मुक्तिसंग्राम स्तंभाच्या खाली दारूपार्टी! नांदेडातील संतापजनक घटना
ज्यांनी स्वतःच्या घरादारावर तुळशीपत्र ठेवले आणि निजामाच्या जुलमी राजवटीच्या विरोधात एल्गार पुकारला… त्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण पुढच्या पिढ्यांना व्हावे… त्यांच्या विचारांचा वन्ही असाच चेतत राहावा, यासाठी प्रत्येक जिल्हयात हुतात्मा स्मारक उभारण्यात आले. प्रशासकीय दुर्लक्षाअभावी ही हुतात्मा स्मारके भटक्या जनावरांचे आश्रयस्थान बनली आहेत. आता तर या ऐतिहासिक परिसरात दारूपार्टी होत असल्याचे समोर आले आहे.
नांदेड येथे गुजरी जी विसावा उद्यानात मराठवाडा मुक्तिसंग्रामाच्या स्मरणार्थ स्तंभ उभारण्यात आला आहे. या स्तंभावर प्रसिद्ध कवी लक्ष्मीकांत तांबोळी यांच्या ‘या मातीच्या पुण्याईचा टिळा कपाळी लावू, जोवर वाहे गोदामाई। तोवर गाणे गाऊ’ या कवितेच्या ओळी कोरण्यात आल्या आहेत. याच स्तंभाच्या परिसरात वाढदिवसानिमित्त दारूची साग्रसंगीत पार्टी झाल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. सकाळी उद्यानात फिरायला येणाऱ्यांना स्तंभाच्या समोरच केकचे कापलेले तुकडे, प्लेटमध्ये टाकून दिलेली बिर्याणी, चघळून फेकलेली हाडे, दारूच्या तसेच पाण्याच्या बाटल्या आढळल्या. या प्रकारामुळे सर्वत्र संतापाची लाट उसळली. महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत उद्यान निरीक्षकांना जाब विचारला. या प्रकरणी संबंधितांवर योग्य ती कारवाई होईल, परंतु पुढे असा प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे ते म्हणाले.
मुक्तिसंग्रामाच्या पवित्र स्तंभासमोर असे किळसवाणे कृत्य झाले. मनाला अतिशय वेदना झाल्या. मुक्तिसंग्रामदिनापुरतेच या स्तंभाकडे प्रशासनाचे लक्ष जाते. त्यानंतर या परिसरात काय होते हे कुणीही बघत नाही. उलट या जागेचे पावित्र राखण्याची जबाबदारी प्रशासनाची आहे.
प्राचार्य लक्ष्मीकांत तांबोळी
मराठवाडा मुक्तिसंग्रामाचे स्मरण करून देणाऱ्या स्तंभाच्या खाली दारूपार्टी करणाऱ्यांना कडक शिक्षा झाली पाहिजे.
भारत होकर्णे, छायाचित्रकार
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List