर्व भेदाभेद गाडून मराठी माणसाची भक्कम एकजूट बांधा, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई महापालिकेची निवडणूक कधीही लागेल, अगदी आता लागली तरी शिवसेना तयार आहे, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. शिवसैनिकांना उद्देशून ते म्हणाले की, आता बंडखोऱ्या करायच्या नाहीत, चालणार नाहीत. कारण ही लढाई आपल्या आईच्या अस्तित्वाची आहे. आईशी बेइमानी करू नका. आईशी गद्दारी करू नका. ज्या आईने आपल्याला जन्म दिला, मोठे केले तिच्याशी गद्दारी करणारा कधीही तिचे नाव घ्यायला लायक नसतो.
दुबईत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यात आज अंतिम सामना असतानादेखील या निर्धार मेळाव्याला कालिदास नाटय़गृह खचाखच भरलेले होते. त्याबद्दल उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांचे काwतुक केले. स्कोअर किती झाला असा मिश्कील प्रश्न त्यांनी यावेळी केला असता सभागृहात हशा पिकला. स्कोअरची चिंता नाही, आपल्याला विरोधकांची दांडी उडवायचीय असे ते म्हणताच टाळय़ांचा प्रचंड कडकडाट झाला.
यापूर्वीची हिंदुस्थान-पाकिस्तान मॅचही दुबईत झाली होती. त्यावेळी बाळासाहेबांचे विचार मानणाऱया तथाकथित लोकांची कार्टीही तिथे गेली होती. निर्लज्जपणे फोटोही टाकले होते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर पाकिस्तानी खेळाडूच्या बाजूला बसले होते. घराणेशाही नाही, पण डॉन ब्रॅडमन, सुनील गावसकर, विराट कोहली यांना ज्यांनी शिकवले ते सन्माननीय जय शहाही होते असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी गद्दारांसह अमित शहांचे चिरंजीव जय शहांचीही खिल्ली उडवली. याच जय शहाच्या जागी जर उद्धव ठाकरे किंवा आदित्य ठाकरे असते तर भाजपवाल्यांची नरकात गेलेली पित्रं बाहेर येऊन त्यांनी थयथयाट घातला असता. कारण पुण्यात्मे स्वर्गात जातात, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.
भाजप हिंदुत्ववादी आहे, देशप्रेमी आहे हेच फेक नरेटिव्ह आहे, असा जोरदार हल्लाही यावेळी उद्धव ठाकरे यांनी चढवला. पाकिस्तान आपल्या देशाबरोबर सरळ वागत नाही तोपर्यंत पाकिस्तानबरोबर कोणतेही, अगदी खेळाचेही संबंध ठेवायचे नाहीत, असे भाजप नेत्या सुषमा स्वराज बोलायच्या. बांगलादेशमध्ये हिंदूंचा छळ होतोय, पण भाजपवाले पाकिस्तान, बांगलादेशबरोबर क्रिकेट खेळतात आणि शिवसेनेला हिंदुत्व, देशप्रेम शिकवतात, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
उद्धव ठाकरे यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही आसुड ओढले. स्वातंत्र्यलढय़ाशी ज्यांचा सूतराम संबंध नाही अशा लोकांकडे देशाची सूत्रे गेली आहेत, असे ते म्हणाले. संघवाल्यांचा काठय़ा घेऊन गच्चीत बसणारे तथाकथित हिंदुत्ववादी असा उल्लेख त्यांनी केला. आरएसएसवाले गच्चीत काठय़ा घेऊन बसतात, त्या काठ्या कपडे वाळत घालायला ठीक आहेत. पाकिस्तानविरोधात युद्ध सुरू असताना घराच्या गच्चीतून लाठय़ाकाठय़ा घेऊन देशप्रेम शिकवणारे लोक आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले. देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी संघाचा संबंध नाही तसाच संयुक्त महाराष्ट्राच्या लढय़ाशीही काहीच संबंध नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
गद्दार मिंधे प्रयागराजला जाऊन दाढी बुडवून आले आणि उद्धव ठाकरे गेले नाहीत असा आरोप केला, पण मी ठरवलेच होते, आम्ही सरसंघचालक मोहन भागवत यांचे फॉलोअर आहोत. ते कुंभस्नानासाठी गेले असते तर पाठोपाठ आपणही जायचे आणि डुबकी मारायची, पण ते गेलेच नाहीत म्हणून मीसुद्धा गेलो नाही आणि मी गेलो नाही म्हणून शिवसैनिक गेले नाहीत, असा मिश्कील टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.
