उकाडा वाढतोय; काळजी घ्या, आरोग्य विभागाचे आवाहन
राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागल्याने काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. लहान मुले, वृद्ध नागरिक, गर्भवती, स्तनदा माता, सहव्याधी असलेल्या व्यक्तींना उष्णतेचा सर्वाधिक त्रास होतो. त्यामुळे अशा व्यक्तींनी उन्हाळ्यात काळजी घ्यावी. लहान मुले आणि वृद्धांना पुरेसे पाणी पिण्यास द्या. गर्भवतींनी उन्हात जाणे टाळावे आणि हलका आहार घ्यावा. जास्त घाम येत असेल तर ओआरएस, साखर-मीठ पाणी किंवा ताक प्यावे. आजारी व्यक्तींना या काळात अधिक त्रास होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी आणि गरज भासल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
पाण्यासाठी वणवण
यंदा मार्चमध्येच उन्हाळा अधिक तीव्र जाणवला. वाढलेल्या उष्णतेचा आपल्याबरोबरच पक्ष्यांना, जंगलातल्या प्राण्यांना, पाळीव प्राण्यांनाही त्रास होतो. जंगलातले नैसर्गिक पाणवठे आटण्यास सुरुवात होते. अशावेळी पक्षी-प्राणी मानवी वस्तीजवळ फिरायला लागतात. उष्णतेमुळे विजेच्या तारा, काँक्रीटच्या भिंती, होर्डिंगचे पत्रे तापतात. हे पक्षी त्यावर बसतात, तेव्हा त्यांना त्रास होतो. विशेषतः शहरात राहणाऱ्या पक्ष्यांना काँक्रीटच्या जंगलात पाणवठे आणि जलस्रोत सापडत नाहीत, त्यामुळे ते अन्नपाण्याशिवाय उडत असतात. अशक्तपणामुळे ते जमिनीवर कोसळतात.
घराच्या खिडकीत, गॅलरीत, बागेमध्ये, सोसायटीच्या भिंतीवर कोपऱ्यात पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करू शकतो. भांडे स्टीलचे ठेवल्यास त्यातील पाणी पटकन गरम होते. त्यामुळे शक्यतो मातीचे पसरट भांडे ठेवावे. ही पाण्याची भांडी शक्यतो सावलीत ठेवावीत. पाणी पिणे सोयीस्कर ठरण्यासाठी भांडे पसरट असावे. पक्ष्यांसाठी फळांचे तुकडे, धान्य आणि कडधान्य ठेवावे. या पक्ष्यांना साखर, मीठ घालून पाणी पिण्यास दिले तरी त्यांना तरतरी येते.
अशी घ्या काळजी –
दुपारी १२ ते ३ उन्हात फिरू नका.
मद्यसेवन, चहा, कॉफी व उष्ण पदार्थ खाणे टाळा.
पार्किंग केलेल्या वाहनांमध्ये मुले किंवा वयोवृद्ध नागरिकांना सोडून जाऊ नका.
भरपूर पाणी प्या, प्रवास करताना सोबत पाणी घ्या.
सॉफ्ट रंगाचे, कॉटनचे कपडे वापरा.
बाहेर जाताना गॉगल्स, छत्री, टोपी, बूट किंवा चप्पल वापरा.
अशक्तपणा जाणवल्यास त्वरित डॉक्टरकडे जा.
फॅनचा वापर करा, थंड पाण्याने अंघोळ करा.
उन्हाच्या झळांचा, तीव्रतेचा माणसाला त्रास होतो, तसा वन्यप्राणी आणि पक्ष्यांनाही होतोय. उष्माघाताचा त्रास होऊन अनेक पक्षी उन्हात चक्कर येऊन आकाशातून पडतात, अशक्तपणाने काहींना उडता येत नाही.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List