सिडकोने सहा वर्षांचा दोन लाख मेंटेनन्स एकत्र पाठवला, बीले पाहून साडेतीन हजार कुटुंबांना धक्का
खारघर येथील स्वप्नपूर्ती वसाहतीमध्ये राहणाऱ्या साडेतीन हजार कुटुंबांना सिडकोने मोठा धक्का दिला. गेल्या सहा वर्षांचा मेंटेनन्स (देखभाल, दुरुस्ती खर्च) सुमारे दोन लाख रुपये एकदम भरण्याची नोटीस सिडकोच्या खारघर नोडच्या सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यांनी रहिवाशांना पाठवली आहे. अचानक आलेल्या या नोटिसीमुळे अल्प उत्पन्न गटातील या रहिवाशांचे डोळे पांढरे झाले आहेत. हा थकलेला मेंटेनन्स भरण्यासाठी सिडकोने येत्या 31 मार्चची डेडलाईन दिली असून इतकी मोठी रक्कम 20 दिवसांत कशी उभी करायची, हा प्रश्न रहिवाशांसमोर उभा राहिला आहे.
खारघर येथील सेक्टर 36 मध्ये सिडकोने अत्यल्प आणि अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांसाठी स्वप्नपूर्ती ही वसाहत तयार केली आहे. सुमारे साडेतीन हजार सदनिका असलेल्या या वसाहतीमधील घरांचा ताब्या देण्याची सुरुवात 2017 पासून झाली. ताबा देताना सिडकोने रहिवाशांकडून दोन वर्षांचा मेंटेनन्स आगाऊ घेतला होता. त्यानंतर सिडको येथे गृहनिर्माण सोसायटी स्थापन करणार होती. मात्र ही सोसायटी स्थापन करण्यात सिडकोला अपयश आले. त्यामुळे मेंटेनन्स किती भरायचा आणि कसा भरायचा हे कोठे रहिवशांना उलगडले नाही. आता सिडकोने अचानक 2019 पासून ते 2025 पर्यंतचा मेंटेनन्स रहिवाशांना एकदम पाठवला आहे. त्यानुसार प्रत्येक कुटुंबाला 1 लाख 90 हजार रुपये एकदम भरावे लागणार आहेत.
■ चांगल्या सुविधा असलेल्या सोसायटीमध्ये महिन्याचा मेंटेनन्स एक हजार रुपयांच्या आसपास असतो. मग अल्प उत्पन्न गटातील या घरांसाठी सिडकोने 2 हजार 200 ते 2 हजार 400 रुपये मेंटेनन्स कसा लावला, असा प्रश्न अनेक रहिवाशांनी उपस्थित करून याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
■ सिडको प्रशासनाने हा प्रत्येक वर्षाला किंवा सहा महिन्याला पाठवणे आवश्यक होते. मात्र तसे न करता एकदम मेंटेनन्स पाठवून रहिवाशांची झोप उडवली आहे. मेंटेनन्सची ही रक्कम कमी करून ती भरण्यासाठी सवलत देण्यात यावी, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List