संस्कृती-वैभव – श्रीरामाच्या बहिणीचे मंदिर
>> वर्षा चोपडे
पुराणात उल्लेख असलेली रामायणातील राजकुमारी शांता अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान स्त्री होती. वाल्मीकी रामायण, बालकाण्ड आणि विष्णुपुराणात शांतादेवीचा उल्लेख आढळतो. हिंदुस्थानात उत्तर प्रदेश व हिमाचल प्रदेशात शांतादेवीची दोन मुख्य मंदिरे आहेत.
कोण होती भगवान रामाची बहीण? फार कमी लोकांना माहिती आहे की, भगवान राम यांना एक मोठी बहीणदेखील होती. पुराणात उल्लेख असलेली हिंदू महाकाव्य रामायणातील राजकुमारी शांता अत्यंत सुंदर आणि बुद्धिमान स्त्री होती. वाल्मीकी रामायण, बालकाण्ड आणि विष्णुपुराणात शांतादेवीचा उल्लेख आढळतो.
पौराणिक कथेनुसार, भगवान रामाच्या जन्मापूर्वी दशरथ आणि कौसल्या यांना एक शांता नावाची मुलगी होती. राजा अंगराज रोमपाद आणि राणी वर्षिनी (रामाची मावशी) यांना मूलबाळ नव्हते. राजा रोमपाद शांताचे तेजस्वी रूप व युद्धातील ज्ञान ऐकून प्रभावित झाले. आपल्याला अशीच कन्या असावी अशी इच्छा त्यांनी राजा दशरथासमोर प्रगट केली. विशाल मनाच्या राजा दशरथाने आपली कन्या उदारपणे राजा रोमपाद आणि राणी वर्षिनी यांना दत्तक दिली. राजकुमारी शांता दोघा राजाराणीची अत्यंत लाडकी होती. एकदा एक ब्राह्मण राजाकडे मदतीसाठी आला असता राजाने त्या ब्राह्मणाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे तो ब्राह्मण क्रोधित झाला. रोमपादाच्या राज्यात दुष्काळ पडेल असा त्याने शाप दिला. इंद्राने रोमपादाच्या अंगदेशात पाण्याचा वर्षाव बंद केला आणि दुष्काळ पाडला. त्यानंतर यातून मुक्तता मिळवण्यासाठी राजा रोमपादने शृंगी ऋषींना यज्ञ करण्यास विनंती केली. शृंगी ऋषी हे विभांडक ऋषी व अप्सरा उर्वशी यांचे पुत्र होते. शृंगी ऋषींच्या डोक्यावर शिंग होते, म्हणून त्यांचे नाव ऋष्यशृंग पडले. शृंगी ऋषी हे कश्यप ऋषींचे नातू असल्याचेही म्हटले जाते. त्यांचा जन्म ज्या ठिकाणी झाला ते श्रंगेरी, सध्या कर्नाटकात आहे. श्रंगेरीजवळ त्याच नावाचा एक पर्वतदेखील आहे. शृंगाच्या जन्मानंतर उर्वशी स्वर्गात निघून गेली. या फसवणुकीमुळे विभांडक दुखावला गेला. त्याला स्त्रीचा द्वेष वाटू लागला आणि त्याने आपला मुलगा ऋष्यशृंगावर स्त्रीची सावलीही पडू न देण्याचा निर्धार केला. यासाठी त्याने ऋष्यशृंगाचे संगोपन जंगलात केले. ते जंगल अंगदेशच्या सीमेला लागून होते. तीव्र क्रोधाचे परिणाम अंगदेशाला भोगावे लागले, तिथे भयानक दुष्काळ पडला. शृंगी ऋषींच्या तपश्चर्येत इतकी शक्ती होती की, ते भगवान इंद्राला प्रसन्न करू शकत होते आणि त्यांना हवा तेव्हा पाऊस पाडू शकत होते. अंगराज रोमपाद यांनी ऋषी आणि मंत्र्यांशी सल्लामसलत केली आणि असा निष्कर्ष काढला की, जर ऋष्यशृंगाला अंगदेशाच्या भूमीवर आणले तर त्यांची समस्या दूर होईल. म्हणून राजाने