मुंबईतील ईडी कार्यालयाच्या इमारतीत आग; सुदैवाने जीवितहानी नाही
मुंबईतील ईडी कार्यालयात रविवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट परिसरातील कैसर-ए-हिंद इमारतीत भीषण आग लागल्याचे पालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. ईडीचे कार्यालयही याच इमारतीत आहे. रात्री अडीच वाजता अग्निशमन दलाला आग लागल्याबाबत फोन आला.आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या दहाहून अधिक गाड्या घटनास्थळी पोहोचल्या. सुदैवाने यामध्ये जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
अनेक मोठ्या राजकारणी आणि व्यावसायिकांविरुद्धच्या खटल्यांच्या चौकशीशी संबंधित कागदपत्रे या कार्यालयात ठेवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहाटे 2.31 वाजता अग्निशमन दलाला करिमभोय रोडवरील ग्रँड हॉटेलजवळील बहुमजली कैसर-ए-हिंद इमारतीत आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे काम सुरू केले. अग्निशमन दलाच्या नियंत्रण कक्षाने सांगितले की, पहाटे 3.30 च्या सुमारास आग लेव्हल-2 पर्यंत वाढली होती, ती सामान्यतः मोठी आग मानली जाते.
महानगरपालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आग पाच मजली इमारतीच्या चौथ्या मजल्यापर्यंत मर्यादित होती. घटनास्थळी आठ अग्निशमन इंजिन, सहा जंबो टँकर, एक एरियल वॉटर टॉवर टेंडर, एक श्वासोच्छवास उपकरणे व्हॅन, एक बचाव व्हॅन, एक जलद प्रतिसाद वाहन आणि 108 सेवेतील एक रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List