मराठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडणं बाजूला ठेवून एकत्र येण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन
मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. सर्व मराठी माणसांना या हितासाठी, महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय, असे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी मुंबईत भारतीय कामगार सेनेच्या 57 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत मार्गदर्शन केले. हिंदी सक्ती करत असाल तर होऊ देणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिला.
वक्फ बोर्डाच्या सुधारणेला विरोध करण्याचं कारण काय की जो प्रश्न मी सरकारला विचारला, तोच सुप्रीम कोर्टाने त्यांना विचारला. सुधारणा करताना वक्फ बोर्डामध्ये गैरकारभार चालला असेल तर त्याला जरूर पायबंद घाला. पण जेव्हा वक्फ बोर्डावरती तुम्ही गैर मुस्लमान माणसाची नेमणूक तुम्ही कायद्याने करण्याचं बंधन टाकताय, मग आमच्या हिंदू धार्मिक संस्थांवर उद्या जर का तुम्ही मुस्लिम किंवा गैर हिंदू टाकणार नाहीत, याची खात्री कशावरून तुम्ही देता? आणि हाच प्रश्न सुप्रीम कोर्टाने विचारला आहे. आंधळेपणाने नुसतं काहीतरी भरकटत जायचं म्हणजे आम्ही हिंदू, अजिबात नाही आहोत. नुसतं हिंदी बोललं म्हणजे आम्ही हिंदू आहोत, गुजराती बोललो म्हणजे आम्ही हिंदू आहोत, अजिबात नाही. आम्ही मराठी बोलणारे कट्टर तुमच्या पेक्षा जास्त देशाभिमानी हिंदू आहोत. पण हे असं आपल्यात भांडण-भांडण लावून ठेवायचं. वक्फ बोर्डावरनं मारामाऱ्या लावायच्या, आता भाषेच्या सक्तीवरून लावायची. आणि मग ही अशी बिलं ही मंजूर करून घ्यायची. मग कामकार कायदे, शेतकऱ्यांचे काळे कायदे. पण ज्या प्रमाणे शेतकरी रस्त्यावर उतरला तसा कामगार अजून उतरलेला नाही. कारण यांचं मिशन एकच आहे, कुठेही कोणीही एकत्र येता कामा नये. संघटीत होऊ द्यायचं नाही, विस्कळीत ठेवायचं, सतत एका दबावाखाली ठेवायचं, टेन्शनखाली ठेवायचं, म्हणजे जो घरच्या चिंतेने, स्वतःच्या चिंतेने ग्रस्त असेल त्याला जाऊ दे ना कायदे आणले आणू दे ना, जमीन गेली जाऊ दे ना, धारावी गेली जाऊ दे ना. पण तुम्ही टेन्शनमध्ये असणार. हे सगळे जे काय काळे कायदे आहेत, यात कायम स्वरुपी कर्मचारी किती टक्क्यात राहिले असेल? टक्क्यांत मोजायची वेळ आलीय. कारण रोजी भरती होते. हायर अॅण्ड फायर… म्हणजे आज काम आहे, उद्या काम असेल असं नाही. उद्या काम असेल तुलाच मिळेल असं नाही. सगळं मालकाच्या मर्जीवरती, मग मला माझ्या कामाची चिंता आहे तू काय घेऊन बसला कायदे, वक्फ काय, हे काय ते काय? अशी सडकून टीका उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या धोरणांवर केली.
आपल्याला भांडणात गुंतवून ठेवून यांचे काय चाळे चाललेत ते बघा. आता ही मुंबई आहे, मुंबईमध्ये ओरबाडायचं काम सुरूच आहे. आता ठाण्यामध्ये क्लस्टरची एक योजना आणताहेत, क्लस्टर करा पण तो एका बिल्डकरसाठी करताहेत. या सगळ्या गोष्टी पळवून न्यायच्या, सगळ्या गोष्टी अगदी अदानीच्या घशात घालायच्या किंवा त्यांच्या उद्योगपती मित्रांच्या घशात घालायच्या. पण तुम्ही त्याच्यावरती बोलता कमा नये म्हणून तुम्हाला भांडणामध्ये व्यस्त करून ठेवायचं. वक्फ बोर्डवरनं भांडा किंवा हिंदी मराठीवरन भांडा… आणखी कशावरती भांडा पण भांडा… म्हणजे आमच्याकडे लक्ष येणार नाही. आम्ही आमचे सगळे पैसे ओरबाडून हे निघून जाणार, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केला.
