गुन्हेगारीचा प्रवास दाऊद इब्राहिमपासून आता बीडला पोहोचला, म्हणजे राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे; संजय राऊत यांचा सत्ताधाऱ्यांना सणसणीत टोला
ज्येष्ठ पत्रकार प्रभाकर पवार यांच्या ‘मी पाहिलेला तीन दशकांतील थरार’ पुस्तकाचा प्रकाशन सोहळा मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पार पडला. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ‘थरार’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. तसेच ‘नरकातला स्वर्ग’ हे आपलंही पुस्तक हळूहळू येईन, असे संजय राऊत यांनी सांगितले. यावेळी संजय राऊत यांनी राजकारणातील गुन्हेगारीवरून सत्ताधाऱ्यांना कोपरखळ्याही मारल्या.
प्रभाकर पवार यांचं दहावं पुस्तक आहे. पुस्तक लिहिणं सोपं नसतं. मी अनेक वर्षे प्रयत्न करतोय पुस्तक लिहिण्याचा. रोज लिहितो, पण पुस्तक काही होत नाही. आता एक पुस्तक लिहायला घेतलंय चार वर्षे झाली. पुस्तकाचं टायटल आलं पुस्तकाचं कव्हर आलं. सरकारने मला सरकारी पाहुणा केला, तुरुंगात पाठवलं. तिकडे भरपूर वेळ मिळत होता. तिथेपर्यंत झालं, पण बाहेर आल्यावरती एकही पान लिहून होत नाही. शेवटी होत नाही म्हणत कव्हर केलं, हळूहळू तेही पुस्तक येईन ‘नरकातला स्वर्ग’. यासाठी की पुस्तकाचं बाळंतपण जे आहे हे सोपं नाही. केतकरांची, कर्णिकांची असंख्य पुस्तकं आहेत. पण मला त्यांचं आवडलेलं पुस्तक फुलपाखरू. तशी अनेक पुस्तकचं वाचली आणि आमच्या स्मरणात आहेत. पुस्तक केलं एक आदराची भावना असते, असे संजय राऊत म्हणाले.
पोलिसांचा वापर पक्ष फोडण्यासाठी केला जातोय, उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
माझा आवडीचा विषय कोणता असेल तर तो अजूनही क्राईमच आहे. आणि आम्ही प्रत्यक्ष जगलोय. क्राईम एकदा मागे लागलं की ते सुटत नाही. कारण क्राईम हा अजही लोकप्रिय विषय आहे. क्राईमला फार प्रतिष्ठा होती त्या काळामध्ये. त्यावेळी ज्यांनी रिपोर्टींग केली, पत्रकारिता केली त्यांनी ते फार जवळून अनुभवलं आणि पाहिलेलं आहे. त्या काळातले पोलीस अधिकारी होते. त्याकाळी एक विश्व होतं, अंडरवर्ल्ड होतं. त्याकाळी जे डॉन होते त्यांचं समान सरकार चालायचं. राज्यातल्या सरकारमधले, हायकोर्ट जजपर्यंत त्यांच्याकडे येत होते. आणि त्यांची कामं होत होती, जी कायद्याने होत नव्हती. जी न्यायालयात होत नव्हती. तो काळ होता तो खऱ्या अर्थाने थरारक आणि रोमांचक होता. आणि त्या काळात आम्ही क्राईम रिपोर्टींग केलं आहे, अशी आठवण संजय राऊत यांनी सांगितली.
काय एक एक नावं होती. हाजी मस्तान मंत्रालयात जायचा तेव्हा अख्खं मंत्रालय त्याला घ्यायला यायचं. हाजी मस्तान हा अंडरवर्ल्ड डॉन आहे की नेता? हेच कळायचं नाही त्यावेळी आम्हाला. पण तो नेताही होता, प्रतिष्ठा होती. करिमलाला हा जगातल्या पठाणांचा नेता होता. अफगाणिस्तानातून तो इथे आला, इथे राहिला आणि पंडित नेहरूच नाही तर जगभरातले अनेकजण पठाण समाजसेवक करिमलालाशी चर्चा करायचे. इंदिरा गांधी त्यांना भेटायच्या. पण हे सगळे लोकं पडद्यामागे एक काळं जग चालवत होते. आणि या प्रत्येकाच्या घरामध्ये पाच-पाच, सहा-सहा तरुण मुलं गँगवॉरमध्ये मारली गेली, असे संजय राऊत यांनी सांगितले.
योगायोग बघा, परवा भेटीगाठी झाल्या हा राजकीय डाव असू शकतो…, हिंदी सक्तीवरून आदित्य ठाकरे यांचा घणाघात
युसूफ पटेल, हाजी मस्तान, महेश ढोलकिया हे सगळे त्या काळामध्ये अंडरवर्ल्डचे हिरो होते. आणि कालांतराने आम्ही लिहायचो तेव्हा टीव्ही नव्हते, इंटरनेट नव्हतं, डिजिटल, यूट्यूब नव्हतं. जे आम्ही छापू तेच खरं होतं. त्याच्यामुळे गुन्हेगारीवर लिहिणारा सुद्धा हिरो. क्राईम रिपोर्टींग हा एक खरोखर थरारक आणि रोमांचक अनुभव आहे. म्हणजे तेव्हा या रिपोर्टींगला प्रतिष्ठा प्राप्त झाली ती आता आहे का? केतकरसाहेबांनी सांगितलं ना की, राजकारणात जास्त क्राईम आहे. गेल्या दहा वर्षांत ते आपण पाहिलं आहे. या देशाच्या गृहमंत्र्यावर तडीपारीच्या केसेस आहेत. महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तर संबंध अंडरवर्ल्डच आहे, हे आता बोलणं बरोबर नाही. पण हे अंडरवर्ल्ड आहे. गुन्हेगारीचा जो प्रवास आहे तो दाऊद इब्राहिमपासून तर आता बीडला पोहोचलेला आहे. म्हणजे राजकारणापर्यंत पोहोचलेला आहे. पण आता स्पेशल स्टोरीज होतात. पण जे आम्ही लिहित होतो त्याची मजा त्याच्यात नाही, असा चिमटा संजय राऊत यांनी काढला.
कोणताही समाज हा गुन्हेगारी शिवाय मुक्त असू शकत नाही. अगदी रावणाने सीतेला किडनॅप केलं असं आपण म्हणतो. तेव्हापासून गुन्हा सुरू आहे. तेव्हापासून गुन्ह्याची जी परंपरा आहे ती आता या काळापर्यंत सुरू आहे. तेव्हा एक वाल्मिकी होता, आता एक वाल्मिकी आहे. तो पण वाटमाऱ्या कारयाचा हा पण वाटमाऱ्या करत होता. फक्त आमचं म्हणणं एवढचं आहे की, पोलिसांनी गुन्हेगार बनू नये. पोलिसांनी वर्दीचा सन्मान राखला पाहिजे. ज्या दिवशी पोलीस गुन्हेगार होईल, ज्या दिवशी प्रधानमंत्री गुन्हेगार होईल, ज्या दिवशी मंत्री गुन्हेगार असेल त्या दिवशी समाज हा समाज राहत नाही. मग गुन्हेगारांना बळ मिळतं. म्हणून पोलिसांनी पोलिसांचं, राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्याचं आणि शासनकर्त्यांनी शासनकर्त्याचं काम केलं पाहिजे. तरच या समाजामध्ये आपण गुन्हेगारीशी लढू शकू, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List