महाराष्ट्र, मराठी माणसासाठी मतभेद विसरत एकत्र येणे ही काळाची गरज; संजय राऊत यांनी स्पष्ट केली भूमिका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या भूमिकेबाबत मत स्पष्ट केले. दोघे भाऊ आहेत, त्यांच्यात कोणतेही वाद, मतभेद किंवा भांडणे नाहीत. महाराष्ट्राच्या शत्रूंना विरोध ही आमची भूमिका कायम आहे. आता राज ठाकरे यांनी साद घातली आहे. त्याला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिसाद दिला आहे. महाराष्ट्रहितासाठी ही चांगली गोष्ट आहे, असे संजय राऊत यांनी स्पष्ट केले.
उद्धव आणि राज ठाकरे हे दोघे भाऊ आहेत आणि त्यांच्यातील नाते कायम आहेत. काही राजकीय मतभेद झाले आणि त्यातून मार्ग वेगळे झाले असले तरी उद्धव ठाकरे यांचा मार्ग नेहमी महाराष्ट्र हिताचा राहिला आहे. राज ठाकरे यांचे वक्तव्य आम्ही आणि उद्धव ठाकरे यांनीही एकले आहे. त्यांनी जी भूमिका मांडली आहे की, महाराष्ट्र हितासाठी आपण वाद मिटवण्यास तयार आहोत. यावर उद्धव ठाकरे यांचे असे म्हणणे आहे की, कोणताही वाद आणि भांडण नाही, असल्यास ते मिटवण्यास वेळ लागत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजप आणि आमची 25 वर्षे युती होती. त्यातील काही काळ राज ठाकरे शिवसेनेसोबत असताना युतीत सहभागी होते. त्यांना सर्व गोष्टी माहिती आहेत. मात्र, जेव्हा महाराष्ट्र हितावर घाव घालण्यासाठी शिवसेना तोडण्याचा प्रयत्न झाला आणि आम्हांला बाजूला व्हावे लागले. आमची फक्त भूमिका एवढीच आहे की, लोकसभा निवडणुकांवेळी, विधानसभा निवडणुकांवेळी उद्धव ठाकरे हेच स्पष्ट करत होते की, महाराष्ट्राच्या मुळावर येणाऱ्या या फौजा आहेत. त्यांच्याशी आपण कोणताही संबंध ठेवता कामा नये. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राच्या शत्रूंना मदत होईल, अशी कोणतीही भूमिका घेऊ नये, असे आमचे धोरण होते. शेतकऱ्यांसाठीचे काळे कायदे, महाराष्ट्रातून उद्योगधंदे बाहेर जात असताना त्याबाबतची भूमिका आमच्या स्पष्ट होत्या. राज्यात असे होत असताना अशा शक्तींसोबत राहणे योग्य नाही, हे महाराष्ट्राला परवडणारे नाही. ही आमची भूमिका आहे. असेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले की,आजही काही शक्ती महाराष्ट्राल पाण्यात पाहतात. महाराष्ट्राचे मराठी माणासाचे नुकसान व्हावे, यासाठी पडद्यामागू कारस्थानं करत आहेत. अशा माणसांसोबत आपण पंगतीला बसणार नाही, त्यांना घरातही घेणार नाही. अशी भूमिका घेणं गरजेचं असल्याचे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. महाराष्ट्राचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू ते महाराष्ट्राचे शत्रू अशी भूमिका कोणी घेत असले तर त्यांचे स्वागत आहे. त्यानंतर आम्ही आमची पुढील भूमिका किंवा चर्चा करू.सध्या राज्याची स्थिती बिकट आहे. राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात वेगळेचं. आम्ही आमच्या घरात किंवा दारामध्ये महाराष्ट्र शत्रूंना कदापी थारा देणार नाही, हीच आमची भूमिका आहे. याच भूमिकेचा पुरस्कार राज ठाकरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी करणे गरजेचे आहे, असेही संजय राऊत म्हणाले.
भाजप आणि त्यांचे बगलबच्चे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महराज, शिवसेनाप्रमख बाळासाहेब ठाकरे यांचे अस्तित्व मिटवण्याच्या मागे आहेत. त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचे आहे. अशा वेळी दोन प्रमुख ठाकरेंनी साद आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्यांचे महाराष्ट्र स्वागतच करत आहे. उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली आहे. आम्ही या सर्व घडामोडींकडे सकारात्मकतेने बघत आहोत. हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीत अनेक विचारसरणींच्या लोकांनी आपापले मतभेद बाजूला ठेवत महाराष्ट्राच्या निर्माणासाठी एकत्र येण्याची भूमिका घेतली होती. आम्हीही त्याच प्रवाहातील कार्यकर्ते आहोत, असे ते म्हणाले.
महाविकास आघाडी ही महाराष्ट्रासाठी केलेली आघाडी आहे. राज ठाकरे सध्या भाजप किंवा एसंशि गटासोबत दिसत आहेत. आमच्या दृष्टीने ते महाराष्ट्र हिताचे काम करत नाहीत. ते राज ठाकरे यांचा वापर करून मराठी माणासाला त्रास देण्याची कारस्थानं रचत आहेत. हे राज ठाकरे यांच्या लक्षात आल्यास ते महाराष्ट्र आणि मराठी माणासाच्या हिताचे ठरेल. महाराष्ट्र, मुंबई, मराठी माणूस त्याचा व्यवसाय, मराठी व्यवहार यावर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. चांगले घडण्याची आम्ही वाट बघत आहोत. जर राज ठाकरे यांच्याकडून चांगली भूमिका समोर आली असेल, तर त्या भूमिकेला नाकारण्याचा कंरटेपणा आमच्याकडून होणार नाही. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत जो शिवसेनेचा प्रवास आम्ही अनुभवला आहे. तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही. आम्ही सर्व ठाकरे एकत्र आहोत. त्यांनी महाराष्ट्राच्या शत्रूंना घरात घेतले, यावरून मतभेद झाले होते. त्याशिवाय आमच्यात काहीही मतभेद नाही. दोन्ही ठाकरे भाऊ आहेत, हे कोणीही नाकरू शकत नाही.
महायुतीची ताकद समजण्यासाठी वॉशिंग्टनला तुलसी गबार्ड यांच्याकडे जावे लागेल. ईव्हीएममध्ये गडबड, फेरफार, घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जातात. हे अमेरिकेच्या गुप्तचर विभागाच्या प्रमुख तुलसी गबार्ड यांनी स्पष्ट केले आहे. ही महायुतीची ताकद नसून लांड्यालबाड्या करून निवडणुका जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत संबंध ठेवणार नाही, ही आमची स्पष्ट भूमिका आहे, असेही त्यांनी सांगितले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List