कल्याण, डोंबिवलीच्या गल्लीबोळात जुगार, मटका, ड्रग्जचे अड्डे; डीसीपींच्या आदेशाला पोलीसच किंमत देईनात
कल्याण- डोंबिवली शहरातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, मटका, गावठी दारू विक्री आणि अमली पदार्थांचे अड्डे उघडपणे सुरू आहेत. प्रमुख चौक, नाके, शाळा कॉलेज परिसर आणि गल्लीबोळात जुगार, मटका, अमली पदार्थांचे अड्डे राजरोस सुरू असून विद्यार्थी, तरुण बळी पडत आहेत. कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी गैरधंद्यांना आळा घालण्याचे आदेश दिले असतानाही त्यांच्या आदेशाला स्थानिक पोलीसच किंमत देईनात अशी स्थिती आहे.
कल्याण परिमंडळ 3 अंतर्गत येणाऱ्या आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत विविध गैरधंदे दिवसाढवळ्या सुरू असून कल्याण पश्चिम स्टेशन परिसर, डोंबिवली टाटा पॉवर नाका, रामनगर, मानपाडा, डोंबिवली पूर्व-पश्चिम स्टेशन भागात जुगार, मटका अड्डे आणि अमली पदार्थांची विक्री खुलेआम सुरू आहे. विशेष म्हणजे काही अड्डे तर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरच आहेत. बेकायदा अड्डे तत्काळ बंद करून दोषींवर कठोर कारवाई करून गुन्हे दाखल करावेत, अशी नागरिकांची मागणी असतानाही पोलीस मात्र झोपेचे सोंग घेऊन आहेत.
ठाणे आयुक्तांकडे तक्रार
कल्याण पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी असे अड्डे बंद करण्याचे स्पष्ट आदेश दिले असतानाही स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असल्यामुळे नागरिक, व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते लवकरच ठाणे पोलीस आयुक्तांकडे थेट तक्रार दाखल करणार असल्याचे काही जागरूक नागरिकांनी सांगितले.
पोलीस ठाण्याजवळच गोरख धंदे सुरू
रामनगर पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर, डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानकासमोरील एका इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर दिवसाढवळ्या मटका चालवला जात आहे. कल्याण पश्चिम स्थानक परिसर, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टाटा पॉवर नाका येथे भरदिवसा मटका अड्डे आणि ड्रग्जचे अड्डे सुरू आहेत. या अड्ड्यांची संपूर्ण माहिती असूनही ‘अर्थपूर्ण’ संबंधांमुळे पोलिसांकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List