भाजपला फक्त एकाधिकारशाही पाहिजे. भाजपचे ‘एक विधान एक निशाण एक प्रधान’ हे शिवसेनेलाही चांगले वाटले होते. पण एक विधान म्हणजे यांच्या बुरसटलेल्या हिंदुत्वाचे विचार आम्हाला मान्य नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आम्हाला मान्य आहे. एक निशाण म्हणजे आम्हाला डौलाने फडकणारा तिरंगा हवा आहे आणि एक प्रधान म्हणजे लोकशाही पद्धतीने निवडून आलेला पंतप्रधान आम्हाला हवा आहे.
महाराष्ट्राला आपण दगडांच्या देशा म्हणतो. हो आम्ही दगड आहोत. प्रबोधनकार म्हणायचे, शेंदूर फासला तर तो देव नाहीतर तो धोंडा आहे. आम्ही धोंडे आहोतच. जो महाराष्ट्राच्या वाटय़ाला जाईल त्याचा कपाळमोक्ष केल्याशिवाय राहणार नाही.
शिवसेनेसंदर्भातील खटल्याचा निकाल अजून लागला नाही. त्यावरूनही उद्धव ठाकरे यांनी या वेळी भाष्य केले. पुढच्या वर्षी परत या असे न्यायाधीश बदलताहेत, पण केसचा निकाल लागलेला नाही. आता त्याचा सुवर्ण महोत्सव, अमृत महोत्सव साजरा करावा लागेल
भाजपमुक्त राम हवा
शिवसेनेला भाजपमुक्त राम हवा आहे असे सांगतानाच, आम्ही जय श्रीराम म्हणणारच, पण भाजपवाल्यांना जय शिवाजी, जय भवानी म्हणायला लावणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. भाजपवाले आता भाषिक प्रांतवाद सुरू करत आहेत. देशामध्ये आम्ही हिंदू आहेत, तर महाराष्ट्रात आम्ही मराठी आहोत, असे ते म्हणाले. महाराष्ट्रात भाजपने मिळवलेले बहुमत हे लांडीलबाडी करून मिळवलेले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
’मायमराठी’चा जयजयकार….
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या सन्मानार्थ शिवसेनेच्या निर्धार शिबिरात ‘मायमराठी’चा जयजयकार करण्यात आला. परेश दाभोळकर प्रस्तुत ‘बोल मराठी, ताल मराठी’ या मराठी वाद्यवृंद कार्यक्रमाच्या माध्यमातून मराठी गीते सादर करण्यात आली. ‘मोरया मोरया’, ‘माऊली माऊली रूप तुझे’ अशा लोकप्रिय गाण्यांच्या सादरीकरणातून कार्यक्रमाची शानदार सुरुवात झाली. मराठी गाण्यांनी शिवसैनिकांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात वाद्यवृंद कलाकारांना भरभरून दाद दिली. यावेळी काही महिलांनी ताल धरला.
शिवसेना सदस्य नोंदणीवर मार्गदर्शन
शिवसेना नेते खासदार अनिल देसाई यांनी मेळाव्यात शिवसेना सदस्य नोंदणी, नवीन मतदार नोंदणी याबाबत माहिती दिली. निवडणूक प्रक्रियेतील नव्या बदलांबाबतही त्यांनी शिवसैनिकांना जागरुक केले. या शिबिराला शिवसेना नेते विनायक राऊत, शिवसेना सचिव सूरज चव्हाण उपस्थित होते. आमदार सुनील राऊत, उपनेते दत्ता दळवी, खासदार संजय दिना पाटील, बाबा कदम, विभागप्रमुख सुरेश पाटील, रमेश कोरगावकर, विभाग संघटिका राजराजेश्वरी रेडकर, प्रज्ञा सकपाळ यांच्यासह असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिबीर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
गाफील राहू नका, सावध रहा, जागरूक रहा- संजय राऊत
शिवसेना नेते-खासदार संजय राऊत यांनीही यावेळी आपल्या खुमासदार शैलीमध्ये शिवसैनिकांना अभ्यासपूर्ण मार्गदर्शन केले. पुन्हा एकदा आम्ही लढायला तयार आहोत असे उद्धव ठाकरे यांना शिवसैनिकांच्या वतीने अभिवचन देतानाच, भविष्यातील लढाईमध्ये गाफील राहून चालणार नाही, सावधान आणि जागरूक राहिले पाहिजे असे आवाहन संजय राऊत यांनी यावेळी शिवसैनिकांना केले. विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्या पध्दतीने घोटाळा करून भाजपा जिंकली त्याची विस्तृत माहितीही त्यांनी यावेळी दिली.
