हिंदी सक्ती बिहारच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच! आदित्य ठाकरे यांचा जोरदार हल्ला
गेल्या दोन दिवसांत सत्ताधारी पक्षाने अनेक ‘भेटीगाठी’ घेतल्यानंतरच पहिलीपासून हिंदी भाषा अनिवार्य करण्याचे परिपत्रक काढल्याची पोलखोल आज शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. हा निर्णय बिहारच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवूनच घेतल्याचा जोरदार हल्लाही त्यांनी केला.
आदित्य ठाकरे यांनी आज ‘मातोश्री’ निवासस्थानी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या अनेक निर्णयांवर जोरदार टीका केली. पुढील काही दिवसांत हिंदी भाषिक बिहारच्या निवडणुका आणि मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सत्ताधाऱयांच्या जोरदार भेटी सुरू आहेत. यामध्ये एकमेकांना आयडिया देण्यासाठी, काहींना पुनर्जन्म देण्यासाठी हे प्रकार सुरू असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. आमचा कुठल्या भाषेला विरोध नाही. महाराष्ट्रात मराठी सर्वांना यायलाच हवी, पण हा निर्णय घाईघाईने घेण्यापेक्षा या उपक्रमाच्या यशस्वीतेबाबत चर्चा व्हायला हवी, असे मत आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली. हिंदी भाषा कितव्या इयत्तेपासून सुरू करायची याचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे, असेही ते म्हणाले.
मुंबईकरांच्या प्रश्नांकडे पहायला मुख्यंत्र्यांना वेळ नाही
गेल्या काही दिवसांत महावीर जयंती, हनुमान जयंती, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती असताना मुंबईत पाणी प्रश्न निर्माण झाला होता. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतीही कार्यवाही केली नाही. मुंबईकरांच्या प्रश्नांकडे पहायला मुख्यमंत्र्यांना वेळ नाही का, असा सवालही आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे पुढच्या काही दिवसांत मोर्चे सुरूच राहणार असल्याचे ते म्हणाले.
महाराष्ट्राचे वाळवंट, विनाश करू देणार नाही
शिवसेना सत्तेत असताना मनोरी येथे खाऱया पाण्यापासून माणसाला पिण्यायोग्य पाणी निर्माण करण्याचा प्रस्ताव मंजूर झाला. यासाठी राज्य सरकारने जमिनही दिली. मात्र गेल्या अडीच-तीन वर्षांत कोणतीही कार्यवाही झाली नाही. तर गारगाई तलावासाठी सुमारे साडेपाच लाख झाडे, कोस्टल रोडसाठी साठ हजार आणि गडचिरोली मायनिंग प्रकल्पासाठी दीड लाख झाडांची कत्तल होणार आहे. विकासाच्या नावाखाली आणि पंत्राटदारांच्या भल्यासाठी असे प्रकल्प राबवले जात असल्याचा घणाघातही आदित्य ठाकरे यांनी केला. एकीकडे पारा 40 अंश सेल्सीअसवर गेला असताना सरकार आणखी झाडांची कत्तल करणार आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विनाश, वाळवंट होऊ देणार नाही, असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List