ऑनर किलिंगनं महाराष्ट्र हादरला; सेवानिवृत्त CRPF अधिकाऱ्यानं प्रेमविवाह केलेल्या मुलीला घातल्या गोळ्या, जावई गंभीर जखमी
प्रेमविवाह केलेल्या मुलीला सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकाऱ्याने एका हळदीच्या कार्यक्रमात घुसून गोळ्या घातल्याचा धक्कादायक प्रकार जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे घडला आहे. या हल्ल्यामध्ये जावई गंभीर जखमी झाला आहे. तृप्ती अविनाश वाघ (वय – 24) असे या हल्ल्यात जागीच ठार झालेल्या मुलीचे नाव आहे, तर तिचा पती अविनाश ईश्वर वाघ (वय – 28, दोघे रा. करवंद, ता. शिरपूर, हल्ली मु. कोथरूड, पुणे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन वर्षांपूर्वी अविनाश व तृप्ती यांचा प्रेम विवाह झाला होता. तो विवाह तृप्तीच्या वडिलांना मान्य नव्हता. अविनाशच्या बहिणीचा हळदीचा कार्यक्रम शनिवारी (दि. 26) चोपडा शहरातील खाईवाडा जवळील आंबेडकर नगर येथे होता. त्यानिमित्ताने ते चोपडा येथे आले होते. तृप्तीने प्रेम विवाह केला याचा राग वडील सेवानिवृत्त सीआरपीएफ अधिकारी किरण अर्जुन मंगले (वय – 48, रा. रोहिणी ता. शिरपूर जि. धुळे) यांच्या डोक्यात होता.
चोपडा येथे हळदीचा कार्यक्रम सुरू असताना किरण मंगले तिथे आले. त्यांनी मुलगी तृप्ती वाघ हिच्यावर व तिचा पती अविनाश वाघ यांच्यावर गोळीबार केला. त्यांनी तीन राउंड फायर केले. यात मुलगी तृप्ती जागीच ठार झाली. जावई अविनाशच्या पाठीतून गोळी पोटात घुसली, तर दुसरी गोळी हाताला लागल्याने गंभीर जखमी झाला आहे. त्याला अत्यवस्थ अवस्थेत जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दरम्यान, भर हळदीच्या कार्यक्रमात गोळीबार केल्याने वऱ्हाडींचा संताप अनावर झाला. हळदीच्या कार्यक्रमात व्यत्यय आणल्याने त्यांनी गोळीबार करणाऱ्या किरण मंगलेला चांगलाच चोप दिला. त्यात तो गंभीर जखमी झाला. त्याला जळगाव येथे उपचारासाठी हलवण्यात आले. या घटनेनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List