मे महिन्याची सुरुवात होणार ‘ताप’मुक्त; ढगाळ वातावरणामुळे तापमान घटणार
एप्रिल महिना वाढत्या तापमानामुळे नागरिकांना चांगलाच तापदायक ठरला आहे. आता मे महिन्याच्या सुरुवातीला तापमानात काही प्रमाणात घट होण्याची शक्यता असून मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून तापमानात वाढ होणार आहे. तसेच मुंबई आणि परिसरात आर्द्रता वाढल्याने हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.
एप्रिल महिन्याची सुरुवात राज्यात काही ठिकाणी अवकाळी पावसाने झाली होती. त्यानंतर राज्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली. एप्रिलमध्ये वाढलेली आर्द्रता आणि स्थानिक पातळीवरील बाष्पीभवन यामुळे मुंबईतील काही भागात हलक्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे काही प्रमाणात तापमानात घट झाली आहे. मुंबईतील किमान तापमान 26.4 अंश सेल्सिअस नोंदवले आहे. हे तापमान सरासरीपेक्षा 0.2 अंशांनी कमी होते. पुढील काही दिवसांसाठी मुंबईत कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तवला आहे. यामुळे कमाल तापमान सुमारे ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान सुमारे २६ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्याच्या सुरुवातील तापमानात थोडी घट होणार आहे. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होणार आहे. तसेच यंदा 8 ते 12 जूनदरम्यान पाऊस सुरु होईल, असा अंदाज आहे. यावर्षी मुंबईत लवकर पाऊस पडेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे यंदा जून महिन्यातच मुंबईकरांची उकाड्यापासून सुटका होणार आहे.
उन्हाने तापलेल्या विदर्भातील नागरिकांना शनिवारी आकाशात दाटलेल्या ढगांनी दिलासा दिला. ढगाळ वातावरणामुळे नागपूरसह सर्व जिल्ह्यात तापमान घटले. गेल्या आठवड्यात चंद्रपूर, ब्रम्हपुरी, अकोला शहरांचा पारा 45 अंशांच्या वर गेला होता. हवामान विभागाने 27 एप्रिलपासून पुन्हा अवकाळीची स्थिती निर्माण होईल, असा अंदाज वर्तविला आहे. तसेच राज्यात ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे तापमानातही घट होत आहे. चंद्रपूरच्या तापमानात 3.4 अंशाची घसरण होत पारा 42 अंशावर आला आहे. इतर जिल्ह्यातही ढगाळ वातावरणामुळे पारा 1 ते 2 अंशाने घसरला आहे. राज्यात पुढील आठवडाभर अवकाळीची स्थिती राहणार असून वीजांच्या कडकडाटासह ताशी 50 ते 50 किमीचे वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत अशीच परिस्थिती असेल. त्यानंतर मात्र पारा पुन्हा चढेल, असा अंदाज आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List