स्वयंपाकघर – स्वयंपूर्णा
>> तुषार प्रीती देशमुख
व्यवसाय तुम्हाला केवळ जगण्याचे बळ देत नाही तर स्वयंपूर्ण असण्याची जाणीव करून देतो. अनंत संकटं आली तरी त्यांना सामोरे जात तेलपोळीचा व्यवसाय करून संसाराची धुरा सांभाळणाऱया शीला देशपांडे, या स्वाभिमानी अन् कष्टाळू सुगरणीची ही कथा.
22 वर्षं नोकरी, मग 30 वर्षं घरातल्या स्वयंपाकघरातून तेलपोळीचा व्यवसाय करून संसाराची धुरा सांभाळणाऱया शीला देशपांडे. शिक्षण करून वयाच्या 21व्या वर्षी शीलाताई नोकरीला लागल्या. वयाच्या 22 व्या वर्षी त्यांचा शशिकांत देशपांडे यांच्याबरोबर प्रेमविवाह झाला. दोघांची नोकरी आणि संसार नीट चालला होता. कन्या बीनाचा जन्म झाला होता… आणि अचानक एके दिवशी नवरा जिथे नोकरीला होता ती मिल बंद पडली. नशिबाने शीलाताईंची नोकरी शाबूत होती म्हणून संसाराला हातभार लागत होता. घरातील स्वयंपाकाची जबाबदारी त्यांच्या सासूबाई कमलाबाई रामचंद्र देशपांडे यांनी घेतल्यामुळे शीलाताई निश्चिंत असायच्या. मात्र 22 वर्षं ज्या बुश इंडिया लिमिटेडमध्ये शीलाताई नोकरीला होत्या. ती कंपनी बंद पडणार असल्याचं कळलं. पुढे काय? हे मोठे प्रश्नचिन्ह त्यांच्या आयुष्यात उद्भवलं. पण त्यांनी जिद्द सोडली नाही.
होळीनिमित्त घरात तेलपोळ्यांचा घाट घातला गेला होता. सासूबाईंना बरं नसल्यामुळे शीलाताईंवर तेलपोळ्या करण्याची जबाबदारी पडली. त्यांनी ती छान पद्धतीने निभावली. त्याच वेळी त्यांची नणंद आशा देशपांडे घरी आल्या होत्या. त्यांनी पाहिले, शीलाताई आपल्या आईसारख्याच उत्तम तेलपोळ्या करत आहेत. तेव्हा त्यांनी शीलाताईंना तेलपोळ्यांची पहिली ऑर्डर दिली. नणंदबाईंच्या घरी सगळ्यांनाच तेलपोळी खूप आवडली. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील काहीजणांनी तेलपोळीच्या ऑर्डर्स द्यायला सुरुवात केली आणि न ठरवता अपघाताने सुरू झालेला शीलाताईंचा तेलपोळ्यांचा व्यवसाय वाढत गेला.
शीलाताईंनी आपल्या सासूबाईंकडून तेलपोळीबरोबरच निनावं, कानवले हे सर्व पारंपरिक पदार्थ शिकून घेतले होते. पण तरीही त्यांना कष्टाने, चिकाटीने वातीच्या स्टोव्हवर मेहनतीने बनवलेल्या तेलपोळय़ांच्या विक्रीमधून आलेल्या पैशाचं जास्त सुख वाटायचं. तेलपोळी करणं म्हणजे एक आव्हान असतं. पीठ योग्य पद्धतीने भिजवून ते तेलात मुरवणं असो वा पोळी बनवण्यासाठी लागणारं आतलं पुरण, योग्य पद्धतीने शिजवून पुरण यंत्रातून वाटून घेणं असो. त्यानंतर तेलपोळीच्या पत्र्यावर तेलपोळी लाटून ती योग्य पद्धतीने दोन्ही बाजूने खमंग भाजणं असो. त्यांना ही सगळी प्रक्रिया अगदी सहजच जमायची. तेलपोळी हा एकच पदार्थ त्यांनी आपल्या व्यवसायासाठी निश्चित केला.
