ठाणे पालिकेत राष्ट्रवादीलाही भरवायचा आहे जनता दरबार, शरदचंद्र पवार पक्षाचे आयुक्तांना पत्र
जनता दरबारावरून ठाण्यात महायुतीमध्ये आधीच झोंबाझोंबी सुरू असताना आता या वादात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने उडी मारली आहे. वनमंत्री गणेश नाईक यांनी पुन्हा जनता दरबाराची हाक दिल्यानंतर झोप उडालेल्या मिंधे गटाने महापालिका मुख्यालयात जनसंवाद सुरू केला. मुळात नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्याने प्रशासकीय राजवटीत मिंधे गटाला पालिकेतील सभागृह देण्यावरून वाद सुरू आहे. दरम्यान, ठाणे पालिकेत आता राष्ट्रवादीलाही जनता दरबार भरवायचा असून शरदचंद्र पवार पक्षाने पालिका आयुक्तांना पत्र पाठवत मोफत सभागृह मिळावे अशी मागणी केली आहे.
गणेश नाईक यांनी ठाण्यात जनता दरबाराची सुरुवात केली. याला समांतर आमदार संजय केळकर यांनी जनसंवाद तर मिंध्यांनी थेट पालिकेत जनता दरबार सुरू केला. पालिका मुख्यालयात राजकीय पक्षांचे दरबार चालतात यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेत आम्हालाही जनता दरबार भरवायचा असल्याचे सांगत ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई यांनी सभागृहाची मागणी केली आहे. या मागणीमुळे जनता दरबारावरून वातावरण तापणार आहे.
‘मिंधे गटाला पालिकेत दरबाराची परवानगी कशी?
सध्या प्रशासकीय राजवट असताना राजकीय लोकांना ठाणे पालिकेत जनता दरबार भरवण्याची परवानगी कशी दिली? पालिका प्रशासनाने राजकीय पक्षांना जागा भाड्याने देण्यासाठी किती रक्कम आकारली आहे का? नसेल तर मलाही जनता दरबारासाठी मोफत सभागृह मिळावे, अन्यथा मिंधे गटाला सभागृह उपलब्ध करून देऊ नये.
योगेश मुंधरा (सामाजिक कार्यकर्ते)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List