सूर-ताल- मंत्रमुग्ध करणारी बासरी
>> गणेश आचवल
कॅसेटमधील गाण्यांचे ध्वनिमुद्रण असो किंवा एखादा वाद्यवृंद, एखादा रिअॅलिटी शो असो किंवा एखाद्या सुप्रसिद्ध गायकाची सांगीतिक मैफल… अशा सर्व कार्यक्रमांतून गेली पंचेचाळीस वर्षांपेक्षा जास्त काळ बासरी वादक म्हणून परिचयाचे झालेले एक नाव म्हणजे विजू तांबे!
त्यांचे नाव जरी विजय तांबे असले तरी त्यांना सर्वजण विजू तांबे म्हणूनच ओळखतात. त्यांचे वडील सखाराम तांबे हे अनेक वाद्यवृंदांतून बासरी वादन करायचे. तसेच ते स्वत बासरी तयारदेखील करत होते. त्यामुळे विजू तांबे यांचे बासरी वादनाचे सुरुवातीचे शिक्षण त्यांच्या वडिलांकडे झाले. 1980 सालापासून विजू तांबे या क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या काळात गाण्यांच्या अनेक कॅसेट्स निर्माण होत होत्या. त्यामधील गीतांकरिता विजू तांबे हे बासरी वाजवू लागले. त्या काळी अनेक वाद्यवृंदही सादर होत होते. हिंदोळे स्वरांचे, सप्तरंग… अशा अनेक वाद्यवृंदातून विजू तांबे हे नाव परिचित होऊ लागले.
1998 मध्ये लता मंगेशकर यांचे अमेरिका येथे महिनाभरात बारा कार्यक्रम होणार होते. त्या कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकरदेखील होते. या सर्व कार्यक्रमात बासरी वादनाची संधी विजू तांबे यांना मिळाली होती. डॉ. बालाजी तांबे यांच्या अनेक कार्यक्रमात वीस वर्षे विजू तांबे यांनी बासरी वादन केले आहे. त्यापैकी ‘हिलिंग म्युझिक’ कार्यक्रम आणि त्यातील विजू तांबे यांचे बासरी वादन अनेकांनी ऐकले आहे. ‘गर्भ संस्कार’ या सांगीतिक सीडीसाठी संगीतसंयोजन आणि बासरी वादनदेखील त्यांनी केले आहे.
बासरी वादन करताना रोजचा रियाज खूप महत्त्वाचा असतो. आजही ते रोज एक ते दोन तास रियाज करणे आवश्यक मानतात. रमाकांत पाटील यांच्याकडेही त्यांनी बासरी वादनाचे शिक्षण घेतले आहे. तसेच पंडित हरिप्रसाद चौरसिया यांनादेखील ते गुरुस्थानी मानतात.
ज्या वेळी खासगी टीव्ही चॅनल्स सुरू झाले, त्यावेळी अनेक सांगीतिक कार्यक्रमदेखील सुरू झाले होते. ‘वादळवाट’ मालिका, ‘सूर नवा ध्यास नवा’ व झी मराठीवरील काही सांगीतिक कार्यक्रमांतून त्यांचे बासरी वादन सर्वांना परिचित झाले. सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर, रवींद्र साठे, सुप्रसिद्ध गायिका पद्मजा फेणाणी जोगळेकर यांच्या सांगीतिक कार्यक्रमातून देखील अनेक वर्षे त्यांच्या बासरीला प्रेक्षकांची दाद मिळाली आहे. हिंदी, मराठी, गुजराती अशा अनेक भाषांतील गाण्यांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने बासरी वादनासाठी लंडन, अमेरिका अशा अनेक ठिकाणी त्यांनी आपली कला सादर केली आहे. ‘मिशन काश्मीर’, ‘बेवफा सनम’ अशा अनेक हिंदी चित्रपटांतील गाण्यांकरिता त्यांनी बासरी वादन केले आहे. ‘शाकुंतल’ हे नाटक तसेच अनेक शास्त्राrय नृत्याच्या कार्यक्रमांतूनही त्यांची कला आपण अनुभवली आहे. ‘सिने म्युझिक असोसिएशन’ या संस्थेच्या स्पेशल ग्रुपमध्ये ते बासरी वादक म्हणून कार्यरत आहेत. ‘मनोहारी’ पुरस्काराचे ते मानकरी आहेत. सध्या अनेक गाण्यांचे ध्वनिमुद्रण होत असते. त्यात ते खूप बिझी असतात. तसेच विविध संकल्पना घेऊन विविध ग्रुप्स, अनेक सांगीतिक मैफली आयोजित करत असतात. त्यातसुद्धा त्यांचा सहभाग असतो. यू-टय़ूबवर त्यांच्या बासरी वादनाचा ‘सोलफुल मेलडीज’ नावाचा अल्बम खूप लोकप्रिय असून त्या व्हिडीओला दोन कोटी पंचेचाळीस लाखांहून जास्त ह्यूज मिळाले आहेत. सध्याच्या डिजिटल युगात या क्षेत्रात फक्त बासरीच नव्हे, तर इतर वाद्ये व वादकांना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध आहेत, असे ते आवर्जून सांगतात.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List