वेधक- ऑटिस्टिक मुलांचे कलागुण
>> मेघना साने
ऑटिझम हा रोग नाही. ती एक अवस्था आहे. त्यामुळेच ऑटिस्टिक मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देता येईल व त्यांच्यातील कलागुण शोधून ते कसे विकसित करता येतील, यासाठी प्रयत्न झाल्यास ही मुलं निश्चितच जगण्याच्या स्पर्धेत यशस्वी ठरतात. ऑटिस्टिक (स्वमग्न) मुलांना शिक्षण देणारी आणि त्यांच्या कलागुणांचा विकास करणारी ठाण्यातील ‘राजहंस फाऊंडेशन’ ही संस्था समाजामध्ये ऑटिझमविषयी जागृती करण्याबरोबरच स्वमग्न मुलांच्या पालकांना एकत्र आणणे, त्यांना नैराश्यातून बाहेर काढणे, त्यांची जगण्याची उमेद वाढवणे ही महत्त्वाची कार्ये करते.
ठाण्यातील राजहंस फाऊंडेशन ही संस्था ऑटिस्टिक (स्वमग्न) मुलांना शिक्षण देणारी आणि त्यांच्या कलागुणांचा विकास करणारी संस्था आहे. 10 वर्षांपूर्वी मनीषा सिलम यांनी ही संस्था स्थापन केल्यावर अनेक ठिकाणी त्यांना जागा बदलाव्या लागल्या. सध्या नौपाडा येथे वृद्ध सेवा संघाच्या जागेत त्यांचे व्होकेशनल सेंटर सुरू आहे, जिथे स्वमग्न मुलांना निरनिराळ्या कलांचे शिक्षण देण्यासाठी शिक्षक नेमले आहेत. राजहंस फाऊंडेशनच्या दहाव्या वर्धापनदिनी सभागृह मुलांनी आणि पालकांनी फुलून गेले होते. आपण आज स्टेजवर काही सादरीकरण करणार आहोत हे त्यातील काहीच मुलांना कळत होते. काही तर रंगीत वेशभूषा करून आले होते तरी आपल्याच विश्वात होते.
निवेदिका नीलिमा सबनीसने प्रत्येक मुलाच्या सादरीकरणापूर्वी त्या मुलाची नीट ओळख करून दिली. एखादा मुलगा कीबोर्डवर गाणे वाजवणार असेल तर तो चित्रकलेतही प्रवीण आहे हे आणि त्याच्या इतर आवडीनिवडी काय आहेत, क्षमता काय आहेत हेही तिने सांगितले. एखादी मुलगी कराओकेवर गाणार असेल तर ती तिच्या आईकडून ज्वेलरीदेखील करायला शिकली आहे ही माहिती आम्हाला मिळाली. एका स्वमग्न मुलाने कीबोर्डवर हिंदी गाणे वाजवले. त्याचबरोबर तो बाहुल्याही तयार करायला शिकला हे कळल्यावर गंमत वाटली. त्याच्या आईने आणि त्याने मिळून एक हजार बाहुल्या तयार केल्या असून त्यांना परदेशातही मागणी आहे. एका मुलाच्या आईने पेटी, तबल्याच्या साथीने सुरेख गीत गायले. तबलावादक राजहंसचीच एक शिक्षिका होती आणि पेटीवर सूर धरला होता गायिकेच्या स्वमग्न मुलाने. मुलांचा विविध गुणदर्शन कार्यक्रम दोन तास चालला. त्यात पालक व शिक्षक यांनीही विविध वेशभूषा करून मुलांच्या नृत्यात भाग घेतला. वरद या मुलानेदेखील ‘खेळ मांडला’ ही गीत गाताना उत्तम सूर लावला. या मुलांचे कलाविष्कार पाहून त्यांच्या पालकांना वाटणारे समाधान त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते.
