अवघ्या 20 तास 50 मिनिटांत एव्हरेस्ट ल्होत्से केले सर, रिना भट्टी यांनी मागितली सरकारी नोकरी
हरयाणातील गिर्यारोहक रिना भट्टी यांनी एव्हरेस्ट आणि ल्होत्से या दोन शिखरांवर वेगवान चढाई केली. अवघ्या 20 तास 50 मिनिटांत त्यांनी ही मोहीम फत्ते केल्याचा दावा केला. ‘या कामगिरीची हरयाणा सरकारने दखल घेऊन आपल्याला सरकारी नोकरी द्यावी,’ अशी मागणी रिना भट्टी यांनी मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांना पत्र लिहून केली. पत्रात त्यांनी हरयाणा सरकारकडे ग्रुप-अ सरकारी नोकरीची मागणी केली आहे. याशिवाय काँग्रेस आमदार विनेश फोगट यांच्याप्रमाणेच रिनानेही मुख्यमंत्री सैनी यांच्याकडे चार कोटी रुपयांची आर्थिक मदत मागितली आहे.
रिनाने तिच्या सोशल मीडिया हॅण्डलवरूनही याबाबतचे ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले आहे की, ‘मी राज्याचे आणि देशाचे नाव अभिमानाने उंचावले आहे. ज्याप्रमाणे तुम्ही मुलींच्या हितासाठी प्रगतशील निर्णय घेत आहात, तुम्ही माझ्या कामगिरीकडेही दुर्लक्ष करणार नाही, असा मला विश्वास आहे.’
गिर्यारोहणातील रेकॉर्ड
रिना भट्टी हरयाणातील हिस्सार येथील आहेत. त्यांचे वडील ट्रॅक्टर मेकॅनिक आहेत. रिना यांनी एव्हरेस्ट आणि ल्होत्से या दोन्ही शिखरांवर फक्त 20 तास 50 मिनिटांत चढाई केल्याचा दावा केला आहे. त्यांनी सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले की, ‘मी हरयाणा राज्यातील पहिली महिला आहे, जिने 70 तासांत माऊंट कांग यात्से (6270 मीटर) आणि माऊंट जो जोंगो (पश्चिम) (6240 मीटर) सर केलंय. मी या दोन्ही शिखरांवर तिरंगा फडकवला आहे. याशिवाय मी जगातील सर्वांत तांत्रिक शिखर, नेपाळमधील माऊंट अमा दाबलम (6812 मीटर) याच्यावरदेखील फक्त पाच दिवसांत चढाई केली आहे. ‘रनिंग अगेन्स्ट डिप्रेशन’ नावाच्या जगातील सर्वांत लांब रिले शर्यतीत भाग घेतला आहे. तसेच त्यांनी 10 हजार पुशअप्स पूर्ण करून ऑक्स्फर्ड वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आपले नाव नोंदविले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List