मंत्री अतुल सावेंना दणका मुख्यमंत्र्यांनी कामे रोखली, नांदेड जिल्ह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या तांडा वस्तीच्या कामांना स्थगिती
महायुती सरकारचा गाडा आखणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता अॅक्शन मोडवर आले आहेत. आतापर्यंत शिंदे गट आणि अजितदादा गटाच्या मंत्र्यांना धाकात ठेवून त्यांच्या मनमानी कारभाराला चाप लावणाऱया फडणवीस यांनी आपल्याच पक्षाचे मंत्री असणाऱया अतुल सावे यांना दणका दिला आहे. भाजप आमदार तुषार राठोड यांनी केलेल्या तक्रारीवरून नांदेड जिह्यातील 7 कोटी 25 लाख रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे.
नांदेडचे पालकमंत्री असणारे अतुल सावे जिह्यातील आमदारांना विश्वासात घेत नाहीत, अशी तक्रार मुखेडचे भाजप आमदार तुषार राठोड यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली होती. अतुल सावे यांनी परस्पर तांडा वस्तीच्या कामांना मंजुरी दिल्याची तक्रार तुषार राठोड यांनी केली होती. यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी नांदेड जिह्यातील तांडा वस्तीच्या 7 कोटी 25 लाख रुपयांच्या कामांना स्थगिती दिली आहे. आजपर्यंत फडणवीस यांच्या गुडबुकमध्ये असलेल्या सावे यांच्यासाठी हा मोठा धक्का असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
शिंदे गटाच्या आमदारांचा सावेंच्या दौऱ्याला विरोध
शिंदे गटाचे आमदार बाबुराव कोहळीकर यांनी महायुतीचा आमदार असून मंत्री सावे निधी देत नसल्याचा आरोप पत्र लिहीत केला आहे. मी महायुतीचा आमदार आहे. पण मी सुचवलेल्या कामांची यादी मान्य न करता विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मंजूर केलेली आहे. हा नेमका काय प्रकार आहे तो कळण्यास मार्ग नाही. अतुल सावे ज्या वेळी मतदारसंघात येतील तेव्हा मोठय़ा संख्येने कार्यकर्त्यांना घेऊन आंदोलन करत त्यांच्या दौऱयाला विरोध करण्याचा इशारा कोहळीकर यांनी दिला आहे.
राज्यमंत्री बोर्डीकरही सावेंच्या कारभारावर नाराज
मंत्री अतुल सावे यांच्याकडे माझ्या मतदारसंघात विकासकामे, तांडा वस्तीचा निधी मिळावा, यासाठी शिफारस केली होती. त्यातील एकही काम झाले नाही. पण दुसऱ्यांना ही कामे दिली गेलेली आहेत, असे सांगत राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सावेंच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List