लाडक्या बहिणींना आणखी एक गिफ्ट, होळीनिमित्त महायुती सरकारच्या निर्णयाने बहिणींच्या आनंदात भर
Antyodaya Ration Card: महायुती सरकारने लाडक्या बहिणींवर लक्ष केंद्रीत केले आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांना परिवहन महामंडळाच्या बसेसमधून अर्ध्या तिकिटावर प्रवास करण्याची योजना आणली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी लाडकी बहीण योजना आणत १५०० रुपये महिलांच्या खात्यात देणे सुरु केले. त्यामुळे महिलांनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरुन मतदान केले. आता महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारनेही महिलांवर लक्ष केंद्रीत केले आहे. होळीच्या निमित्ताने रेशन दुकानातून साड्यांचे वाटप होणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारक महिलांना साड्या दिल्या जाणार आहे. त्यासंदर्भातील आदेश राज्याच्या पुरवठा विभागाने काढले आहेत.
लाडक्या बहिणींना साडी भेट देण्याचा निर्णय झाल्यानंतर राज्य यंत्रमाग महामंडळाद्वारा अंत्योदय शिधापत्रिकाधारक कुटुंबांच्या यादीनुसार साड्यांचे गठ्ठे तयार केले. प्रत्येक तालुक्यातील रेशन दुकानात पोहोचवण्यात येणार आहेत. होळीपर्यंत प्रत्येक लाभार्थी कुटुंबांना एक साडी दिली जाणार आहे.
अशी मिळणार साडी
लाभार्थी महिलांनी रेशन दुकानात जाऊन ई-पॉस मशीनवर अंगठा ठेवल्यानंतर त्यांना एका कार्डवर एक साडी दिली जाणार आहे. राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागातर्फे यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे.
जळगावात सणापूर्वी साडी मिळणार
जळगाव जिल्ह्यात रेशन दुकानावर अंत्योदय शिधापत्रिका असलेल्या कुटुंबातील १ लाख ३५ हजार ३०२ महिलांना होळी सणापूर्वीच साडी मिळणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण व शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी गायकवाड यांनी दिली.
महिलांनी होळी निमित्त साडी मिळणार असल्यामुळे लाडक्या बहिणी आनंदात आहे. परंतु साडीचा दर्जा चांगला असावा, अशी अपेक्षा महिलांकडून व्यक्त केली जात आहे. महिलांना त्यांच्या आवडत्या रंगाच्या आणि चांगल्या दर्जाच्या साड्या मिळतील की सरसकट एकाच प्रकारच्या साड्या मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List