हे काय दुर्दैवाने सरकारं आलेत, दोन्हीकडे इकडे काय आणि वरती काय? जाहीरनाम्याबद्दल कोणीच बोलत नाहीये. महाराष्ट्राचं सरकार हे त्यांनी दिलेल्या थापांमुळे किंवा आश्वासनांमुळे लोकांनी त्यांना मतदान दिलं. लाडक्या बहिणींना 2100 रुपये देऊ. लोकांनी बिहिणींनी मतदान केलं असं मानलं. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करू, शेतकऱ्यांना हमीभाव देऊ, मोदी तर म्हणाले होते, दवर्षी दोन कोटी लोकांना रोजगार देऊ. त्याच्यावरती कोणीच बोलत नाहीये. त्याच्यावरती कोणी जर का विचारलं तर अजित पवार सांगतात की, माझ्या भाषणात कर्जमुक्ती कधी बोललो तुम्ही दाखवा. जे तुम्ही बोललात, ज्याच्यावरती तुम्ही मतं मिळवलीत ते सोडून तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी करतात. मग हे एवढं खोटं बोलणारं सरकार मी पुन्हा देईन… पुन्हा देईन… एवढं फसवल्यानंतरही पुन्हा देईन. हा कुठला मूर्खपणा चाललेला आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला.
“आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर मुळासकट उखडून फेकू”
हिंदीची सक्ती पहिलीपासून… काय करायचं? आम्ही प्रेमाने सगळं ऐकू, पण सक्ती कराल तर मुळासकट उखडून फेकू. जे अमराठी मुंबईमध्ये राहताहेत, वर्षानु वर्षे, पिढ्यानं पिढ्या राहताहेत त्यांना चला मराठी शिकवूया, हे शिवसेनेनं सुरू केलं आहे. त्याला प्रतिसाद मिळतोय. अनेक उत्तर भारतीय आपल्या क्लासेसला येताहेत. आणि ते बघितल्यानंतर यांच्या पोटात गोळा आला, चला हिंदीची सक्ती करूया… कशासाठी सक्ती पाहिजे? मला अभिमान आहे की, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषा ही सक्तीची करण्याचा निर्णय हा माझ्या नेतृत्वाखालील सरकारने घेतलेला आहे. जो महाराष्ट्रामध्ये राहील त्याना मराठी आलीच पाहिजे, ही सक्ती असलीच पाहिजे. मग हिंदीची तुम्ही सक्ती करत असाल होऊ देणार नाही हा भाग वेगळा आहे, पण सगळ्या दुकानांवरती महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लिहिण्याचा सुद्धा आम्ही कायदा केला आहे. तो कायदा या सरकारने किती अंमलबजावणीमध्ये आणला? काही नतद्रष्ट तर त्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये गेले. इथे राहता, इथलं आमचं मीठ खाता आणि मराठी भाषेला तुम्ही विरोध करता? आपलं सरकार होतं तेव्हा यांची कोणाची हिंमत नव्हती. पण आपलं सरकार एसंशिनी गद्दारी करून पाडल्यानंतर त्यांच्या पालख्या वाहताहेत, त्याचे पाय चाटताहेत. आणि मराठीवरती अन्याय करणाऱ्यांचे पाय चाटणारे हे कसले बाळासाहेबांचे विचार नेणार पुढे. पण यांचं सरकार आल्यानंतर कदाचित असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की महाराष्ट्राच्या मारेकऱ्यांची सुपारी घेणारं हे सरकार आहे का? महाराष्ट्राचे आणि मराठीचे मारेकरी त्यांची सुपारी घेतलेले हे सत्ताधारी महाराष्ट्राच्या दुर्दैवाने लादलेद का? यांचं सरकार आल्यानंतर मराठी नहीं आती, मराठी लोक गंदे है, वो नॉनव्हेज खाते है. मी सुद्धा आजपासून सांगतोय, जसं आपण म्हटलं होत ना इस देश मे रहना होगा तो वंदे मातरम् कहना होगा. तसं राज्य मे रहना होगा तो जय महाराष्ट्र बोलनाही होगा, असा खणखणीत इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला.
“फडणवीसांना सांगतो… घाटकोपरमध्ये पहिल्यांदा मराठी सक्ती करून दाखवा”
आम्ही अस्सल मराठी, मराठी भाषणा बोलणारे आम्ही हिंदू आहोत, काय चूक आहे? दुसरा हिंदू तरी असतो कसा? आणि यांना हिंदीची सक्ती करायची असेल, होऊ देणार नाही हे पुन्हा सांगतो तर, फडणवीसांना सांगतो तुमचे ते जोशी आले होते ना, मध्ये माशी शिंकल्यासारखे शिंकून गेले, जोशी का माशी? ते जिथे बोलले त्या घाटकोपरमध्ये पहिल्यांदा मराठी सक्ती करून दाखवा. घाटकोपरमध्ये मराठी आलचं पाहिजे आणि मग आम्ही हिंदीचं काय आहे ते बघून घेतो. प्रत्येक माणूस तिथला मराठी बोलणारा दाखवा, असे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुनावले.