बाळासाहेबांना अपेक्षित असलेला शिवसैनिक या विषयावर संजय राऊत यांनी मार्गदर्शन केले. निर्धार मेळाव्यात ठाण मांडून बसलेल्या शिवसैनिकांचं काwतुक करत हाच शिवसैनिक बाळासाहेबांना अपेक्षित असल्याचे ते म्हणाले. पूर्वी शाखाशाखांमध्ये सामाजिक कार्यक्रम व्हायचे, रक्तदान शिबिरे व्हायची तशी मधल्या काळात झाली नाहीत. ते उपक्रम पुन्हा सुरू करत नाही तोपर्यंत पक्षाची पुनर्बांधणी होणार नाही असे ते म्हणाले. हा निर्धार मेळावा फक्त मुंबईला नाही तर या संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला आणि शिवसेनेला दिशा देणारा आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना हे बीज लावले आहे, ते कुणालाही उखाडता येणार नाही असे संजय राऊत म्हणाले. आता आदेशाचीही वाट बघू नका, अंगावर आला की शिंगावर घेऊन ठोका, तरच महाराष्ट्र आणि मुंबई वाचेल असे ते शिवसैनिकांना म्हणाले. शिवसेनेला लागलेली गद्दारीची कीड, बेईमानीची वाळवी संपवायची असेल तर शिवसैनिकांनी बाहेर पडले पाहिजे. शिवसैनिक वारुळातून बाहेर पडतील त्या दिवशी गद्दार बिळात गेल्याशिवाय राहणार नाहीत, असे संजय राऊत पुढे म्हणाले.
शिवसेना ही गरुड पक्ष्यासारखी आहे. ती जमिनीवर वाघ असते आणि ती जेव्हा ती उड्डाण घेते तेव्हा तो गरुड पक्षी असतो. या दोघांचा पराभव करता येत नाही, अशा प्रकारचा शिवसेनेचा आत्मा आहे, असेही संजय राऊत म्हणाले. आपण मारामाऱया करू, संघर्ष करू, लढू, विधानसभेत लढे देऊ पण यापुढे सावधान आणि जागरूक असल्याशिवाय राजकीयदृष्टय़ा लढाई लढता येणार नाही. कारण ही कागदावरची लढाई आहे आणि ती लढण्यासाठी भाजप व संघवाले काम करताहेत आणि आपला विजय चोरून नेत आहेत, असे सांगत संजय राऊत यांनी शिवसैनिकांना सावध केले. विधानसभेत झालेली चूक परत होता कामा नये, असेही ते म्हणाले.
अख्ख्या भाजपचीच काँग्रेस झाली आहे
इलेक्शन फोटो आयटेंटिटी कार्ड (एपिक) मध्ये घोटाळे करून भाजपने महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणातील विधानसभा जिंकल्याचे यावेळी संजय राऊत यांनी स्पष्ट करून सांगितले. अख्या भारतीय जनता पक्षाची काँग्रेस झालेली आहे. भारतीय जनता पक्षात 80 टक्के लोक काँग्रेसचे आहेत. स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेसने सहभाग घेतला म्हणून स्वातंत्र्य मिळालं, ते स्वातंत्र्य भाजपला चालतं. पण शिवसेनेने तुमच्याशी लढण्यासाठी काँग्रेसची मदत घेतली म्हणून भाजपच्या अंगाचा तीळपापड होतोय. सगळे भ्रष्टाचारी काँग्रेसवाले भाजपमध्ये आहेत. अजित पवार असतील, अशोक चव्हाण असतील, राधाकृष्ण विखे पाटील असतील, सगळे भ्रष्ट काँग्रेसवाले भाजपमध्ये आहेत आणि भाजपवाले शिवसेनेकडे बोट दाखवतात, असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.
मराठी बाणा, हिंदुत्वासाठी लढणे हाच शिवसेनेचा आत्मा! अंबादास दानवे यांचे शिवसैनिकांना आवाहन
शिवसेना आणि हिंदुत्व एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. मराठी आणि हिंदुत्वासाठी लढणे हाच शिवसेनेचा आत्मा आहे, शिवसैनिकांनी आपला मराठी बाणा आणि हिंदुत्वासाठी लढले पाहिजे, भाजपच्या उन्मत्त शक्तीला चिरडले पाहिजे, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिवसैनिकांना केले.