एखाद्या कुटुंबात जन्मलेल्या मुलाला ऑटिझम आहे असे पालकांना कळल्यावर त्यांना धक्का बसतो. खरे तर ही गोष्ट त्यांच्या लगेच लक्षात येत नाही. ते मूल इतर मुलांसारखेच रांगते, उभे राहते, चालतेसुद्धा. ते दीड-दोन वर्षांचे झाल्यावर कळू लागते की, ते आपल्या नजरेला नजर देत नाही. त्याला उच्चार नीट जमत नाहीत. मोठे झाल्यावरही त्यांना चार लोकांत मिसळता येत नाही, कुणाशीही संवाद साधता येत नाही. काही मुले स्वतभोवती गोल फिरत राहतात किंवा एकच एक गोष्ट करत राहतात, तर काही खूप मस्ती करतात. कधी कधी ओरडतातदेखील. मात्र काही मुले खूप हुशारदेखील असू शकतात. एखाद्या गोष्टीत ते विलक्षण प्रगती करून दुसऱ्याला चाट करू शकतात. त्यांचा कुणाशीही संवाद नीट होत नसल्याने त्यांना सामान्य पद्धतीचे शिक्षण घेता येत नाही.
या मुलांमधील कलागुण कसे शोधले असतील याचे कुतूहल माझ्या मनात जागृत झाले. राजहंसच्या संस्थापिका मनीषा सिलम यांनी काही विद्यार्थी व पालकांचे अनुभव सांगितले. शरयू नावाच्या मुलीची आई (दीपा) उत्तम गाते व नृत्यातही प्रवीण आहे. ती लहानपणी शरयूला झोपवताना गाणी म्हणत असे. ते ऐकून शरयूमधे गाण्याचे बीज रोवले गेले. गाण्यात तिला गती आहे तसेच तालाचे ज्ञान उपजतच आहे. आईकडून ती नृत्यही शिकली. कलाविष्कार कार्यक्रमात शरयू अगदी तालासुरात गायली. मनीषाताई स्वत बाहुल्या तयार करतात. त्यांचा मुलगा सोहमदेखील त्यांच्या शेजारी बसून आणि त्यांचे पाहून पाहून बाहुल्या तयार करू लागला. काही मुलांना चित्रकलेत गती आहे तर काहींना स्पोर्टस् व कॉम्प्युटरमध्ये.
ऑटिझम हा रोग नाही. ती एक अवस्था आहे. त्यामुळे ऑटिझमवर औषध नाही व तो बराही होत नाही. मात्र अशा मुलांना कोणत्या प्रकारचे शिक्षण देता येईल व त्यांच्यातील कला शोधून त्या विकसित कशा करता येतील, याचा शोध पालकांनी घ्यायचा असतो. पालकांना आपलं मूल ऑटिस्टिक आहे हे कळल्यावर त्यांनी ते स्वीकारणं महत्त्वाचं असतं असे इथे प्री-व्होकेशनलचा भाग बघणाऱ्या डॉ. मिताली वैद्य म्हणाल्या. समाजामधे ऑटिझमविषयी जागृती करण्याबरोबरच अशा मुलांच्या पालकांना एकत्र आणणे, त्यांना नैराश्यातून बाहेर काढणे, त्यांची जगण्याची उमेद वाढवणे हे कार्यसुद्धा या संस्थेतील शिक्षक करतात. या संस्थेत अनेक कार्यशाळा व चर्चासत्रे आयोजित केली जातात. काही वेळा ऑटिझमबद्दल जागृती व्हावी म्हणून त्यांनी रॅलीही आयोजित केल्या होत्या.
‘राजहंस फाऊंडेशन’मध्ये अनेक मुलांनी NIOS चा अभ्यासक्रम पूर्ण केला आहे. काही मुलांनी कॉम्प्युटर ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर Data Entry चे जॉबही केले आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी निवडक मुलांनी अॅमेझॉनची महिनाभराची इंटर्नशिप पूर्ण केली व त्यातील काहींना नोकरीही लागली. आपण वृद्ध झाल्यावर या मुलांकडे कोण बघणार याची चिंता पालकांना आतापासूनच भेडसावू लागली आहे. त्यामुळे सर्व पालकांनी एकत्र येऊन एक जागा घ्यावी व या मुलांची देखभाल करण्यासाठी कुशल पगारी माणसे नेमावीत असा विचार पुढे आला आहे. त्या दिशेने पहिले पाऊल म्हणून ठाण्याजवळ एक जागा घेतली आहे व पुढील काम सुरू आहे.
या मुलांना सांभाळताना पालकांना खूपच पेशन्स ठेवावा लागतो आणि अगदी मृदू भाषेत त्यांच्याशी संवाद करावा लागतो. अशा अवस्थेतील मुलांचा विकास घडवून आणण्यासाठी स्वत:च्या आवडीनिवडी बाजूला ठेवून आपले आयुष्य त्यांच्यासाठी खर्च करणाऱ्या पालकांच्या जिद्दीला माझा सलाम!
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List