जी लोकं मराठीचा दुस्वास करतात, आम्ही कोणी त्यांना दुस्वास करत नाही. उलटं आम्ही त्यांना आपलसं करायला बघतो. मराठी बोला, या आमच्या बरोबर बसा. अनेकजण मराठीमध्यो बोलतात. शिवसैनिक आहेत काही, उत्तर भारतीय आहेत काही, गुजराती आहत, मुस्लिम तर आलेच आहेत आपल्या सोबत. पण आम्ही एकाबाजूने हे धोरण स्वीकारतोय तुम्ही काड्या कशाला घालताय, आगी कशाला लावताय? कर्नाटकात कधी यांचं कधी त्यांचं कोणाचंही सरकार असलं बेळगाव कारवार तिकडे मराठीवरती अन्याय करणारी ही सगळी अवलाद तिकडची ही आम्हाला इकडे हिंदी सक्तीची करणार? तामिळनाडूमध्ये स्टॅलिन बसलेत तिकडे जाऊन हिंदीमधला ही बोलून तर दाखवा. आम्ही प्रेमानं सगळ्यांना आपलसं करतोय, हिदींचं आमचं काही वैर नाहीये. सगळे हिंदी बोलतात, मराठीही बोलतात पण जबरदस्ती कशाला करताय तुम्ही? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.
“कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्या बरोबर का भाजप बरोबर?”
माझं मत असं आहे की, मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे. मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी, मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय. पण माझी अट एक आहे की, जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये हे सगळे कारभार घेऊन जाताहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं. आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचं विचार करणारं सरकार बसलं असतं. त्याच वेळेला हे काळे कामगार कायदे कचऱ्याच्या टोपलीत फेकून दिले असते. पण तेव्हा पाठिंबा द्यायचा, आता विरोध करायचा, मग परत तडजोड करायची हे असं नाही. महाराष्ट्र हिताच्या आड जो कोणी येईल त्याचं स्वागत मी करणार नाही, त्याला मी घरी बोलावणार नाही, त्याच्या घरी मी जाणार नाही, त्याचा आदर, स्वागत त्याच्या पंक्तीला मी बसणार नाही. हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र हिताच्या गोष्टी करा. बाकी आमच्यातली भांडणं मी आज सांगतो, जी काही भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटवून टाकली चला. पण पहिले हे ठरवा. महाराष्ट्राचं हित. मग त्यावेळी सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत? म्हणजे माझ्याबरोबर एसंशि नाही. गद्दार सेना नाही. पण ठरवा कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं, मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे, माझ्या बरोबर का भाजप बरोबर? आणि मग काय पाठिंबा द्यायचा आहे, विरोध करायचा बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये. महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी. पण मग बाकिच्यांना या गाठीभेटी आणि कळत नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा नाही. ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग टाळी देण्याची हाळी द्यायची, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
“जय श्रीराम आम्ही बोलूच पण तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी बोलावचं लागेल”
रामाची भक्ती आम्हाला भाजपने नाही शिकवायची. गेल्या वर्षी 23 जानेवारीला नाशिकला काळाराम मंदिरात गेलो होतो. आणि नंतरच्या सभेत मी सांगितलं होतं की आम्हाला भाजपमुक्त राम पाहिजे. कारण नाही तर तेच होतंय रामाला भेटताना तुम्ही कशाला बडवेंसारखे मध्ये पाहिजे भाजपवाले? आम्ही आणि राम आमचं नातं आहेच, तुम्ही कोण सांगणारे आम्हाला? त्याच्यामुळे जय श्रीराम आम्ही बोलूच पण तुम्हाला जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय भवानी बोलावचं लागेल तर महाराष्ट्रामध्ये राहा नाहीतर तुमच्या कुठल्या गावी जायचं आहे तिथे निघून जा. महाराष्ट्रात मुंबईत सर्व भाषिक गुण्या गोविंदाने नांदतोय. त्यांच्यामध्ये काड्या घालण्याचे धंदे करू नका. जर तुम्ही आमच्यावरती सक्ती करण्याचा प्रयत्न केला तर ती सक्ती आज आम्ही झुगारून दिलेली आहे, हे जाहीरपणे सांगतो. प्रेमाने बोलाल तर ऐकू, जबरदस्ती कराल तर लाथ घालून हाकलून देऊ, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List