“आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी वानखेडेबाहेर उभा राहायचो अन् आता…”, रोहित शर्मा भावूक
टीम इंडियाला दोन आयसीसी ट्रॉफी जिंकून देणारा कर्णधार रोहित शर्मा याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावरील स्टँडला त्याचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयावर रोहितने पहिल्यांदाच भाष्य केले. मुंबई टी-20 लीग निमित्त आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलताना रोहितने आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी तो भावूकही झाला.
वानखेडे मैदानावरील दिवेचा पॅव्हिलियन लेव्हर 3 ला रोहित शर्मा याचे नाव देण्याचा निर्णय मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये घेण्यात आला. याबाबत बोलताना रोहित म्हणाला की, याबाबतच्या भावना शब्दांमध्येही मांडता येणार नाही. येथेच आवडत्या क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी मैदानाबाहेर उभा राहायचो आणि त्याच मैदानात माझ्या नावाचा स्टँड असणे हे अविश्वसनीय आहे. मी याचा कधी विचारही केला नव्हता.
रोहित पुढे म्हणाला की, जेव्हा तुम्ही खेळायला सुरुवात करता तेव्हा तुम्ही किती काळ खेळणार हे माहिती नसते. त्यामुळे अशा गोष्टी तर तुमच्या स्वप्नातही नसतात. असा सन्मान मिळणे आणि आपल्या नावाचाही स्टँड असणे याची मी कल्पनाही करू शकत नाही. मैदानाबाहेर आपल्या आवडत्या खेळाडूंची एक झलक पाहण्यासाठी उभे राहण्यासाठी ते आता त्याच मैदानावर आपल्या नावाचा स्टँड असण्यापर्यंतच्या प्रवासात खूप काही घडले आहे.
तो पुढे म्हणाला की, मला अजूनही ते दिवस आठवतात जेव्हा मी वानखेडे मैदानाबाहेर फक्त प्रवेश करण्यासाठी आणि मुंबईच्या रणजी संघातील खेळाडूंची झलक पाहण्यासाठी उभा असायचो. ही साधरण 2003 किंवा 2004 ची आठवण आहे. आचे अंडर-14, अंडर-16 संघ आझाद मैदानावर सराव करायचे. सरावानंतर मी आणि माझे मित्र रणजी स्पर्धेतील क्रिकेटपटूंची एक झलक पाहण्यासाठी रेल्वे रूळ ओलांडून वानखेडेवर जायचो. त्यावेळी वानखेडेवर प्रवेश करणे कठीण होते, आजही कोणाला सहजासहजी प्रवेश मिळत नाही. याच मैदानावर मी माझा पहिला सामना खेळलो आणि याच मैदानावर स्टँडला माझे नाव देण्यास येणार आहे हा माझ्यासाठी मोठा सन्मान आहे.
मुंबईकडून खेळायला मिळणे फार अवघड आहे. माझी मुंबईच्या संघात पहिल्यांदा निवड झाली आणि पहिल्यांदा मुंबईच्या ड्रेसिंग रुममध्ये गेलो तेव्हा माझे पाय कापत होते. ड्रेसिंग रुममध्ये लिजेंड खेळाडू वसीन जाफर, अमोल मुझुमदार, नीलेश कुलकर्णी, साईराज बहुतुले, रमेश पोवार यासारखे खेळाडू होते. कुठे बसावे हा प्रश्न असतानाही या सर्वांनी मला सांभाळून घेतले, असेही रोहित म्हणाला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List