ऋष्यशृंगाला प्रसन्न करण्यासाठी देवदासींची मदत घेतली; कारण शृंगाने त्याच्या जन्मानंतर कधीही स्त्री पाहिली नव्हती… आणि नेमके तेच घडले. अंगदेशात शृंग ऋषीचे मोठय़ा आनंदात स्वागत करण्यात आले; परंतु विभांडकच्या रागाच्या भीतीने रोमपादाने ताबडतोब आपली मुलगी शांताचा हात ऋष्यशृंगाच्या हाती सोपवला. यज्ञानंतर इंद्रदेवाने दुष्काळ दूर केला. याच शृंगी ऋषी यांनी गुरू वशिष्ठांच्या विनंतीवरून राजा दशरथाकरिता उत्तर प्रदेशातील बस्ती जिह्यातील मखौडा धाम मनोरमा नदीकाठी पुत्रकामेष्ठी यज्ञ केला होता. यज्ञादरम्यान माता शांता यांनी 45 दिवस देवी शक्तीची पूजा केली. त्यानंतर काही महिन्यांनी भगवान राम आणि त्यांच्या तीन भावांचा जन्म झाला. ऋषी शृंगाने अश्वमेध यज्ञ केला ते ठिकाण अयोध्येपासून सुमारे 38 किमी पूर्वेस होते.
हिंदुस्थानात उत्तर प्रदेश व हिमाचल राज्यात शांतादेवीची दोन मुख्य मंदिरे आहेत. उत्तर प्रदेशातील बस्ती जिह्यापासून 45 किलोमीटर अंतरावर हरैया तहसील परिसरात एक ठिकाण आहे, ज्याचे नाव शृंगिनारी आहे. त्रेतायुगात माता शांता तिथल्या घनदाट जंगलात राहत असत आणि पूजा-अर्चा करत असत. येथे शृंगी ऋषींनी बांधलेले माता शांताचे एक मोठे मंदिर आहे. हे एक सिद्ध ठिकाण आहे. देशभरातून इथे भक्त येतात. प्रार्थना करतात आणि देवी तिच्या भक्तांना आशीर्वाद देत त्यांच्या इच्छा पूर्ण करते असे म्हटले जाते. या मंदिरात देवी शांता आणि त्यांचे पती शृंग ऋषी यांची एकत्र पूजा केली जाते.
असे म्हणतात, हिमाचल प्रदेशातील कुल्लू येथील मंदिर शांतादेवीचे निवासस्थान होते. हिमाचल राज्याच्या कुल्लूपासून 50 किमी दूर असलेले हे मंदिर दसरा उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर त्याच्या अद्वितीय लाकडी वास्तुकला आणि शांत वातावरणासाठी ओळखले जाते. काही लोकांचा असा विश्वास आहे की, या मंदिरात मनापासून पूजा करणाऱया भक्तांना भगवान राम, त्यांची बहीण शांता व शृंगी ऋषी यांचे आशीर्वाद मिळतात. हिंदुस्थानातील दक्षिणेकडील काही भागांत भगवान रामाची बहीण शांता ही पूजनीय आहे. याच शृंगी ऋषीचे मंदिर प्रामुख्याने बिहारमधील लखीसराय येथे आणि छत्तीसगडमधील धमतरी येथेही आहे. लखीसराय मंदिर, बाबा शृंगी ऋषी धाम, सूर्यगढ प्रखंडमध्ये स्थित आहे. हे मंदिर जंगल आणि पर्वतांनी वेढलेले आहे. शृंगी ऋषी हे राजा दशरथ यांचे जावई आणि भगवान श्रीराम यांचे मेहुणे होते. असे मानले जाते की, भगवान रामाने ऋषी शृंगीच्या आश्रमात रावणाशी युद्ध करण्याची योजना आखली होती. पौराणिक कथेबाबत अनेक मतभेद असले तरी शांता ही प्रभू रामचंद्राची मोठी बहीण होती असे सांगितले जाते.
(लेखिका राजगिरी कॉलेज ऑफ सोशल सायन्सेस, कोची, केरळच्या महाराष्ट्रातील संपर्क अधिकारी म्हणून नियुक्त आहेत.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List