‘भगवद्गीता’ आणि ‘नाट्यशास्त्रा’चा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश ; देशाच्या शिरपेचात मानाचा तुरा
हिंदुस्थानच्या शिरपेचात मानाचा आणखी एक तुरा खोवला गेला आहे. आपला प्राचीन ग्रंथ असलेल्या ‘भगवद्गीता’ आणि भरत मुनींच्या ‘नाट्यशास्त्रा’ला आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची मान्यता मिळाली आहे. ‘भगवद्गीता’ आणि नाट्यशास्त्र्यातील हस्तलिखितांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश करण्यात आला आहे. देशासाठी हा अभिमानाचा क्षण आहे.
या रजिस्टरमध्ये दस्तावेजी वारशाच्या रूपात पुस्तके, हस्तलिखिते, मानचित्र, छायाचित्रे, ध्वनी किंवा व्हिडीओ रेकॉर्डिंगचा समावेश आहे. नाट्यशास्त्र हा कलांवरील एक मौलिक ग्रंथ मानला जातो. युनेस्कोने 17 एप्रिल रोजी आपल्या जागतिक स्मृती रजिस्टरमध्ये 74 नवीन संग्रह समाविष्ट केले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संस्कृती मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी हा भारतासाठी ऐतिहासिक क्षण असल्याचे म्हटले आहे.
युनेस्कोने 1992मध्ये पुढील पिढीसाठी दस्तावेज सुरक्षित ठेवण्यासाठी हा उपक्रम सुरू केला. जगातील जुन्या, महत्त्वपूर्ण व ऐतिहासिक दस्तावेजांची जपवणूक करणे हा याचा मुख्य उद्देश आहे. लोकांना संबंधित दस्तावेज सहजपणे पाहता येतो. शेकडो वर्षे जुने दस्तावेज संरक्षित केले जातात. युनेस्कोने भगवद्गीता आणि भरत मुनींचे नाट्यशास्त्र यांचा मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टरमध्ये समावेश केला आहे. देशाच्या सांस्कृतिक वारशासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.
भगवद्गीतेमध्ये 18 अध्यायांमध्ये 700 श्लोक आहेत. महाभारत काळातील हा प्राचीन धार्मिक ग्रंथ आहे. यात वैदिक, बौद्ध, जैन आणि चार्वाक अशा प्राचीन धार्मिक विचारांचे मिश्रण आहे. कर्तव्य, ज्ञान आणि भक्तीच्या महत्त्वावर आधारित आहे. भगवद्गीता शतकानुशतके जगभर वाचली जात आहे आणि अनेक भाषांमध्ये अनुवादित झाली आहे. त्यामुळे याचा समावेश या रजिस्टरमध्ये करण्यात आला आहे. तसेच भरत मुनींचे नाट्यशास्त्र हे संस्कृत काव्यात्मक श्लोकांचा संग्रह आहे ज्यामध्ये कलाकृतींचे वर्णन केले आहे. नाट्य (नाटक), अभिनय, रस (सौंदर्यविषयक अनुभव), भाव (भावना), संगीत इत्यादींचा व्यापक दृष्टिकोन यात आहे. हा कलांवरचा एक प्राचीन विश्वकोशीय ग्रंथ आहे. रंगभूमी, काव्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, नृत्य आणि संगीत यांना प्रेरणा मिळते. हे दोन्ही ग्रंथ दीर्घकाळापासून देशाच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक वारशाचे मुख्य आधारस्तंभ आहेत. आता त्यांचा युनेस्कोच्या ‘जागतिक स्मृती रजिस्टर’मध्ये समावेश झाला आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List