शिवसेनेच्या ‘निर्धार शिबिरा’मध्ये ‘संघटनेचा आत्मा आणि पुनर्बांधणी’ विषयावर अंबादास दानवे यांनी आपले विचार मांडले. शिवसेनेचे काम सतीच्या वाणासारखे आहे. प्रत्येक शिवसैनिकाने ते निःस्वार्थ भावनेने आणि प्रामाणिकपणे निभावले पाहिजे. अन्याय-अत्याचाराविरोधात पेटून उठले पाहिजे, मराठीचा अवमान कोणी करणार असेल तर तो अजिबात खपवून घेऊ नका, शिवसैनिकांनी देव-देश-धर्मासाठी निर्भीडपणे लढायचे, असे ते म्हणाले. याचवेळी त्यांनी सत्ताधाऱयांवर हल्लाबोल केला. हिंदुत्वाचा दिखावा करणारे एखादी घटना घडली की शेपूट घालून पळतात. ते आम्हाला हिंदुत्व काय शिकवणार? हे सत्ताधारी चिल्लर आहेत, असा घणाघात त्यांनी चढवला. कुठलीही संघटना संपत नसते. शिवसेनाही आपली पूर्वीची ताकद लवकरच दाखवून देईल. भाजपला जागेवर बसवणे कठीण काम नाही. आपण विधानसभेच्या 288 व लोकसभेच्या 48 जागा लढवून भाजपचे पानिपत करू, असा विश्वास दानवे यांनी यावेळी व्यक्त केला.
आम्ही शिवसेनेत आलो कारण…
फोडोफोडीचे राजकारण करून शिवसेनेची संघटनात्मक बांधणी डळमळीत करण्याचे उद्योग भाजप-मिंधेंच्या ’महायुती’कडून सुरु आहेत. त्यांच्या षडयंत्राला धक्का देत अनेकजण शिवसेनेत प्रवेश करीत आहेत. ’खरी शिवसेना कोण?’ याचा फैसला जनतेच्या दरबारात झाला आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून इतर पक्षातील मोठे नेते शिवसेनेत दाखल झाले आहेत. त्यापैकी पुण्याचा ‘ढाण्या वाघ’ म्हणून ओळख असलेले वसंत मोरे, अहिल्यानगरचे किरण काळे, श्रीगोंद्याचे साजन पाचपुते यांनी ‘मी शिवसेनेत का आलो?’ या मुलाखत कार्यक्रमात बोलताना शिवसेनेविषयी असलेली आत्मीयता व्यक्त केली.
माझा डीएनए’च शिवसेनेचा – वसंत मोरे
‘मी शिवसेनेत का आलो?’ या मुलाखतकार किरण खोत यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे राज्य संघटक वसंत मोरे यांनी, माझा ‘डीएनए’च शिवसेनेचा आहे, असे उत्स्फूर्त उत्तर दिले. शालेय जीवनापासून माझे शिवसेनेशी नाते आहे. शाळेत असताना मी पुस्तक, वहीच्या पानावर ‘जय महाराष्ट्र’ लिहायचो. ज्यावेळी मला राजकारणाचा ‘रा’ माहित नव्हता, तेव्हापासून शिवसेना आणि हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांबद्दल माझ्या मनात नितांत आदराची भावना आहे. याच भावनेने मी पुन्हा शिवसेनेत आलो आहे. आता जोपर्यंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पुण्याच्या महापौर दालनात बोलावणार नाही, तोपर्यंत मी शांत बसणार नाही, असा निर्धार वसंत मोरे यांनी व्यक्त केला.
खरे हिंदुत्व तर मातोश्रीकडेच – किरण काळे
मी नुकताच शिवसेनेत प्रवेश केला आणि काही दिवसांत मला इथे मोठया मंचावर बसण्याचा बहुमान दिला आहे. शिवसेनेची हीच खासियत आहे. शिवसेना अशाप्रकारे घट्ट नाते जपणारा पक्ष आहे. मला शिवसेनेशी खूप वर्षांचे जुने नाते असल्यासारखे वाटतेय. 23 फेब्रुवारीला शिवबंधन बांधले. पण त्याआधीपासूनच माझ्या शरीरात शिवसेना आहे. मी काँग्रेसमध्ये असताना त्यावेळी शिवसेनेच्या दिवंगत नेत्याचा फोटो लावला होता. त्यावेळी माझ्यावर नाराजी व्यक्त केली गेली. मात्र माझा डीएनए शिवसेनेचा असल्यामुळे मी खचलो नाही. औरंग्याच्या कबरीबाबतची देशातील सध्याच्या सरकारची भूमिका सर्वांनाच ज्ञात आहे. ते हिंदुत्वाचे ढोंग करताहेत. खरे हिंदुत्व तर मातोश्रीकडेच आहे, असे किरण काळे म्हणाले.
