पुणे-मुंबई ‘द्रुतगती’ वरील प्रवास कासवगतीने; वाहतूक कोंडीने प्रवासी त्रस्त
पुणे-मुंबई हा प्रवास जलद गतीने व्हावा, यासाठी द्रुतगती महामार्गाची निर्मिती करण्यात आली होती. सुरुवातीच्या काळामध्ये हा प्रवास निश्चितच जलद गतीने होत होता. मात्र, गेल्या काही वर्षांत द्रुतगतीवरील प्रवास म्हणजे प्रवासी आणि वाहनचालकांसाठी मनस्ताप ठरत आहे. सततच्या होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे द्रुतगतीवरील जलद प्रवास कासवगतीने होऊ लागल्याचे चित्र आहे.
गेल्या काही दिवसांत दर वीकेण्डला द्रुतगतीवर घाटक्षेत्रात वाहतूककोंडी होणे ही नित्याची बाब झाली आहे. खरे तर फिरायला जाण्याचे नियोजन करून पर्यटक वाहतूककोंडीपासून सुटका व्हावी, याकरिता पहाटेच घराबाहेर पडतात. मात्र, द्रुतगतीवर बोरघाट क्षेत्रात आल्यानंतर त्यांना या कोंडीमध्ये अडकून मनस्ताप सहन करावा लागत आहे. कळंबोली ते किवळे असा 94 किलोमीटर अंतराचा महामार्ग 2002 साली तयार करण्यात आला होता. या महामार्गामुळे मुंबई-पुणेदरम्यानचे अंतर एक ते दीड तासाने कमी झाले होते. मात्र, सध्या वाहनांची वाढती संख्या व खंडाळा बोरघाट परिसरामध्ये होणारी नित्याची वाहतूककोंडी यामुळे हा प्रवास खरेच जलद गती झाला आहे का? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती हा देशातील पहिला जलद गती महामार्ग म्हणून संबोधला गेला. या मार्गावर अतिवेगामुळे वारंवार अपघात होऊ लागल्याने अपघात नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. तसेच या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून अतिवेगाने जाणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई सुरू आहे. यामुळे वाहनांच्या वेगावर मर्यादा आली असून, सरासरी ताशी 80 ते 100 किलोमीटर वेगाने वाहने धावतात. वेगमयदिचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट दोन हजार रुपये दंड आकारणी ऑनलाइन पद्धतीने केली जात आहे. अनेक वेळा एकाच प्रवासामध्ये दोनपेक्षा अधिक वेळा दंडदेखील झाले आहेत. तसेच चालक व शेजारी बसणारा प्रवासी यांनी सीटबेल्ट न लावल्यास त्यांच्यावरदेखील कारवाई होत आहे.
द्रुतगतीवर एकीकडे मोठ्या प्रमाणात दंडात्मक कारवाया सुरू असताना दुसरीकडे टोलदेखील भरमसाट वसूल केला जात आहे. जलद प्रवासासाठी वाहनचालक हा जादाचा टोल भरून या मार्गावरून प्रवास करतात. मात्र, बोरघाट, खालापूर परिसरामध्ये वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवासाचा वेळ वाचण्याऐवजी अधिकचा वेळ खचीं होऊ लागला आहे. खंडाळा बोगदा, अमृतांजन पॉइंट व बोरघाट परिसरामध्ये दररोज सायंकाळी मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते.
मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात
बोरघाटातील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी ‘मिसिंग लिंक’ हा एक नवीन पर्याय निर्माण करण्यात आला आहे. सध्या याचे काम अंतिम टप्प्यात आहे. खालापूर ते लोणावळा सिंहगड कॉलेजदरम्यान मिसिंग लिंक होणार आहे. यामध्ये दोन बोगदे व दोन केबल रोप पूल असणार आहेत. हे काम पूर्ण झाल्यानंतर खंडाळा घाटक्षेत्रामधील कोंडी कमी होईल, असा दावा करण्यात येत आहे. मात्र, तूर्तास तरी द्रुतगतीवरील प्रवास म्हणजे जादाचा टोल भरून खडतर प्रवास सहन करावा लागत आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List