कुछ बडा होने वाला है..! सीमेवरील लष्करी हालचाली वाढल्या, BSF ने शेतकऱ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
जम्मू-कश्मीरातील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 पर्यटकांचा मृत्यू झाला. तेव्हापासून हिंदुस्थान आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढला आहे. पाकिस्तान सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करत असून गेल्या तीन रात्रीपासून सीमेवर गोळीबार सुरू आहे. याला हिंदुस्थानी लष्करही चोख प्रत्युत्तर देत आहे. अशातच सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) शनिवारी नियंत्रण रेषेजवळील शेतकऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
येत्या 48 तासांमध्ये शेतातील पिकांची कापणी करून मैदान साफ करण्याचे तातडीचे निर्देश बीएसएफने शेतकऱ्यांना दिले आहेत. सीमेवरील हालचाली अचानक वाढल्याने कुछ बडा होनें वाला है… अशी चर्चा सुरू आहे. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. हिंदुस्थानने अटारी-वाघा बॉर्डर बंद केली असून पाकिस्तानी नागरिकांना हिंदुस्थान सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच व्हिसाही रद्द करण्यात आला आहे. अशात आता पाकिस्तान सीमेजवळ असणाऱ्या गावातील शेतकऱ्यांना 48 तासांमध्ये पिकांची कापणी करण्यास सांगण्यात आले आहे. अमृतसर, तरन तारन, फिरोझपूर, फाजिल्का येथे गुरुद्वारांमधून सूचनाही प्रसारित केल्या जात आहेत.
बीएसएफचे जवान गेल्या दोन दिवसांपासून शेतातील पिकांची कापणी करण्यास सांगत आहेत. परिस्थिती आणखी चिघळल्यास पुढे वेळ मिळणार नाही. गुरांसाठीचा चारा वर्षभर वापरला जातो. 80 टक्के गव्हाची कापणी पूर्ण झाली असून गुरांच्या चाऱ्यासाठी पेंढ्या करणे बाकी आहे. दोन दिवसात हे पूर्ण कसे होणार? असा सवाल शेतकऱ्यांना केला आहे. तसेच बीएसएफच्या इशाऱ्यामुळे शेतकरीही घाबरले आहेत, असे सीमेजवळील गावातील शेतकरी सुरजित सिंह भूरा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
दरम्यान, पहलगाम हल्ल्यानंतर हिंदुस्थान-पाकिस्तानमधील राजकीय आणि लष्करी तणाव वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांची शेतीची कामे लवकर आटोपण्यास सांगण्यात आले. हा सुरक्षेचाच एक भाग आहे. आम्हालाही शेतकऱ्यांची चिंता समजते. पण राष्ट्रीय सुरक्षा सर्वोतोपरी आहे. त्यामुळे भविष्यातील गैरसोय टाळण्यासाठी शेतकऱ्यांनीही सहकार्य करावे, असे बीएसएफच्या अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.
दरम्यान, गुरुद्वारेतील घोषणांचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अमृतसरच्या उपायुक्त साक्षी साहनी यांनी यावर प्रतिक्रिया दिली. माझी बीएसएफच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. अफवांवर विश्वास ठेऊ नका. अधिकृत माध्यमांद्वारे माहितीची पडताळणी करा, असे त्या म्हणाल्या.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List