वाघ गुहेत शिरला… अन् अजिंठ्याचे अद्भुत शिल्पसौंदर्य जगासमोर आले! अजिंठा लेणीच्या शोधाला सोमवारी 206 वर्षे पूर्ण
रमेश पाटील
महाराष्ट्राला शिल्पकलेचा अजोड वारसा मिळालेला आहे. बेलाग डोंगर कोरून त्यात अद्भुत असे शिल्पवैभव, चित्राकृती निर्माण करणे हे येरागबाळ्याचे काम नव्हे. कित्येक पिढ्यांनी खपून हा अनमोल वारसा आपल्याला दिला. ब्रिटिश लष्करी अधिकारी मेजर जॉन स्मिथ वाघूर नदीच्या खोऱ्यात शिकारीसाठी उतरला. शिकारी मागे लागल्याचे पाहून वाघ गुहेत शिरला आणि त्यापाठोपाठ जॉन स्मिथ ! शिकार सोडून समोरचे शिल्पसौंदर्य पाहून अवाक् झाला ! तो दिवस होता… 28 एप्रिल 1819 ! शिकारीच्या निमित्ताने हे महाशिल्प जगासमोर आले ! सोमवारी या विलक्षण शोधाला 206 वर्षे पूर्ण होत आहेत.
वाघूर नदीच्या खोऱ्यातील डोंगररांगांमध्ये पिढ्यान् पिढ्या खपून निर्माण केलेले अजिंठ्याचे शिल्पवैभव काळाच्या ओघात लुप्त झाले होते. एक अद्भुत शिल्पसंस्कृती, रंगसंस्कृती आपल्या अंगाखांद्यावर नांदत आहे याची अमृतवाहिनी असलेल्या वाघूर नदीलाही कल्पना नसावी. इंग्रज आणि मराठ्यांचे असई येथे दुसरे युद्ध झाले. तारीख होती 23 सप्टेंबर 1803. या युद्धानंतर इंग्रजांनी आपल्या जखमी सैनिकांना उपचारासाठी अजिंठ्याच्या भुईकोटातील बारादरीत आणले. तेव्हापासून या भागात इंग्रज अधिकाऱ्यांचा वावर वाढला होता. अजिंठ्याच्या जंगलात वाघ असल्याने लष्करी अधिकारी शिकारीसाठी उत्सुक असायचे. मद्रास इलाख्यातून आलेला मेजर जॉन स्मिथ शिकारीसाठी वाघूरच्या काठाकाठाने निघाला. वाघ त्याच्या नजरेस पडला. शिकारी मागे लागल्याचे पाहून वाघ एका पर्णसंभाराच्या आड बेपत्ता झाला.
वृक्षलतांच्या आड लपलेले शिल्पसौंदर्य !
लतावेलींच्या फांद्या बाजूला करून जॉन स्मिथ वाघाच्या मागे गेला आणि समोरचे शिल्पवैभव पाहून त्याची मतीच गुंग झाली! हा दिवस होता 28 एप्रिल 1819 ! जॉन स्मिथने दहाव्या क्रमांकाच्या लेणीतील एका स्तंभावर ही आठवण कोरली. आजही ती पुसटशी दिसते. त्यानंतर मेजर जॉन स्मिथने स्वतःच पुढाकार घेऊन या भागाचे उत्खनन केले आणि अद्भुत शिल्पसौंदर्याने नटलेल्या तब्बल तीस लेण्या जगासमोर आल्या.
अजिंठा लेणीचा इतिहास
अजिंठा लेण्यांची निर्मिती इसवि पूर्व 150 ते इसवि सन 100 या कालखंडातली. शिल्पकारांच्या कित्येक पिढ्या हे शिल्पवैभव निर्माण करण्यासाठी खपत होत्या. थोडाथोडका नव्हे, तर तब्बल सहाशे वर्षांचा हा काळ आहे. एकूण 30 लेण्या असून त्यातील शेवटची अर्धवट अवस्थेत आहे. अप्रतिम चित्र, हे अजिंठा लेणीचे वैशिष्ट्य ! भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग असा या चित्रांचा विषय. जातककथांनी हे चित्रविश्व व्यापले आहे. बौद्ध भिक्षूना चिंतन, मनन करण्यासाठी बाहह्यजगापासून अलिप्त पण निसर्गसौंदर्याने नटलेली ही जागा शिल्पकारांच्या नजरेत न भरती तरच नवल! पाच चैत्य आणि 24 विहार असलेले हे शिल्पवैभव 1983 मध्ये युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केले.
रॉबर्ट गिलने चितारले अजिंठा
अजिंठा लेणीचे शिल्पसौंदर्य जगासमोर आणण्यासाठी ईस्ट इंडिया कंपनीने 1844 मध्ये रॉबर्ट गिल याची नेमणूक केली. रॉबर्ट गिल हा अजिंठा लेणीच्या परिसरात राहिला. त्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अजिंठ्याच्या लेणीचे चित्रकाम केले. या कामात त्याला स्थानिक आदिवासी महिला पारोने मदत केली. 1873 मध्ये त्याने हा ठेवा तत्कालीन ब्रिटिश सरकारला सुपूर्द केला.
मेजर जॉन स्मिथ यांनी के अद्भुत शिल्पवैभव जगासमोर आणले. अजिंठा आता जागतिक वारसास्थळांच्या यादीत आहे. हे शिल्पसौंदर्य जपण्याची, हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे.
डी. एस. दानवे, पुरातत्त्व अधिकारी
अजिंठा लेणी महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. कलेचा हा अद्भुत आविष्कार जगाला भुरळ घालणारा आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांसाठी अजून सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्यास नक्कीच त्याचा उपयोग होईल.
विजय पगारे (स्थानिक इतिहास संशोधक)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List