शिवसेनेत माझा जीव गुंतलाय – साजन पाचपुते
मी शिवसेनेत आलो, ते कुठल्याही पदाची अपेक्षा वा इतर कुठलाही स्वार्थ ठेवून नाही. मी सामान्य माणूस आहे. शिवसेनेत सामान्य कार्यकर्त्याची किती चांगली कदर केली जाते, याचा अनुभव घेतला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहज कुणाला भेट देत नाही, असे बोलले जाते. ते साफ खोटे आहे. कारण मी सामान्य कार्यकर्ता असूनही मला ते चारवेळा भेटले. शिवसेना नेते संजय राऊत यांना आम्ही मध्यरात्री कॉल केला, त्या कॉललाही त्यांनी उत्तर दिले. त्यामुळे शिवसेना नेते भेटत नाही ही ओरड पूर्णपणे खोटी आहे. मी आता माझ्या कार्याची सुरुवात शिवसेनेतून केली असून अखेरचा श्वास असेपर्यंत शिवसेनेतच राहीन, अशी भावना साजन पाचपुते यांनी व्यक्त केली.
कोस्टल रोड हे शिवसेनेचे कर्तृत्व
देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, कोस्टल रोड हे कर्तृत्व फडणवीसांचे नाही, शिवसेनेचे आहे. त्याचे भूमिपूजन मुख्यमंत्री असताना माझ्या हस्ते झाले होते. शिवडी-न्हावा शेवा जो लिंक रोड आहे तोसुद्धा जरी फडणवीसांनी सुरू केला असला तरी त्याचा पहिला गर्डर मी मुख्यमंत्री असतानाच टाकला गेला होता. कोरोना काळातही आपण मेट्रो, कोस्टल रोडचे काम बंद पडू दिले नव्हते. फडणवीसांना आयुष्यात जमल्या नसत्या एवढय़ा सेवासुविधा महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राला उपलब्ध करून दिल्या होत्या. फक्त फडणवीसांसारखी मालकांच्या मित्रांची हुजरेगिरी केली नाही, असे उद्धव ठाकरे यांनी या वेळी छातीठोकपणे सांगितले.
फडणवीसांना मी आव्हान देतोय. उद्या राज्याचा अर्थसंकल्प सादर होतोय. हिंमत असेल तर मी जशी माझ्या शेतकऱयांना कर्जमुक्ती दिली होती तशी कर्जमुक्ती तुम्ही करून दाखवा!
फडणवीस… तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही
देवेंद्र फडणवीस यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी सडकून टीका केली. फडणवीस परवा म्हणाले, कामांना स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का… तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही. हेच तर तुमचे दुःख आहे. माझ्या राज्याचे नुकसान करून मालकाच्या मित्राचे खिसे भरणाऱया कामांना नुसती स्थगितीच नव्हे तर ठामपणे नकार द्यायला, तिथे उद्धव ठाकरेच पाहिजे. ते देवेंद्र फडणवीस, येडय़ागबाळ्याचे काम नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले. आरेमधील कारशेडला आपण नक्कीच स्थगिती दिली होती आणि सरकार राहिले असते तर कांजूरमार्गची जी जागा अदानीच्या घशात घातली तिथे कारशेड उभारले असते, असे ते म्हणाले.
राज्य तर आणणारच
राज्य तर मी आणणारच, असंतसं सोडणार नाही, असा ठाम विश्वासही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. वचननाम्यात दिलेली वचने पूर्ण करणारच, महाराष्ट्राच्या प्रत्येक जिह्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर उभारणार म्हणजे उभारणारच, असे ते म्हणाले.
- मुख्यमंत्री पद एका क्षणात मी सोडले होते. माझा प्राण वर्षा बंगल्यामध्ये नाही, शिवसैनिकांमध्ये आहे. मुख्यमंत्री पद गेल्याच्या यातना नाहीत, पण कडवट शिवसैनिक दुर्दैवाने गैरसमजातून शिवसेना सोडून जातो तेव्हा खूप यातना होतात.
अनाजी पंतांच्या बापाने मराठी माणसाला मुंबई दिलेली नाही
घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे म्हणत मराठी भाषेचा अवमान करणारे संघाचे ज्येष्ठ नेते भैयाजी जोशी यांचाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी पुन्हा समाचार घेतला. मराठी माणसाने लढून मुंबई मिळवली आहे. अनाजी पंतांच्या बापाने दिलेली नाही, असे ते कडाडले. ‘छावा’ चित्रपट पाहायला जाणाऱया भाजपवाल्यांनाही त्यांनी सुनावले. भाजपवाल्यांचे कर्तृत्व काय? त्यामध्ये त्यांचा काय संबंध? अनाजी पंताने भगव्याला डाग लावलेला पाहायला जायचे असेल तर जा, असाही टोलाही त्यांनी लगावला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List