महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका गुजराती लॉबीपासूनच, संजय राऊत यांचा हल्लाबोल
हिंदी भाषेची सक्ती केली जाते. हे सगळं ठरवून चाललं आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या आधी कोणता वाद निर्माण करता येईल याच्यावर कॅफेमध्ये खल झाला. मराठीच पाहिजे मुंबईत याच्यावर आक्षेप असण्याचं काही कारणच नाही. महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका कोणापासून असेल तर तो गुजरातीपासून आहे, असा हल्लाबोल शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी केला.
मुंबईत पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राला आणि मराठीला सगळ्यात जास्त धोका, डेंजर, खत्रा जर कोणापासून असेल तर तो गुजराती लॉबीपासून, गुजराती भाषेपासून आहे. ज्यांनी संपूर्ण पश्चिम मुंबईचं गुजरातीकरण करण्याचा प्रयत्न केलाय. त्याच्यावर का कोणी बोलत नाही? भाजपला वाईट वाटेल म्हणून. त्याच्यावर कॅफेमध्ये चर्चा होतेय का? त्याच्यावर कधी कोणी गुजराती लॉबीविरुद्ध किंवा गुजराती भाषेच्या महाराष्ट्रातील आक्रमणाविरुद्ध कोणी काळं फासणं, गुजराती बोर्ड जाळणं हे कोणी केलं? ते आम्ही करत आहोत. हिंदीच्या सक्तीविरूद्ध आमचा वाद आहे. हिंदी भाषेला वाद असण्याचं कारण नाही. हे शैक्षणिक धोरणाच्या भागापूर्तच मर्यादित आहे. पण महापालिका निवडणुकीच्या आधी त्यांना हे नवीन वाद निर्माण करायचे आहेत. कॅफेपण चालला पाहिजे ना, अशी टीका संजय राऊत यांनी केली.
वरळीत केम छो… वाला एक बॅनर लावला, आम्ही लावला तो. पण कोणावर आक्रमण केलं नाही, की त्यांनीही आक्रमण केलं नाही. पण सरळ सरळ गुजरामधून येणारे नेते घाटकोपरची भाषा गुजराती, बोरिवलीची भाषा गुजराती असा उल्लेख करतात. याच्यावर हे का उसळत नाहीत. अमित शहा यांना वाईट वाटेल म्हणून की नरेंद्र मोदी, फडणवीस यांना मानसिक त्रास होईल म्हणून. त्यामुळे अशा प्रकारे हिंदी विरोध सुरू केलाय, असा घणाघात संजय राऊत यांनी केला.
या देशात एक संपर्क भाषा म्हणून हिंदी आहेच. राष्ट्रभाषेचा दर्जा तिला दिलाय जरी राष्ट्रभाषा नसली तरी. कारण संपूर्ण देशात कोणती तरी एक भाषा पाहिजे ती हिंदी आहे. शालेय अभ्यासक्रमासंदर्भात महाराष्ट्रात मराठी पहिल्या क्रमांकावर असायला पाहिजे. आणि यावर कोणाचं दुमतच नाहीए. हा विषय तिसऱ्या भाषेसंदर्भात आहे. ज्याला घ्यायती ते घेतील. पण सक्ती करायची नाही. मिस्टर फडणवीस हा महाराष्ट्र आहे. आम्ही बोलतोय ना हिंदी. दिल्लीत देशात जाऊन आम्ही हिंदीच बोलतो. आमची मुलं परदेशात शिकतं नाहीत. आमची मुलं पॉप संगीत गात नाहीत, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
“दक्षिणेतले राज्यकर्ते कडवट आणि महाराष्ट्रातील चरणदास”
दक्षिणेतले लोक नाही तर दक्षिणेतले राज्यकर्ते कडवट आहेत. त्यांच्याएवढे कडवट राज्यकर्ते आमचे नाहीत. आमचे गुलाम आहेत, आमचे व्यापारी आहेत, आमचे धंदेवायिक आहेत, आमचे दिल्लीचे चरणदास आहेत. राज ठाकरे हे अमित शहांशी, मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात? एकनाथ शिंदे आणि त्यांची टोळी एसंशी ते अमित शहा आणि मोदींशी कोणत्या भाषेत बोलतात? इंग्रजीमध्ये, जर्मनीमध्ये की फ्रेंच भाषेत बोलता सांगावं त्यांनी. तुम्हाला संपर्क भाषा म्हणून हिंदीतच संवाद करावा लागतो. ज्याचे इंग्रजीचे वांदे आहेत त्यांना हिंदीचा वापर करावा लागतो. कशाला नाटकं करताय? असा जोरदार टोला संजय राऊत यांनी लगावला.
शालेय शिक्षणात 5 वी नंतर आम्ही हिंदी शिकलोय ते अजूनपर्यंत आमचं हिंदी मजबूत आहे. मुंबईत किंवा इतर देशात फिरताना आम्हाला हिंदीचा आधार घ्यावा लागतो. मराठीवर आम्ही आक्रमण होऊ देणार नाही ही आमची भूमिका कायम आहे. मराठी आई आहे तर इतर भाषा आमच्या मावशा आहेत. आम्ही आई मारून मावश्यांचं रक्षण नाही करणार ही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेबांची भूमीका आहे, असे संजय राऊत म्हणाले.
“निवडणुका जिंकण्यासाठी, लढवण्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर”
निवडणुका जिंकण्यासाठी, लढवण्यासाठी पोलील यंत्रणेचा कसा वापर केला जातो हे नवीन राहिलेलं नाही. बीडमधील एक PSI रणजित कासले त्याला अटक केली. त्याने काय सांगितलं. ईव्हीएम मशीनवरचा पहारा हटवण्यासाठी त्याला 10 लाख रुपये दिले. याची काय चौकशी केली? म्हणजे पोलीस यंत्रणेचा वापर हा प्रत्येक स्थरावर तुम्ही निवडणुका जिंकण्यासाठी ईव्हीएममध्ये घोटाळा करण्यासाठी केलेला आहे. उद्धव साहेब तेच म्हणाले आहेत, असे संजय राऊत म्हणाले.
“हे सगळे टॅंकर माफियांचे सूत्रधार”
पाणीटंचाई प्रश्नावर सरकार अजिबात गंभीर नाही. मुंबईत, नाशिकमध्ये पाण्यासाठी मोर्चे निघत आहेत. विदर्भ, मराठवाडा तर तहानलेलाच आहे. मृत्यू होत आहेत पाण्याशिवाय तडफडून. राज्याचे दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री काय करत आहेत सांगावं? हे सगळे टॅंकर माफियांचे सूत्रधार आहेत. भाजपमध्ये जे अर्थपुरवठा करणारे आहेत हे सगळे टॅंकर माफिया आहेत. यांच्याकडून हे पैसे घेतायत. भाजपचे, एसंशिचे मंत्री, आमदार, खासदार हे कुठून आणणार आहेत पाणी? यांच्याकडे कोणत्याही प्रकारची पाण्याची योजना नाही. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे, अशी सडकून टीका संजय राऊत यांनी केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List