यंदा भरपूर पाऊस होणार, राहाता येथील वीरभद्र यात्रेतील भाकीत
‘या वर्षी पाऊस भरपूर होईल; पण रोहिणी नक्षत्राचा पाऊस तुरळक ठिकाणी होईल. मृग आणि आर्द्रा नक्षत्रांचा पाऊस चांगला होईल. खरिपाचा पेर हंगाम होईल आणि पेरी दोन होतील,’ असे भाकीत तथा ‘व्होईक’ राहाता येथील वीरभद्र यात्रेत वीरभद्र देवस्थानचे पुजारी सोमनाथ भगत यांनी केले.
राहात्यातील वीरभद्र व नवनाथ महाराजांच्या यात्रेत देवस्थानचे पुजारी सोमनाथ भगत हे प्रत्येक वर्षी पाऊस व येणारी पिके कशी असतील, याचे भाकीत करतात. दरवर्षी त्यांचे भाकित ऐकण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असतात. पुजारी भगत यांच्या भाकितावर शेतकरी बांधव यावर्षीचे आपले आर्थिक गणिते कसे असेल, याचा अंदाज लावतात.
या वर्षी वीरभद्र मंदिरासमोर स्त्री व पुरुष यांची नवसपूर्ती करण्यासाठी गळवंतीला गळी लागण्याकरिता दीड हजारांहून अधिक भाविकांनी उपस्थिती लावली होती. त्यामुळे सकाळी साडेनऊ वाजता भाकित झाले. यापूर्वी हे भाकित पहाटे सहा वाजेदरम्यान व्हायचे; परंतु दिवसेंदिवस नवसपूर्ती करणाऱ्यांची संख्या वाढू लागल्याने भाकिताच्या कार्यक्रमाला उशीर होऊ लागला. भाकीत ऐकण्यासाठी अनेक नागरिक रात्रीपासूनच इथे उपस्थित होते.
पुजारी सोमनाथ भगत यांनी भाकीत केले की, ‘या वर्षी भरपूर पाऊस होईल; पण रोहिणी नक्षत्रात काही ठिकाणी पाऊस पडेल. मृग आणि आर्द्रा नक्षत्रांत चांगला पाऊस होईल. खरिपाचा पेर हंगाम होईल; पण पेरी दोन होतील.’
नवसाला पावणारा अशी ख्याती असलेल्या वीरभद्र महाराज यांच्या यात्रेतील केलेल्या भाकिताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून भगत परिवाराकडे भविष्यवाणी सांगण्याची पिढीजात परंपरा आहे.
असे केले जाते भाकीत…
भाकीत करण्याअगोदर पाच मातीच्या कच्च्या घागरी एका सरळ रेषेमध्ये ठेवून त्यावर देवाची घोंगडी अंथरली जाते. या घागरी पाण्याने भरून ठेवण्याचा मान सदाफळ परिवाराकडे आहे. पाण्याने भरलेल्या घागरीवरून मंदिराचे पुजारी तीन वेळेस चालतात. घागरीसमोर पाच नागिणीच्या पानावर विडे ठेवले जातात. त्या पानांच्या विड्यांना नाव राजा, प्रजा, सुख, दुःख व दारिद्र्य असे दिले जाते. या घागरी जमिनीवर ठेवल्यानंतर जो विडा जागेवर राहील, त्याचा मानवतेला त्रास होतो व ज्या देशाने पाणी जास्त वाहिले त्या दिशेला पाऊस जास्त होतो, असे भाकित करण्याची शेकडो वर्षांची परंपरा सुरू राहाता यात्रेत सुरू आहे. या वर्षी घागरी रचल्यानंतर पाचही पानांचे विडे पाण्याने वाहून गेले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List