व्यवसाय सुरू केला त्या पहिल्या वर्षी होळीसाठी 50 तेलपोळ्यांची ऑर्डर घेणाऱया शीलाताईंना पुढच्या वर्षीच्या होळीसाठी 250 तेलपोळ्यांची ऑर्डर मिळाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून नाही पाहिले. दादरमधील चांद्रसेनीय कायस्थ प्रभू समाज हॉलमधील सरोज महागावकर यांनी शीलाताईंच्या तेलपोळीचा प्रचार इतक्या प्रकारे केला की, प्रत्येक सणवाराला त्यांच्याकडे अनेक ऑर्डर्स येऊ लागल्या. या संपूर्ण प्रवासात त्यांचे पती शशिकांत देशपांडे यांची त्यांना मोलाची साथ लाभली.
अपघाताने घडलेल्या तेलपोळीच्या व्यवसायातून शीलाताईंना नोकरीपेक्षा दुप्पट अर्थार्जन प्राप्त होऊ लागलं. त्यामुळे त्या कुटुंबासाठी, मुलगी बीनाच्या शिक्षणासाठी योग्य खर्च करू शकल्या. काही वर्षांतच होळीच्या पाच दिवस अगोदर शीलाताई अडीच ते तीन हजार तेलपोळ्या करून विकायच्या. त्या दिवसांमध्ये त्यांना मान वर करणेदेखील शक्य नसायचे. त्यातच एके दिवशी त्यांच्या घरी एक महिला, “तेलपोळ्या मिळतील का हो?’’ विचारत आल्या.त्या “नाही’’ म्हणाल्या. “खूप अपेक्षेने तुमच्याकडे आले आहे. बघा जमलं तर…’’ हे ऐकताच शीलाताईने त्यांच्या विनंतीला मान देऊन आार्डरमधल्या तेलपोळ्या दिल्या व त्यांच्या चेहऱयावरचा आनंद पाहून समाधान पावल्या. जाता जाता त्या शीलाताईंना म्हणाल्या, “एका कार्यक्रमात तुम्ही बनवलेली तेलपोळी आम्ही खाल्ली होती. म्हणून स्वत घ्यायला आले. मी राज ठाकरेची आई कुंदा ठाकरे.’’ हे ऐकून शीलाताईंना त्यांनी आजपर्यंत केलेल्या मेहनतीचं चीज झाल्यासारखं वाटलं. त्यानंतर थेट मीनाताई ठाकरे यांनीदेखील तेलपोळीची ऑर्डर दिली व घरी सगळ्यांना तेलपोळी आवडल्याचं फोनवरून कळवलं होतं. अशा अनेक दिग्गजांनी शीलाताईंकडून तेलपोळ्या मागून त्याची पसंती कळवली होती.
कालांतराने शीलाताईंचे पती शशिकांत देशपांडे यांचे निधन झाले तेव्हा त्यांची मुलगी कुटुंबासह आईकडे तिच्या मदतीला राहण्यास आले. शीलाताईंचा तेलपोळीचा व्यवसाय सुरूच आहे सोबत मुलीचाही बिर्याणीच्या ऑर्डर्स, प्रीमिक्स विकण्याचाही व्यवसाय सुरू आहे. एक वर्षापूर्वी अचानक शीलाताईंचे जावई आजारी पडले व त्यात त्यांचं निधन झालं. आता नातीची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून शीलाताईंनी तेलपोळीच्या 30 वर्षांच्या यशस्वी व्यवसायातून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. शीलाताई म्हणतात, माझ्या या तेलपोळीच्या व्यवसायामुळे माझ्यावर आलेल्या आर्थिक संकटांच्या काळात मला कधीच कोणापुढे हात पसरावे लागले नाही ही माझ्या व्यवसायातली माझी ताकद. शीलाताईंसारख्या अनेक कष्टाळू महिलांना मानाचा मुजरा.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List